मकर संक्रांत : गोडवा संक्रांतीचा 

makar sankrant
makar sankrant
Published on
Updated on

भारतात विविध प्रांतांत विविध नावांनी वेगवेगळ्या प्रकारे मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. वाद, कटू घटना मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया, असा गोड संदेश हा सण देतो.

संक्रांत म्हणजे संक्रमण करणारा म्हणजे वाढ करीत जाणारा वर्धिष्णू सण! या दिवसापासून दिवस वाढत जातो. रात्र कमी होते. वातावरणातील थंडावा कमी होऊन उष्मा वाढत जातो. सूर्याचा मकर राशीत होणार्‍या आगमनाचा पहिला दिवस म्हणजे संक्रांत होय! आशिया खंडात हा संक्रांतीचा सण बहुतांश देशांत साजरा केला जातो. नेपाळमध्ये तो 'माधी' या नावाने, थायलंडमध्ये 'सोंक्रांत', तर म्यानमारमध्ये 'थिंगयान' या नावाने हा सण साजरा करतात.

भारतात विविध प्रांतांत विविध नावांनी वेगळ्या प्रकाराने हा सण साजरा केला जातो. केरळमध्ये 'पोंगल', पंजाबमध्ये 'लोहरी' अशी या सणाची नावे आहेत. राजस्थान, गुजरातमध्ये हा दिवस पतंगाचा दिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी गुजरात, राजस्थानमध्ये पतंग उडवण्याच्या कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.

या दिवसाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन कारणांमुळे महत्त्व आहे. वैज्ञानिक कारण म्हणजे, या दिवसानंतर रात्र लहान होऊ लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. थंडीचा जोर पूर्णपणे नसला, तरी थोड्या प्रमाणात कमी होऊ लागतो. हवामान कोरडे असते. अशा वेळी तीळ आणि गूळ यांचा आहारात समावेश करणे हा आरोग्य सल्ला अतिशय गुणकारक ठरतो.

तिळाचा स्निग्धपणा आणि गुळाचा उष्णपणा याचे परिणाम तब्येतीसाठी उत्तम! तसेही आपल्याकडे ऋतुमानानुसार सणांचे, देवांचे प्रसाद असतात. म्हणूनच संक्रांतीला तिळगुळाचे लाडू, वड्या, गूळपोळ्या हा प्रमुख पदार्थ असतो. या दिवसातले वारे संक्रांतीचे वारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या वार्‍यांवर अनेक मराठी कविता, भावगीते बेतलेली आहेत. हीच वार्‍याची अनुकूलता पतंग उडविण्यासाठी योग्य असते आणि म्हणूनच पतंगाचा खेळ या दिवसात खेळला जातो. नववर्षाची सुरुवात अशा आनंददायक सणाने होत असते.

'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' असे म्हणत आपण एकमेकांना भेटतो यामागील उद्देश असा की, वर्षभरात जो काही मनमुटाव, वाद आपल्यात झाले असतील, ज्या काही कटू घटना आयुष्यात घडल्या असतील त्या मागे टाकून नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करूया, असा गोड संदेश हा सण देतो.

भारतीय परंपरेवर, संस्कृतीवर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की, आपल्या प्रत्येक सणांमधून एक चांगला संदेश नेहमीच असतो. प्रत्येक सणाला एक कथानक असते. त्या-त्या सणांची देवता असते. अशाच प्रकारच्या अनेक कथा, रूपके या सणाशी जोडलेली आहेत. यावर्षी 14 जानेवारी (शुक्रवार) 2022 रोजी संक्रांत आहे. याचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांत देवीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. अशा प्रकारची वर्णने सर्वत्र वाचनात येतात.

संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून चविष्ट भाजी बनवली जाते. या भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात. यासोबत बाजरीची, ज्वारीची आणि मक्याची भाकरी, वालाच्या शेंगांची भाजी, मुगाची खिचडी, गुळाची पोळी असा नैवेद्य देवाला दाखवितात. या दिवशी प्रत्येक ठिकाणी तिळाचा वापर केला जातो.

स्त्रियांना या सणाचे अपार कौतुक असते. नवविवाहितांचे तर अधिक कौतुक होते. काळी साडी, हलव्याचे दागिने, हळदी-कुंकू अशा अनेक आठवणी या संक्रांतीशी जोडलेल्या असतात. लहान बाळांना काळे झबले, हलव्याचे दागिने, लूट अशा प्रकाराने आनंद साजरा केला जातो. घरोघरी हळदी-कुंकू, वाण देणे अशा कार्यक्रमांत खंड पडला आहे. मनुष्य हा उत्सवप्रिय असला, तरी तो समाजशील प्राणी आहे. आपापल्या जबाबदार्‍या सांभाळत संक्रांतीचा सण गोड व्हावा, यासाठी खूप खूप शुभेच्छा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news