मोहन दाते
चंद्र ग्रहण पर्व काळ या विषयी दाते पंचांगकर्ते यांनी 'दै. पुढारी'ला याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, कार्तिक शु. १५, ८ नोव्हेंबर 2022, मंगळवारी ग्रस्तोदित चंद्रग्रहण ग्रहण सुरू होणार आहे आणि याची वेळ १४:३९ ग्रहण मध्य – १६:३० ग्रहण मोक्ष – १८:१९ अशी आहे. या वेळा संपूर्ण भारताकरिता आहेत, असेही ते म्हणाले.
या देशात दिसणार ग्रहण
भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिका या प्रदेशात ग्रहण दिसेल.
या ग्रहणाचा स्पर्श भारतात नाही
चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजेच ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल. हे ग्रहण सूर्यास्तानंतर थोडावेळ दिसेल.
हा आहे पुण्यकाल
सूर्यास्तापासून सायंकाळी ६:१९ पर्यंत थोडावेळच या ग्रहणाचा पुण्यकाल आहे.
ग्रहणाचा वेध पाळावेत
ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी 8 नोव्हेंबरच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ६:१९ पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी ११ पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेध काळात भोजन करु नये असे आहे. मात्र वेध काळात देव पूजा, श्राद्ध, कुलधर्म, कुलाचार पूजन , पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग इ गोष्टी करता येतील . फक्त सूर्यास्तानंतर ६.१९ पर्यंत वरील पैकी कृत्ये करु नयेत असे धर्मशास्त्र सांगते. सायं ६.१९ नंतर मोक्ष स्नान करुन भोजन आदी गोष्टी करता येतील.
तुलसी विवाह
पौर्णिमेचे दिवशी मंगळवारी (दि. 8) तुलसी विवाह समाप्ति आहे. दि. 8 नोवेंबर रोजी मंगळवारी चंद्रग्रहण असल्याने सायंकाळी ६:१९ नंतर म्हणजे ग्रहणमोक्ष झाल्यावर स्नान करुन नंतर तुलसी विवाह करता येईल.
कार्तिकस्वामी दर्शन
कार्तिकस्वामी दर्शन नाही. या वर्षी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग होत नसल्याने कार्तिकस्वामी दर्शन योग मिळत नाही.