Elephant News : पृथ्वीवरून हत्ती नाहीसे झाले तर काय घडते? आफ्रिकेतील १५ वर्षांच्या संशोधनातून समोर आले धक्कादायक वास्तव

प्रदीर्घ पर्यावरणीय प्रयोगाने विशालकाय प्राणी आणि अतिसूक्ष्म जीवांमधील एकमेकांवरील अवलंबित्व पुन्हा एकदा झाले स्पष्ट
Elephant Ecosystem Impact
प्रतीकात्मक छायाचित्र.AI-generated image.
Published on: 
Updated on: 
Summary
  • पूर्व आफ्रिकेतील सव्हानाच्या भूखंडांमधून १५ वर्षांसाठी हत्तींना हटविण्‍यात आले.

  • संशोधकांनी केनियातील ‘एमपाला रिसर्च सेंटर’ येथे २००८ पासून सुरू असलेल्या ‘उहुरु’ (UHURU) प्रदीर्घ प्रयोगाची मदत घेतली.

  • मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेले मोठे प्राणी गायब झाले, तर परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता.

Elephant Ecosystem Impact : निसर्गाची साखळी आपल्या सर्वांना माहिती आहे. निसर्गातील प्रत्येक जीव एकमेकांच्या अस्तित्वाशी घट्ट जोडलेला असतो, हे यापूर्वीही स्पष्ट झालेले आहे. आता पूर्व आफ्रिकेतील केनियामध्ये झालेल्या प्रदीर्घ पर्यावरणीय प्रयोगात निसर्गाने रचलेली जीवसृष्टीची साखळी किती सूक्ष्म आणि परस्परपूरक आहे, हे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांनी पूर्व आफ्रिकेतील सव्हानाच्या भूखंडांमधून १५ वर्षांसाठी हत्तींना हटविल्यानंतर येथील सूक्ष्म जीवांचे विश्वही उद्ध्वस्त झाल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.

संशोधन कसे झाले?

'सायन्स ॲडव्हायझर' वृत्तपत्रिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनुसार, या अभ्यासासाठी संशोधकांनी केनियातील ‘एमपाला रिसर्च सेंटर’ येथे २००८ पासून सुरू असलेल्या ‘उहुरु’ (UHURU) प्रदीर्घ प्रयोगाची मदत घेतली. या प्रयोगात जंगलाचा काही भाग मोठमोठी कुंपणे घालून वेगळा करण्यात आला होता. प्राण्यांच्या आकारावरून त्यांना या बंदिस्त भागात जाण्यापासून रोखण्यात आले. काही भागांत कुंपण घालून हत्ती आणि जिराफांसारख्या अवाढव्य प्राण्यांनाच बंदी घातली गेली, तर दुसऱ्या भागांत लहान आकाराच्या हरणांना रोखण्यात आले. प्रयोगाची तुलना करण्यासाठी जंगलाचा काही भाग पूर्णपणे मोकळा ठेवला गेला. प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती निसर्गातून कमी झाल्या, विशेषतः मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेले मोठे प्राणी गायब झाले, तर परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होतो, हे पाहणे हा या अभ्यासाचा मुख्य उद्देश होता.

Elephant Ecosystem Impact
Elephant Intelligence | हत्ती विचारपूर्वक करतात मोह, भावनांवर मात!

जंगलातून हत्ती गायब, निसर्गाने विणलेले जाळेही हळूहळू नष्ट

हत्तीचे अस्तित्व फक्त त्याच्या अवाढव्य शरीरावरूनच नाही, तर त्याच्यामागे सुटणाऱ्या खुणांवरूनही ओळखता येते. सव्हाना गवताळ प्रदेशातील बाभळीच्या झाडांखाली आणि मोकळ्या रानांत हत्तीचे शेण म्हणजे सूक्ष्म कीटकांसाठी जणू रोजच्या अन्नाची, निवाऱ्याची आणि जगण्याची मोठी संधीच होती. पण या जंगलातून हत्तीच गायब झाले, तर निसर्गाने विणलेले हे छुपे जाळेही हळूहळू नष्ट होत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले.

Elephant Ecosystem Impact
Madhuri Elephant Return : ‘माधुरी’चे कोल्हापूरात जल्लोषात स्वागत; तब्बल 409 दिवसानंतर स्वगृही नांदणीत परतली!

प्राण्यांच्या सहअस्तित्वाचे चक्रावून टाकणारे पुरावे समोर

केनियात तब्बल १५ वर्षे चाललेल्या 'शेणखिड्यांची जैवविविधता आणि परिसंस्थेसाठी हत्तींचे महत्त्व' या विषयावर झालेल्या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, जंगलातील सर्वात महाकाय प्राणी आणि मातीत जगणारा अत्यंत सूक्ष्म कीटक एकमेकांशी किती घट्ट जोडलेले आहेत. संशोधकांनी काही भागांतून हत्तींना दूर ठेवले, तेव्हा तिथे शेणखिड्यांची संख्या, त्यांचे प्रमाण आणि विविध प्रजाती वेगाने घटल्याचे आढळले. हत्ती नसण्यामुळे निसर्गाची ही महत्त्वाची साखळीच खंडित झाल्याचे या अभ्यासातून उघड झाले आहे.

शेणावर आधारित एक परिसंस्था

शेणकिड्यांचे कार्य निरोगी माती आणि कार्यक्षम परिसंस्थांसाठी मूलभूत आहे. शेण खाऊन आणि ते जमिनीत गाडून, हे कीटक जमिनीला पोषक तत्वे परत मिळवून देण्यास, जमिनीची स्थिती सुधारण्यास, बियाणे पसरवण्यास आणि प्राण्यांच्या विष्ठेशी संबंधित परजीवी कमी करण्यास मदत करतात. संशोधकांनी प्रथम वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांच्या शेणाला हे किडे कसा प्रतिसाद देतात याचा अभ्यास केला. इतर प्राण्यांच्या शेणाच्या तुलनेत हत्तीच्या शेणाने लक्षणीयरीत्या जास्त संख्येने आणि विविध प्रकारचे किडे आकर्षित केले, यावरून महाकाय शाकाहारी प्राणी असणारा हत्ती कीटक समुदायासाठी किती महत्त्वाचा आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Elephant Ecosystem Impact
Omkar Elephant Attack | गोव्यातून परतलेला ओंकार सीमाभागातच

शेणकिड्यांची संख्या तब्बल ६७ टक्क्यांनी घटली

विशेषतः मानवी हस्तक्षेपामुळे संकटात सापडलेले मोठे प्राणी जेव्हा जंगलातून गायब होतात, तेव्हा निसर्गावर त्याचा काय परिणाम होतो, हे या अभ्यासात समोर आले. तब्बल १५ वर्षांनंतर या प्रयोगाचे धक्कादायक परिणाम समोर आले. हत्तींना हटविण्यात आलेल्या भागातून शेणकिड्यांची संख्या तब्बल ६७ टक्क्यांनी घटली. तसेच या कीटकांचे एकूण प्रमाण (बायोमास) ५१ टक्क्यांनी, तर त्यांच्या प्रजातींची संख्या २३ टक्क्यांनी कमी झाली.

शेणकिड्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात हत्तींची भूमिकाच महत्त्वाची

विशेष म्हणजे, ही घट केवळ आणि केवळ हत्ती नसल्यामुळेच झाली होती. कारण हत्तींशिवाय इतर मोठ्या प्राण्यांना त्या भागातून दूर ठेवूनही या कीटकांच्या संख्येवर फारसा फरक पडला नाही. यावरून हेच स्पष्ट होते की, शेणखिड्यांची विविधता आणि त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात हत्तींची भूमिकाच सर्वात महत्त्वाची होती. हत्तीच्या आकारमानानुसार हे नाते अधिक अर्थपूर्ण ठरते. हत्ती प्राणी दिवसातील १८ तासांपर्यंत खाण्यात घालवू शकतात, ज्यात ते अंदाजे ३०० पौंड अन्न खातात आणि २०० पौंडांपर्यंत शेण तयार करतात. संपूर्ण भूभागावर, यामुळे कीटकांसाठी एक स्थिर आणि भरीव संसाधन निर्माण होते, असे या संशोधन अभ्यासात म्हटले आहे.

एका प्रजातीच्या विनाशाचे दूरगामी परिणाम

हत्ती नसलेल्या भूखंडांमध्ये, शेणकिड्यांची संख्या कमी झाल्यामुळे शेणाच्या विघटनाची प्रक्रिया मंदावली. यामुळे बियांचा प्रसारही कमी झाला. या किड्यांच्या नामशेष होण्याला सव्हानाच्या कार्यपद्धतीतील मोठ्या बदलांशी जोडले जाते. संशोधनातील हे निष्कर्ष स्पष्ट करतात की, एका प्रजातीच्या विनाशाचे तिच्यावर अवलंबून असलेल्या इतर जीवांवर दूरगामी परिणाम होतात.

दीर्घकालीन प्रयोग का महत्त्वाचे आहेत?

केनियामध्ये झालेल्या पर्यावरणीय संशोधनातील संयमाचे महत्त्वही अधोरेखित होते. अनेक क्षेत्रीय अभ्यास केवळ काही वर्षांसाठीच चालतात; परंतु 'उहुरू' प्रयोग प्रदीर्घ काळ चालला आहे. त्यामुळे निसर्गात अत्यंत संथपणे होणारे बदल दृश्यमान होऊ शकले आहेत. १५ वर्षांच्या या नोंदीतून असे दिसून येते की, हत्तींचा प्रभाव केवल वनस्पती आणि मोठ्या प्राण्यांमधील आंतरक्रियांपुरता मर्यादित नाही. त्यांच्या उपस्थितीमुळे कीटकांचे एक जाळे टिकून राहण्यास मदत होते, जे हत्ती सव्हानामधून निघून गेल्यानंतरही दीर्घकाळ चालू राहते. या अर्थाने, हा प्रयोग नामशेष होण्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतो. हत्तीचे नाहीसे होणे ही नेहमीच एक वेगळी घटना नसते. त्यामुळे एखादे संसाधन नाहीसे होऊ शकते, कीटकांचा समुदाय कमकुवत होऊ शकतो. तसेच तो समुदाय करत असलेली पर्यावरणीय कार्ये बदलू शकतात. भूप्रदेशातील सूक्ष्मजीव व विशालकाय प्राणी यांचे एकमेकांशी असणारे परस्परअवलंबित्व किती खोलवर जोडलेले असू शकते, असेच हा प्रयोग सांगतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news