अंबाड्याच्या नाना तर्‍हा | पुढारी

अंबाड्याच्या नाना तर्‍हा

व्यक्तिमत्त्वाला आकर्षक लूक देण्यात केशरचनेचा वाटा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे पूर्वीच्या काळी स्त्रिया अंबाडा घालत असत; पण आता या अंबाड्यातही नवीन नवीन रचना करून उत्तम हेअरस्टाईल करता येते.

ठरावीक काळानंतर व्यक्तिमत्त्वात थोडासा बदल व्हावा, असे प्रत्येकीलाच वाटत असते. एकाच पद्धतीची केशरचना करून काहीसा कंटाळा येतो. म्हणूनच केसांची रचना बदलून आपण व्यक्तिमत्त्वाला एकदम नवे रूप देऊ शकतो; मात्र त्यासाठी थोडेसे प्रयत्न आणि निर्मितीक्षम मन असणे गरजेचे आहे. केसांचा अंबाडा ही त्यापैकीच एक केशरचना. या रचनेमुळे लग्नाच्या समारंभापासून पार्टीपर्यंत आपण अतिशय आकर्षक रूपात वावरू शकतो. अंबाडा घालण्यापूर्वी एक दिवस आधी केसांना चांगल्या प्रकारे शाम्पू करावा. हॉट रोलर किंवा लो ड्रायरच्या मदतीने केस व्यवस्थित बसू शकतात.

इंटरनॅशनल फ्रेंच नॉट हीदेखील खूप आकर्षक केशरचना आहे. यासाठी सर्वात प्रथम दोन्ही कानांच्या दरम्यानच्या केसांचा एक वेगळा भाग करावा. नंतर आयब्रो पॉईंटपासून एक स्क्वेअर सेक्शन काढावा. आता एका बाजूच्या आणि मागच्या केसांची पोनी बनवून घ्यावी आणि दुसर्‍या बाजूचे केस मोकळे सोडावेत. पोनीच्या केसांची लेअर्स काढून त्यांचे बॅक कोम्बिंग करावे. नंतर केसांवर स्प्रे करावा. आता अंबाड्याची नेट घ्यावी. नेटच्या आत पीन लावून ती पोनीच्या आत अडकवावी आणि पोनीचे सारे केस नेटच्या आतमध्ये टाकावेत. आता नेटच्या बाहेरच्या भागात क्रॉस करून पीन लावावी, यामुळे ती सैल होणार नाही. नेट उलटी करून मधोमध आणावी आणि नॉट बांधावा.

आता कानाच्या अर्ध्या सुट्या केसांचे लेअर्सला हलक्या हाताने बॅक कोम्बिंग करावे. या केसांना अंबाड्याच्या वर घेऊन जावे, जेणेेकरून नेट झाकले जाईल. आता पुढच्या भागातील केसांचे बॅक कोम्बिंग करावे आणि मागे आणून त्याची क्रिएटिव्ह डिझाईन बनवावी. यामुळे अंबाड्याला आणखी आकर्षक बनवता येऊ शकते. आणखी एक आकर्षक हेअरस्टाईल म्हणजे रोलिंग बन विथ चोटी. यामध्ये केस पुढच्या आणि मागच्या अशा दोन भागांत विभागावेत. मागच्या भागाच्या केसांची पोनी घालावी. पुढच्या केसांना पुन्हा दोन विभागांत विभागावे. पुढचे केस सोडून मागच्या भागात बॅक कोम्बिंग करावे. मग उंच पफ बनवून मागे पिनअप करावे. आता पुढचे मोकळे केस साईडचा भांग पाडून त्यांना मागच्या बाजूने पिनअप करावे. आता सगळ्या केसांची पोनी बनवावी. पोनीमधून केसांची एक लट काढून तिला बॅक कोम्बिंग करावे आणि नॉन स्टिकी जेल लावून तिचे फिनिशिंग करावे. आता मुळापासून जवळपास चार इंच अंतरावर एक बॉबपिन लावावी आणि कुशलतेने ते केस वळवून त्याचा रोल बनवावा आणि हा रोल पिनेने पॅक करावा. उरलेल्या केसांमध्ये पुन्हा अशाच प्रकारचे रोल बनवावेत. असे चार-पाच लेअर बनवून रोलचा सुंदर अंबाडा बनवता येतो. आता उरलेल्या केसांची वेणी घालून शेवटी रबरबँड लावावे. ही हेअरस्टाईल वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरिजने सजवून परिपूर्ण बनवावी. ट्विस्टिंग अंबाडा हीदेखील एक आकर्षक हेअरस्टाईल आहे. यामध्ये केसांचा पुढच्या भागचा एक चौकोनी भाग वेगळा करावा. बाकी केसांची पोनी बनवावी.

पोनीच्या केसांमधून एक-एक लट काढून ती ट्विस्ट करावी. खालच्या भागाचे थोडेसे केस पकडून ते वर अडकवावे आणि पिन लावावी. अशा प्रकारे केसांच्या आणखी लटा घेऊन ही क्रिया पुन्हा करावी. यामुळे सुंदर फुलासारखे नॉट तयार होईल. आता पुढच्या केसांपासून एक लट काढून बॅक कोम्बिंग करून मागच्या बाजूला ती सेट करावी. आकर्षक अ‍ॅक्सेसरी लावून ही हेअरस्टाईल आणखी सुंदर बनवता येते. सध्या रेट्रो हेअर स्टाईलची फॅशन आहे. यामध्येदेखील दोन्ही कानांमधला केसांचा भाग वेगळा करावा. मागच्या केसांची पोनी बांधावी. आयब्रोज पॉईंटवर स्क्वेअर सेक्शन काढावा. दोन्ही बाजूनी केसांचे बॅक कोम्बिंग करून मागे पिनअप करावे. पुढच्या स्क्वेअर सेक्शनमधील केसांचे बॅक कोम्बिंग करून त्याचा उंच पफ बनवावा. पुढचे थोडेसे केस सोडून द्यावेत. त्याची एक एक बारीक लट वेगळी करून त्याला जेल लावावे आणि पफवर काही तरी आकर्षक डिझाईन बनवावे. आता पोनीच्या केसांमधील एक-एक लेअर घेऊन तिला बॅक कोम्बिंग करावे. टोकाकडचे काही केस घेऊन त्याला पिन लावून केसात अडकवावे. यामुळे सुंदर नॉट बनू शकते. अशा प्रकारे काही हटके हेअरस्टाईल करून आपण व्यक्तिमत्त्वाला वेगळे रूप देऊ शकतो.
– वेदिका कुलकर्णी

Back to top button