साधारणपणे एक ते सात वर्षांपर्यंतच्या मुली फ्रीलचे ड्रेस घातल्यानंतर गोंडस दिसतात. एखादी चार वर्षांची लहान मुलगी फ्रीलचा ड्रेस घालून दुडूदुडू धावत असेल तर तिच्यातला गोंडसपणा सर्वांनाच भावतो. पण आता मात्र फ्रीलच्या ड्रेसला थोडासा नवा लूक देऊन तो मोठ्यांनाही घालता येईल, असा बनवला जाऊ लागला. न्यू लूक म्हणजे फ्रीलचा स्कर्ट, फ्रीलचा टॉप नव्या ढंगात दिसू लागल्यानंतर आपसूकच तरुणाईही तिकडे वळू लागली.
फ्रीलच्या ड्रेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे फेमिनीन लूक देतात आणि तुम्ही याला पार्टीवेअर कॅज्युअल विअरपर्यंत घालू शकता. या प्रकारचे रफल्ड ड्रेस तुम्ही बर्याच डिझाईनमध्ये तयार करू शकता. जसे रफल्ड रँप ड्रेस, सिंगल लेअर रफल्ड ड्रेस, टीर्ड रफल्ड ड्रेस. रफल्ड ड्रेस स्टायलिश लूक तर देतातच, त्याशिवाय तुमच्या बर्याच समस्यांचे निदानदेखील करतात. जसे तुमची बस्ट लाईन स्मॉल असेल तर अशा ड्रेसची निवड करा की ज्यात फ्रील वरच्या बाजूस दिली असेल. जर बस्ट लाईन हेवी असेल तर तुमच्यासाठी अशा प्रकारचे ड्रेस योग्य राहील, ज्यात फ्रील वर्टीकली स्ट्रेट लाईनमध्ये असेल. जर तुम्ही बॉडीच्या खालील भागाला हेवी लूक देण्याचा प्रयत्न करत असाल तर खालच्या बाजूला फ्रील असलेले ड्रेस उपयुक्त ठरतील.
फ्रीलच्या ड्रेसचा अजून एक फायदा असा की, यामध्ये तुम्हाला ज्वेलरीची चिंता करण्याची गरज नसते. हे ड्रेस हेवी ज्वेलरीचे शिवायही चांगला लूक देतात. फ्रीलदार ड्रेसला तुम्ही बर्याच डिझाईन व मटेरियलमध्ये तयार करू शकता. हे हलके कपडे जसे जॉर्जेट, शिफॉन, कॉटन आणि सॅटिनमध्ये जास्त चांगले लूक देतात.