Raksha Bandhan 2023 | यंदाच्या राखीला सन्मान दे रे बहिणीला, सन्मान दे रे प्रत्येक स्त्रीला | पुढारी

Raksha Bandhan 2023 | यंदाच्या राखीला सन्मान दे रे बहिणीला, सन्मान दे रे प्रत्येक स्त्रीला

- डॉ. सुधा कांकरिया

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशभरात आनंदाने, उत्साहाने साजरा होत असतो. आपल्याकडे रक्षाबंधनाच्या परंपरेला अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार आपली एक पत्नी सोडून इतर सर्व स्त्रिया आपल्या भगिनीसमान आहेत, अशी शिकवण आहे. त्यामुळेच अगदी मुलगीदेखील वडिलांना राखी बांधू शकते. ही शिकवण म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे. मनाची शुद्धता किंवा व्यक्तीमधील पवित्रता टिकवण्यासाठी राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. राखी पौर्णिमेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो, त्याचबरोबर तिच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. (Raksha Bandhan 2023)

आपल्या संस्कृतीत मुलगा आणि मुलगी या दोन्हींमध्ये समानता ठेवली आहे. मनाची शुद्धता आणि सामाजिक पवित्रता जपणे हा या सणाचा गर्भितार्थ आहे. ही मूळ शास्त्राची बैठक मधल्या काळात पुसली गेली. आधुनिक काळात फक्त रूढी, चालीरिती, परंपरा या माध्यमातून ती टिकून राहिली आहे; पण त्यामागची मूळ भावना मात्र लोप पावत चालली आहे.

आज समाजाचा महिलांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन दूषित झाला आहे. या द़ृष्टिकोनामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनीच ते करणे आवश्यक आहे. सर्व महिलांकडे बहीण म्हणून पाहणे, त्यांच्याविषयी स्नेहपूर्ण आदर बाळगणे आणि प्रत्येकीला आदरसन्मान देणे ही आजच्या काळाची गरज आहे. धार्मिक सण, उत्सव साजरे करताना त्यांच्या साजरीकरणामध्ये रमून न जाता त्या सणांचे प्रयोजन आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्या अंगाने केले गेले आहे, त्यामागचा सामाजिक आणि परंपरागत आशय काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तो समजून घेतला तर या सण-उत्सवांची कालातीतता लक्षात येईल. रक्षाबंधन तर या यादीमध्ये सर्वांत अग्रणी असेल. या सणाचा खरा अर्थ समजून घेऊन त्यानुसार वर्तणूक करण्याचा संकल्प सर्वांनी सोडायला हवा. राखी पौर्णिमा सण साजरा करताना बहिणींनी भाऊरायाकडे वेगळ्या स्वरूपाची मागणी केली पाहिजे. त्याबाबत मी म्हणेन –

यंदाच्या राखीला, एवढेच मागणे भावाला,
वाचव रे चिमुकलीला, जगव रे मुलीला,
सन्मान दे रे बहिणीला, सन्मान दे रे प्रत्येक स्त्रीला,

अशी मागणी सर्वच बहिणींनी आपल्या भावाकडे केली पाहिजे. याचे कारण समाजात स्त्रियांवरील अत्याचाराच्या ज्या विकृत घटना घडताहेत त्या रोखण्यासाठी केवळ मुलींना सक्षम करण्याची आवश्यकता नसून मुलांमध्येही वैचारिक परिवर्तन घडवून आणले पाहिजे. त्यांच्या भावना बदलण्यासाठी संस्कारक्षम वयातील मुलांमध्ये, महाविद्यालयातील मुलांमध्ये, इंटरनेटच्या अधीन जाणार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणे गरजेचे आहे. संस्कारांचीही एक शक्ती असते. ती शक्ती कुटुंबाबरोबरच शाळा आणि समाज यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शाळेतूनच समानतेचा, स्त्रियांविषयीच्या स्नेहपूर्ण आदरभावाचा संस्कार केला गेल्यास त्याचा भविष्यात चांगला उपयोग होईल. समाजामध्ये सर्वत्र जर हे स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार पोहोचले, रुजले आणि त्यानुसार वर्तणुकीत परिवर्तन घडून आले तर स्त्री संरक्षणाच्या कायद्यांची गरजच उरणार नाही. रक्षाबंधनाच्या निमित्ताने या संस्कारबीजांची पेरणी करण्याचा संकल्प सर्वांनी मिळून करूया. (Raksha Bandhan 2023)

Back to top button