असे ठेवा फर्निचर, पुस्तके आणि पडदे..! | पुढारी

असे ठेवा फर्निचर, पुस्तके आणि पडदे..!

घरसजावटीमध्ये फर्निचर, पुस्तकांची ठिकाणे आणि घरांचे पडदे याला खूप महत्त्व असते. हे नीटनेटके ठेवले, तर घराचा माहौलच बदलून जातो. घर एकदम सुंदर आणि नीटनेटके वाटून घराला चांगला लूक येतो. त्यासाठी काही खालील गोष्टींचे पालन केल्यास सुंदर घर ही कल्पना सत्यात उतरते.

खोलीतील टीव्ही व म्युझिकसाठीचे कपाट व इतरही फर्निचर बोजड करू नये. कमी उंचीचे व कमी खोली असणार्‍या फर्निचरमुळे आहे ती जागा मोठी वाटते. टीव्हीसाठी ट्रॉली ठेवली तरीही हरकत नाही. कारण, युनिट केले की, ते टीव्हीसाठी उगाचच मोठे करावे लागते. सोफासेट अथवा दिवाण हे रात्री पलंग म्हणून उपयोगात आणता येतील, असेच करावेत. त्यांची उंची कमी ठेवावी व त्यावरील कापडाचे डिझाईन प्लेन रंगाचे असावे. त्याचप्रमाणे सोफा अमेरिकन पद्धतीचे न घेता लाकडाच्या हातांचे लहान व खाली जमिनीला न टेकणारे घ्यावेत म्हणजे खालून फरशी स्वच्छ ठेवता येते.

शोभेच्या वस्तू व कुटुंबीयांचे कलागुण ज्यातून दिसून येतात. अशा वस्तू या खोलीत जरुर ठेवाव्यात; पण सर्व वस्तू एकाच वेळी दाखवण्याचा हट्ट नसावा. आपल्याचसाठी एखाद्या दिवाणाच्या खालच्या ट्रॉलीमध्ये या वस्तूंसाठी संग्रह करून ठेवावा. वस्तू आलटून पालटून लावण्यामुळे घराच्या सजावटीत कायम नावीन्य राहते. स्वतंत्र ग्रंथघर असले, तरी काही निवडक पुस्तके दिवाणखान्यात जरुर मांडावीत.

संबंधित बातम्या

पडद्यांची निवड करताना फार डिझाईन्सचे कापड न घेता प्लेन आवडत्या रंगांचे कापड घ्यावे. सध्या कॉटनचे तयार पडदे बाजारात आकर्षक रंगात मिळतात व ते स्वस्तही असतात आणि सुंदर दिसतात. खोलीतील खिडक्यांचीही उंंची कमी-अधिक असली, तरी सर्व पडदे जमिनीपर्यंत जाणारे पूर्ण उंचीचेच घ्यावेत, म्हणजे खिडक्यांमधील उंचीतील फरक झाकला जातो व खोलीही उंच वाटते. आजकाल पडद्यांऐवजी रोलर ब्लाईंड, वेनेशियन ब्लाईंट असे अनेक प्रकार मिळतात जे खिडकीच्या फ—ेमच्या आत बसतात. दिवाण किंवा सोफ्याच्या मागे लागून खिडकी येत असेल, तर यांचा उपयोग चांगला होतो.

– प्रांजली देशमुख

Back to top button