खाराच्या मिरच्या, जाणून घ्या रेसिपी | पुढारी

खाराच्या मिरच्या, जाणून घ्या रेसिपी

साहित्य : अर्धा किलो जाड मोठ्या व कमी तिखट मिरच्या, 100 ग्रॅम मोहरीची डाळ, एक वाटी मीठ, केप्र किंवा प्रवीणचा मिरची मसाला एक पाकीट, एक डझन लिंबे, 50 ग्रॅम आले, एक वाटी तेल, फोडणीसाठी मोहरी, हळद, हिंग व मेथीची पूड.

कृती :

प्रथम मिरच्या धुवून व स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करून घ्याव्यात व विळीवर चिरून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चार लिंबाच्या फोडी करून घ्या. आल्याचे विळीवर किंवा सुरीने अतिशय बारीक तुकडे करून घ्या. मोहरीची डाळ तेलात चांगली

फेटून घ्या. एका परातीत किंवा स्टीलच्या थाळ्यात मिरच्यांचे तुकडे, आल्याचे तुकडे, लिंबाच्या फोडी, फेटलेली मोहरीची डाळ, मिरची मसाला व मीठ घालून ते मिश्रण मोठ्या चमच्याने हलवून चांगले एकजीव करून घ्या व एका स्वच्छ व कोरड्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरा.

गॅसवर कढईत वाटीभर तेल घेऊन चांगले कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, हळद, हिंग व मेथीची पूड घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर बरणीत भरलेल्या मिरच्यांवर ओता व चमच्याने हलवून बरणी झाकून एका स्वच्छ फडक्याने बांधून कपाटात ठेवा. दोन-तीन दिवसांनंतर बरणी उघडून पुन्हा एकदा चमच्याने हलवून तोंडी लावणे म्हणून खायला द्या.

हेही वाचा : 

Back to top button