Old calendar : जुन्या कॅलेंडरचे काय कराल? | पुढारी

Old calendar : जुन्या कॅलेंडरचे काय कराल?

वर्ष सरले की घरातल्या भिंतीवरची कॅलेंडर किंवा दिनदर्शिकाही बदलते. बर्‍याचदा काही कामासाठी आपण जुन्या वर्षांची दिनदर्शिका तशीच ठेवतो. कधी या दिनदर्शिकेवरील मोहक चित्रांसाठीही आपण ती जपून ठेवतो, पण किती दिवस ठेवणार? या कॅलेंडरच्या पानांचा पुनर्वापर करू शकतो. थोडीशी कल्पकता वापरून आपण या कॅलेडरमधून काही गोष्टी तयार करू शकतो.

फोटो स्टँड : आपल्याकडे बर्‍याचदा टेबलावर ठेवण्याचे कॅलेडर असते. त्याचा वापर आपण फोटो स्टँड म्हणून करु शकतो. दर काही दिवसांनी त्यातील फोटो बदलून आपण त्यात नावीन्यही आणू शकतो. त्यामुळे त्यावर नजर गेली की काही आठवणी मनात तरळून जातील.

बुकमार्क : जुन्या कॅलेंडरची पाने जर ग्लॉसी जाड असतील तर बुकमार्क म्हणून आपण यांचा छान वापर करू शकतो. कॅलेंडरवर असलेल्या चित्रांमधूनच हे बुकमार्क तयार होऊ शकतात. कॅलेंडरचा कागद फार जाड नसेल तर या कागदाच्या मागे पुठ्ठा लावावा किंवा आपल्याकडे येणार्‍या बॉक्सचा कार्डबोर्डही आपण यात वापरू शकतो.

भिंतीवर चित्रे ः हल्ली कंपन्यांची किंवा संस्थाची कॅलेंडर्स खास पद्धतीने तयार करून घेतली जातात. त्यांवर अनेकदा मान्यवर व्यक्तींची छायाचित्रे किंवा प्रसिद्ध चित्रकाराची चित्रे असतात. ती आपल्याला खूप आवडतात, त्यामुळे ती कॅलेंडर्स जपली जातात. वास्तविक, या चित्रांची फोटोंची फ—ेम करून ती भिंतीवर लावली तर घराची वेगळी सजावट होऊ शकते.

पेपर बॅग : पर्यावरणाचा विचार केला तर एका कॅलेंडरच्या निर्मितीसाठी अनेक झाडे कापली गेलेली असतात. काही कॅलेंडरचा कागद पातळ असतो. अशा कॅलेंडरचे काय करावे असा प्रश्न उरतो. त्याच्या पेपर बॅग्ज बनवता येतात. वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या पेपर बॅग बनवून त्या रोजच्या कामातही वापरता येतील. कमी वजनाच्या, हलक्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी अशा पेपरबॅग्ज नक्कीच कामी येतात.

    – अपर्णा देवकर

Back to top button