‘परफेक्ट दिवसा’चं नियोजन कसे असावे? लक्षात घ्या ‘या’ गोष्टी | पुढारी

‘परफेक्ट दिवसा’चं नियोजन कसे असावे? लक्षात घ्या 'या' गोष्टी

जान्हवी शिरोडकर

आजच्या प्रचंड धावपळीच्या बनलेल्या जीवनात ‘दिवस पुरत नाहीत, दिवस कधी सुरू होतो आणि कुठे संपतो हेच समजत नाही, असे वाटते. दिवसातून चोवीस तासांपेक्षा अधिक तास असावेत’ अशा प्रकारची वाक्ये अनेक महिलांकडून वेळोवेळी ऐकायला मिळतात. सततचे काम आणि ते पूर्ण होत नसल्यामुळे जाणवणारी वेळेची कमतरता यातून ताणतणावाची मालिका सुरू होते.

वास्तविक आपला दिवस साधा, सोपा बनविणे तेवढे अवघड नाही. मात्र, त्यासाठी काही आवश्यक नियम अंगिकारणे गरजेचे आहे आणि दिनक्रमात काही टप्पे ठरवून घेणे गरजेचे आहे. कधी तरी एखादा परफेक्ट दिवस येईल, असा केवळ विचार करून उपयोगाचे नाही तर आपला रोजचा दिवस परफेक्ट बनविणे हे आपल्याच हातात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वप्रथम परफेक्ट दिवसाची आपली कल्पना काय आहे, हे ठरवावे. ज्या दिवशी आपण काही लिहू शकू, ध्यान-धारणा करू शकू, पती आणि मुलांबरोबर वेळ घालवू शकूल, अशाप्रकारे प्रत्येकाची परफेक्ट दिवसाची कल्पना वेगवेगळी असू शकते. त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे ते आधी ठरवावे.

एकदा हे जाणून घेतल्यानंतर परफेक्ट दिवस बनविणे, त्या दिवशी काय करणे गरजेचे आहे हे समजल्यानंतर अतिरिक्त कमिटमेंटस्ना नाही म्हणणे शिकले पाहिजे. कारण नसताना कुठलेही काम हाती घेऊ नये, मग हे काम घरी असो किंवा ऑफिसमध्ये. अमूक एक करतोय म्हणून आपणही ते केले पाहिजे, असे अजिबात करू नये.

कामे मर्यादित करावीत आणि योग्य कामांची निवड करावी. रोज सकाळी उठल्यानंतर महत्त्वपूर्ण कामांची यादी बनवा. त्यानंतर दिवसातून कोणती कामे करण्याची आधी गरज आहे अशी कामे बाजूला काढावीत. इतर कामे यादीमधून काढून टाकावीत. एकूण पाच ते सात कामांची यादी असली पाहिजे. यादीतील प्रत्येक काम झाल्यानंतर त्यावर गोल करायला वा बाजूला फुली मारायला विसरू नका. आपण एकाच दिवसात सर्व काही करू शकत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

हे सगळे झाल्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण कामासाठी आपण कोणती वेळ निवडली आहे हे सर्वप्रथम बघावे. ती निवडली नसली तर आधी निवडावी. ठरविलेल्या वेळेत तेच काम करावे. टी.व्ही., इंटरनेट किंवा फोन यापैकी कुठलीही गोष्ट त्यावेळी करू नये. ते काम झाल्यावर वेळ मिळाला तर दुसर्‍या कामाकडे वळावे.

कामे पूर्ण करण्याच्या नादात आपण दिवसभर धावतच असतो. त्याऐवजी थोडे संथ व्हावे, आपला वेग कमी करावा. एका नंतर एक ताबडतोब सगळी कामे केली नाहीत तर आयुष्य त्याच क्षणी संपेल असे समजू नये. तुमच्याकडे वेळ असेल तर थोडे थांबावे, काही वेळ हास्यविनोदात, गप्पांमध्ये घालवावा आणि एक काम संपल्यानंतर दुसरे काम सुरू करण्यापूर्वी थोडा एन्जॉय करावा. असे करणे हा टाईमपास नसून पुढील कामांसाठीची ऊर्जा त्यातून मिळत असते. त्यामुळे या कामांमध्ये चुका घडण्याची शक्यताही कमी होते, हे लक्षात घ्यावे. सध्या मल्टिटास्किंगचे फॅड आलेले आहे. मात्र, मल्टिटास्किंग बंद करावे. सुरुवातीला असे करणे अवघड होऊ शकते, कारण एकाचवेळी अनेक कामे करण्याची अनेकींना सवय असते. मात्र, हळूहळू त्याचा अभ्यास करावा.

डोक्यात दुसर्‍या कामाचे विचार सुरू असले तरी हात मात्र एका कामापुरतेच मर्यादित ठेवावेत. असे करण्याने जी कामे पूर्ण होतात, त्याकडे पुन्हा बघायची वा ती दुरुस्त करण्यासाठी वेळ खर्ची घालण्याची वेळ येत नाही. दिवसभरात कोणकोणती छोटी कामे करायची आहेत, त्याची एक वेगळी यादी बनवावी. ती छोटी कामे महत्त्वाच्या कामामध्ये येऊ देऊ नयेत. खूप सारी छोटी-छोटी कामे करायची असली तर त्याचे गट पाडावेत आणि प्रत्येक गटातील कामे वेगवेगळ्या वेळी करावीत.

तसेच रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यापासून या कामांच्या पूर्ततेचा तणाव मनावर येऊ देऊ नये. कारण रोज यादी बनवणे, त्यातील कामे संपवणे ही एक अव्याहत प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्यावे. कामाच्या नोंदींसाठी एक डायरी ठेवावी आणि महिनाअखेरीस याचा आढावा घ्यावा. त्यातून आपल्या कार्यक्षमतेविषयीचा अंदाज येतो.

Back to top button