

Growth mindset for Children Information In Marathi
मुंबई : मुलं ही मुळातच शिकण्याच्या प्रक्रियेत असतात. त्यांचा आत्मविश्वास, मानसिकता आणि संघर्षांशी सामना करण्याची तयारी वाढवण्यासाठी ‘ग्रोथ माइंडसेट’ची भूमिका महत्त्वाची ठरते. पालकांना त्यांच्या मुलांमध्ये ही सकारात्मक मानसिकता विकसित करण्यास नक्कीच मदत करू शकते. पालकांनी खाली दिलेल्या टिप्स लक्षात ठेवल्या तर लहानपणापासूनच मुलांमध्ये विकासाची मानसिकता म्हणजेच ग्रोथ माईंडसेट तयार होईल.
1. लहानपणापासून संवाद हवा
बहुतांशी मुलं आपल्या पालकांना मनातील गोष्टी बोलत नसतात. त्यामुळे पालकांनी त्यांना बोलण्यास पोषक वातावरण देणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलाशी मुक्तपणे संवाद करावा. दिवसाच्या शेवटी मुलांशी संवाद साधताना काही प्रश्न विचारून चर्चा करणे देखील गरजेचे आहे. आज दिवसभरात तुझ्याकडून काही चुकलं का?, त्यातून तू काही शिकलास काय?, आज तुला काय कठीण वाटलं?, असे प्रश्न विचारून संवाद साधावा.
2. अपयश आल्यास प्रोत्साहन द्या (हो, खरंच!)
जीवन जगताना अपयश हे येतंच आणि ते ठीक आहे, मुलांना हे समजणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी त्यांना आठवण करून द्यावी की, प्रत्येक वेळी जेव्हा ते अपयशी होतात तेव्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले पाहिजे. तेव्हाच मुलांची मानसिकता अपयशाला टक्कर देण्यासाठी अधिक मजबूत होते. त्यांच्या अपयशापासून त्यांना वाचवू नका, कारण हेच त्यांना जीवनातील संकटांना तोंड देणं शिकवतं.
3. कौतुक करा
पालकांनी आपल्या मुलाचे “तू किती हुशार आहेस, असे म्हणून कौतुक करणे टाळा. या ऐवजी तू खूप छान प्रयत्न केलेस, तुला तुझं ध्येय ठरवता आले पाहिजे, तुला अडचणी येऊ शकतात, अनेक आव्हानांना तुला सामोरं जावं लागेल, असे सांगत त्याच्या सर्जनशीलतेचं कौतुक केले पाहिजे. उदाहरणार्थ: “व्वा! हे करताना तू खूप मेहनत घेतली असणार!”
4. मेंदू विकसित होतो
मुलांना समजावून सांगा की बुद्धिमत्ता ही स्थिर नसते. जेव्हा गोष्टी कठीण वाटतात, तेव्हा आव्हानांचा सामना करताना मेंदू अधिक विकसित होतो. प्रत्येक नव्या शिकण्याने मेंदूत नवीन कनेक्शन (connections) तयार होतात. त्यामुळे मेंदू हा विकसित होतच राहतो, हे पालकांनी मुलांना समजून सांगितले पाहिजे. यामुळे मुले आणखी प्रयत्निल राहू शकतात.
5. मुलांना स्वसंवाद बदलण्यास मदत करा
मुलांचा अंतर्गत संवाद त्याच्या मानसिकतेवर मोठा परिणाम करतो. मुलांच्या मनातील “मी हे करू शकत नाही” अशा विचारांना “मी अजून शिकतोय, पण मी प्रयत्न करत राहीन” मध्ये बदलण्यास मदत करा. हे विचार तुमचं उदाहरण पाहूनच त्यांना आत्मसात होतील. पालकांनी केवळ बोलून नाही तर मुलांना त्यांच्या कृतीतून या गोष्टी शिकवल्या पाहिजेत.