शिल्लक अन्न पुन्हा वापरताना… | पुढारी

शिल्लक अन्न पुन्हा वापरताना...

रोजचं जेवण आपण अगदी काही तोलून-मापून बनवत नाही. कधी कुणी जेवत नाही, तर कधी काही कारणांनी जास्त बनतं. अशा वेळी शिल्लक राहिलेलं जेवण फेकून द्यायचं? आपल्या मनाला हे पटत नाही. हेच अन्न दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी वापरलं तर…? हाच चांगला पर्याय आहे. फक्त ते नीट ठेवलं गेलं नाही, तर मात्र त्याचा धोका जास्त आहे. तोही थेट आरोग्याला. ते कसं ठेवता येईल, याच्या काही टिप्स…

वर्गवारी करा, पॅकिंग महत्त्वाचं

जेवणातले कोणते पदार्थ शिल्लक आहेत, त्याची वर्गवारी करा. भाजी, पोळीबरोबरच काकडी, गाजर, मुळा यासारख्या फळभाज्या ठेवताना थेट भांड्यात ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवू नका. बाऊलमध्येही उघडे तसेच ठेवू नका. भाजी हवाबंद आणि पाणी किंवा कोणताही सूक्ष्म कीटक आत जाणार नाही अशा भांड्यात ठेवा. फ्रिजमध्ये ठेवण्याआधी ते पुन्हा गरम करा. पण फ्रिजमध्ये ठेवताना ते भांडे गरम नाही ना, याची खात्री करा. पोळ्या ठेवताना त्या कोर्‍या पेपरमध्ये गुंडाळा व नंतर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवा. ज्यामुळे त्याला पाण्याचा संपर्क येणार नाही व खराब होणार नाही. हे सर्व पुन्हा वापरताना अर्थातच गरम करून घेणं आवश्यक.

बेकरी पदार्थ, मिठाई…

खाण्याच्या पदार्थांबरोबरच बेकरीतील पाव, ब—ेड आदी पदार्थ शक्यतो पॅकबंद प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवा. दुसर्‍या दिवशी वापरताना ते बटर किंवा तुपाबरोबर गरम करून घ्यावेत. हे पदार्थ बारा तासांच्या आतच वापरावेत. त्यानंतर ते खाऊ नयेत. मिठाई किंवा दुुधापासून बनवलेल्या इतर गोड पदार्थांबाबतही अधिक काळजी घ्यायला हवी. दुकानांतून मिळालेले हे बॉक्स पाण्यापासून लांब व फ्रिजमध्ये ठेवू नयेत. हे पदार्थ ते बनवलेल्या दिवसांपासून दोन दिवसांच्या आत खाणंच जास्त चांगलं. त्यानंतर ते खाऊ नयेत. ते ठेवताना जिथे ठेवले आहेत, ती जागा स्वच्छ व कोणत्याही सूक्ष्म कीटकांपासून सुरक्षित आहे ना, याची खात्री करून घ्यावी. कारण हे पदार्थ जेवढे चांगले तेवढेच ते असुक्षितरीत्या वापरणं धोकादायक आहे.

तापमान नियंत्रित ठेवा

मटण, मासे, अंडी किंवा तत्सम अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवताना मात्र ते व्यवस्थित पॅक करून स्वतंत्रपणे ठेवावेत. एका पदार्थाचा वास दुसर्‍याला लागू नये, याची काळजी ते ठेवताना घ्यायला हवी. हे पदार्थ ठेवताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे हे पदार्थ ठेवल्यापासून फि—जचं तापमान नियंत्रित आहे ना. कारण मध्येच बराच काळ वीजपुरवठा खंडित झाला असेल, तर हे मांसाहारी पदार्थ खराब होतात किंवा ते खाण्यायोग्य राहात नाहीत. मुळातच उष्ण असलेले हे पदार्थ थंड तापमानात ठेवताना ते नियंत्रित तापमानात ठेवणे म्हणूनच जास्त गरजेचे असते. असे अन्नपदार्थ ठेवताना सर्वांत महत्त्वाचं लक्षात ठेवा की कोणताही पदार्थ कितीही चांगला राहिला असला, तरी त्याला दोन दिवसांपेक्षा जास्त दिवसांनंतर खाऊ नका.

आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज थोडं तरी जेवण किंवा काही अन्नपदार्थ शिल्लक राहतातच. ते फेकून देणंही जीवावर येतं. त्याऐवजी ते व्यवस्थित ठेवून दुसर्‍या दिवशी त्याचा वापर करता येणं शक्य आहे. ते ठेवायला मात्र व्यवस्थित हवं.

Back to top button