‘रुटिन’चा कंटाळा आलाय? ‘हे’ उपाय करुन पाहा

‘रुटिन’चा कंटाळा आलाय? ‘हे’ उपाय करुन पाहा
Published on
Updated on

दररोज सकाळी उठल्यापासून कामांना सुरुवात होते आणि पाहता पाहता दिवस कधी मावळतो कळतच नाही. स्वतःकडे लक्ष द्यायला, थोडा वेळ निवांतपणा अनुभवायलाही वेळ मिळत नाही. बहुतांश महिलावर्गाच्या आणि खास करून नोकरदार महिलांच्या तोंडी आढळणारी ही वाक्ये. रोजच्या साचेबद्ध रुटिनचा कंटाळा येणं स्वाभाविक असतं. त्यावर उपाय म्हणून खालील उपाय करुन तर पाहा, निश्‍चितच आपल्याला रुटिनचा कंटाळाही येणार नाही.

सुपर स्टोअर : आपण बर्‍याचदा किराणा दुकानात हव्या असणार्‍या वस्तूंची यादी टाकतो. त्यानुसार दुकानदार किराणा घरपोच करतो; पण या सर्वच वस्तूंची किंमत आपल्याला माहिती हवीच. त्यासाठी महिन्यातून एक फेरी सुपरस्टोअरला असली पाहिजे. त्यामुळे किमतीही कळतात. शिवाय वेगवेगळ्या गुणवत्तेची विविध उत्पादनेही नजरेखालून जातात.

शॉपिंग सेंटर : बाजारात रोज नवी उत्पादने दाखल होत असतात. आता आपल्याकडेही मॉल किंवा शॉपिंग सेंटरचे प्रमाण वाढलेले आहे. महिन्यातून एक फेरी या शॉपिंग सेंटरमध्ये मारल्यास अपडेट राहण्यास मदत होते.

कौटुंबिक वैद्य अर्थात फॅमिली डॉक्टर : महिलांसाठी महिन्यातून एकदा डॉक्टरची भेट घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी किमान महिन्यातून एकदा डॉक्टरची भेट घ्यायला हवी. कारण, घरातल्या सगळ्यांचे आरोग्य स्त्रीच्या हातीच असते. त्यामुळे आपण ठणठणीत असायलाच हवे.

सलून : स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणे ही देखील फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण नीटनेटके, प्रसन्न दिसत नसू तर स्वतःलाच खूप उदास वाटते. त्यामुळे महिन्यातून एकदा स्वतःसाठी वेळ काढून सलूनमध्ये जाऊन स्वतःची निगा राखण्यासाठी वेळ काढला पाहिजे. त्यामुळे आपले आपल्याला छान वाटेल आणि आत्मविश्वास येण्यास मदत
होईल.

हॉटेलिंग : रोजच्या स्वयंपाकातून सुटका म्हणून हॉटेलमध्ये जायचे, हे समीकरण बाजूला ठेवा. पंधरा दिवसांतून-महिन्यातून एकदा मस्त हॉटेलमध्ये जाऊन आपल्याला आवडणारा, खावासा वाटणारा पदार्थ ऑर्डर करा. कधीतरी कुटुंबालाही आपल्या आवडीचे पदार्थ खायला घालून ट्रीट देता येईल.

अम्युझमेंट पार्क : अम्युझमेंट पार्क हा मज्जा करण्यासाठी केव्हाही जाता येईल असा पर्याय आहे. आपण पती आणि मुलांसमवेत जाऊन तेथे एन्जॉय करू शकतो. तसेच रिलॅक्सही होऊ शकतो. यामुळे मुलेही खूश होतात. तसेच तेथील निवांत वातावरणातील काही तासांमुळे कौटुंबिक नातेसंबंंध द़ृढ होतील.

वृद्धाश्रम किंवा अनाथालय : महिन्यातून एखादा दिवस किंवा दिवसातला काही वेळ वृद्धाश्रमात आपण घालवू शकतो. तिथल्या आजी- आजोबांबरोबर थोडा वेळ घालवता, तर त्यांनाही आनंद होतो किंवा अनाथालयातल्या मुलांशी खेळा, त्यांना गोष्टी सांगा. यामुळे आपण कुणाच्या तरी उपयोगी पडलो, याचे मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळेल. या काही गोष्टी केल्यास आपल्याला रुटिनचा कंटाळाही येणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news