चेहर्‍यानुसार हवी केशरचना | पुढारी

चेहर्‍यानुसार हवी केशरचना

वेगवेगळ्या चेहरापट्टीस कोणती केशरचना योग्य ठरते, ते पाहू!

अंडाकृती आकाराचा चेहरा : अंडाकृती अर्थात ओव्हल शेप चेहर्‍यावर अनेक प्रकारच्या आधुनिक हेअरस्टाईल करता येतात. मात्र, साधारण प्रकाराची त्याचप्रमाणे सिंगल लेन्थ कट हेअरस्टाईल अधिक चांगली दिसते. अशा चेहर्‍यावर गालावर मोठ्या बटा कधीच सोडू नयेत.

गोल आकाराचा चेहरा : गोल आकाराच्या चेहर्‍यावर लहान केस अधिक चांगले दिसतात. अशा केसांसाठी वरच्या बाजूने केस विंचरा. मध्यभागी भांग पाडण्याऐवजी कानाच्या बाजूने भांग पाडल्यास शोभून दिसेल. सगळे केस एक करून विंचरल्यास चेहरा अधिक मोहक दिसेल. चेहर्‍यावर थेट ओघळणार्‍या किंवा कानाच्या बाजूला अधिक बटा सोडू नका.

आयताकृती चेहरा : आयताकृती चेहर्‍यासाठी लहान तसेच मध्यम लांबीची केशरचना करू शकता. भरपूर केसांसाठी उपयुक्त अशी ही केशरचना सौंदर्याला शतगुणित करतात; मात्र अशा चेहर्‍यावर खूप लांब केसांची हेअरस्टाईल करू नये.

त्रिकोणी आकाराचा चेहरा : अशा आकाराच्या चेहर्‍याच्या तरुणींनी लहान हेअरस्टाईलची निवड करावी. मध्यभागी भांग पाडण्याऐवजी बाजूला भांग पाडून केस विंचरावेत. त्रिकोणी आकाराच्या चेहर्‍यावर कानशिलापर्यंत केस भुरभुरणारी हेअरस्टाईल चांगली दिसेल; मात्र या केसांच्या बटा ओठांजवळ लहान आकाराच्या ठेवाव्यात.

चौकोनी आकाराचा चेहरा : या आकाराचा चेहरा असणार्‍या तरुणींनी लहान किंवा मध्यम लांबीची केशरचना निवडावी. चेहर्‍याच्या चहुबाजूने काहीशी असमान किंवा गोलाकार कापलेली केशभूषासुद्धा अनुभवून पाहावी. मध्यभागी भांग न पाडता चेहर्‍यावर वलयांकित बटा सोडून वरच्या बाजूला जुन्या हिंदी सिनेतारकांप्रमाणे उंच भासणारी केशभूषा केल्यास चेहरा अधिक मोहक दिसेल; मात्र शक्यतो लांब आणि सरळ जाणारी हेअरस्टाईल टाळावी. लिनियर किंवा पातळ, सरळ बटा सोडू नका.

डायमंड शेप चेहरा : डायमंड शेप अर्थात लांब चौकोनी चेहर्‍यावर बहुतांश सगळ्याच हेअरस्टाईल शोभतात. गळ्यामागे मानेवर भरपूर केसांची आणि शक्यतो लहान आकाराची हेअरस्टाईल निवडा. लांब बटा टाळा आणि केस एकत्र करून उंच अंबाडा किंवा पोनीटेलसुद्धा बांधू नका.

– मृणाल सावंत

Back to top button