

human hair trade India China 'केस घेणार… केस, 500 रुपये पावशेर केस!' अशी साद घालणारा मोटारसायकलवरील फेरीवाला तुम्ही अनेकदा पाहिला असेल; पण कधी तुम्ही विचार केलाय का? हे विक्रेते हे केस विकत घेऊन कुठे घेऊन जातात. हे विक्रेते आपल्या महिलांचे विंचरताना गळलेले तुटलेले केसच विकत घेतात. पूर्वी केसांवर फुगे असे म्हटले जायचे कारण याला किंमत नव्हती पण अलिकडील फॅशन बाजारपेठेने याच क्षुल्लक केसांना सोन्याचा भाव आणला आहे. याचा खरा सुत्रधार आहे आपला शेजारी चिन, आणि चिनमध्ये सर्वाधिक कच्चा माल जातो भारतातातून.
भारतीय महिलांच्या लांबसडक, काळेभोर आणि घनदाट केसांनाजागतिक हेअर मार्केटमध्ये त्यांना प्रचंड मागणी आहे. या सुंदर केंसांवर चिनमध्ये मोठी प्रकीया करुन जागतिक बाजारपेठेतून हजारो कोंटीचा नफा कमावण्याचे काम होते. भारतीय केसांपासून स्कँडिनेव्हियन महिलांसाठी 'ॲश-ब्लॉन्ड' विग, रशियन महिलांसाठी 'ऑबर्न' एक्स्टेंशन आणि आफ्रिकन-अमेरिकन ग्राहकांसाठी काळ्या-तपकिरी रंगाचे वेफ्ट (केसांच्या पट्ट्या) तयार केले जातात.
६० टक्के हेअर प्रॉडक्ट चिनचे
चीनमधील झुचांग (Xuchang) शहराला खरोखरच जगाची 'विग कॅपिटल' म्हटले जाते, जिथून जगभरातील ६० टक्क्यांहून अधिक हेअर प्रॉडक्ट्सचा पुरवठा होतो. भारताकडे जगातील सर्वोत्तम दर्जाचे केस विशेषतः दक्षिण भारतातील तिरुपतीसारख्या मंदिरांतून मिळणारे कोणतेही रसायन न वापरलेले यांना 'रेमी हेअर’ म्हटले जाते. यांना जास्त मागणी आहे. चिनमध्ये या केसांच्या मार्केटची उलाढाल दरवर्षी १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असते. झुचांग सोबत किंगदाओ (Qingdao), शेंडोंग प्रांत येथे उच्च दर्जाचे आणि हाताने विणलेले (Hand-tied) मानवी केसांचे विग तयार केले जातात. तसेच हेझे (Heze), हे शहर कच्च्या केसांचा पुरवठा आणि केसांवर प्राथमिक प्रक्रिया करण्याचे मोठे केंद्र आहे. ग्वांगझोउ (Guangzhou), येथे मोठ्या प्रमाणावर विगची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.
९,००० कोटी रुपयांची भारतात उलाढाल
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताने सुमारे ९४ कोटी डॉलर (९,००० कोटी रुपयांहून अधिक) किमतीचे मानवी केस निर्यात केले. यामध्ये २८.७ कोटी डॉलरचे कच्चे केस आणि ६५.२ कोटी डॉलरच्या सेमी-प्रोसेस्ड केसांचा समावेश आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील ग्रामीण भागांत हजारो महिला कामगार हे केस गुंता सोडवून सरळ करण्याचे काम करतात.
चीन आहे खरा खेळाडू
विग निर्यातदारांच्या मते, भारतातील सुमारे ९८ टक्के कच्चे केस अधिकृतपणे म्यानमारला पाठवले जातात. तिथे प्राथमिक प्रक्रिया झाल्यानंतर हे केस चीनच्या हेनान प्रांतातील 'झुचांग शहरात जातात. एक प्रीमियम विग बनवण्यासाठी केस विंचरून सरळ करणे, ते एकाच दिशेने ठेवणे, ब्लीचिंग करणे, रंगवणे (Dye) करणे आवश्यक असते.चीनमध्ये लाखो कारागीर दशकांपासून याच कामात प्रशिक्षित आहेत. भारतात मात्र या स्तरावरील प्रक्रिया आणि सूक्ष्म विणकाम करणाऱ्या कुशल कारागिरांचे मोठे जाळे अद्याप तयार झालेले नाही.
प्रोसेसिंगमध्ये चिन फारच पुढे
कच्च्या केसांचे विगमध्ये रूपांतर करण्यासाठी विशिष्ट प्रकारची रसायने, ॲसिड बाथ आणि यंत्रसामग्रीची गरज असते, जेणेकरून केसांचा गुंता होऊ नये आणि ते वर्षानुवर्षे चमकदार राहावेत. या अत्याधुनिक प्रक्रियेचे तंत्रज्ञान आणि रसायनांची पुरवठा साखळी चीनकडे अत्यंत स्वस्त आणि प्रगत स्वरूपात उपलब्ध आहे.चीनचे मॉडेल 'क्लस्टर' पद्धतीवर काम करते. झुचांग शहरात एकाच ठिकाणी धागा, लेस, गोंद (ग्लू), पॅकेजिंग बॉक्स, यंत्रसामग्री आणि निर्यात एजंट—सर्व काही उपलब्ध आहे. यामुळे तिथे उत्पादनाचा खर्च खूप कमी येतो. विगमध्ये खर्च कमी ठेवण्यासाठी खऱ्या केसांसोबत उच्च दर्जाचे सिंथेटिक फायबरही मिसळले जाते. हे विशिष्ट फायबर प्रामुख्याने जपान, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये तयार होते. भारताला हे फायबरदेखील आयात करावे लागते.
भारत कुठे कमी पडतो
भारत या कामात अजून खूप मागे आहे. अलिकडे चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता येथील काही नवीन कंपन्या आणि स्टार्टअप्स आता स्वतः विग आणि हेअर एक्स्टेंशन तयार करून थेट अमेरिका व युरोपमध्ये निर्यात करत आहेत. पण भारतातील हेअर एक्स्पोर्ट व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणावर असंघटित असून तो लहान व्यापाऱ्यांच्या हातात आहे. त्यांना कच्चा किंवा अर्ध-प्रक्रिया केलेला माल विकून तात्काळ रोख रक्कम मिळते, त्यामुळे विग बनवण्याचा कारखाना उभारण्याची जोखीम ते पत्करत नाहीत. मोठे कॉर्पोरेट उद्योगसमूह किंवा गुंतवणूकदार या क्षेत्राला 'अपरंपरागत' मानून यात पैसा गुंतवण्यास कचरतात. चिनी कंपन्यांनी युरोपमधील अनेक देशांमध्ये जेथे हे विग विक्री होतात तिथे स्वतःची गोदामे आणि डिजिटल मार्केटिंग नेटवर्क उभारले आहे. भारतात केसांचे संकलन दक्षिण भारतात (चेन्नई, हैदराबाद, तिरुपती) होते, तर थोडीफार प्रक्रिया पश्चिम बंगाल किंवा उत्तर भारतात केली जाते. एकाच ठिकाणी संपूर्ण यंत्रणा नसल्यामुळे वाहतूक आणि निर्मितीचा खर्च वाढतो.
तिरुपतीमधून गोळा होतात १० टक्के केस
भारतातून निर्यात होणाऱ्या केसांमध्ये ९० टक्के वाटा 'गोली' म्हणजेच कंगव्यात अडकून गळालेल्या केसांच्या गुच्छ्यांचा असतो. हे केस घरे, सलून आणि न्हाव्यांच्या दुकानांतून गोळा केले जातात. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात दररोज सुमारे १ लाख भाविक येतात. 'कल्याणकट्टा' या सभागृहात भाविक श्रद्धेने केस दान करतात. मात्र, व्यवसायाच्या दृष्टीने प्रत्येक केसांचे मूल्य वेगळे असते. तसेच भारतात गोळा होणाऱ्या एकूण केसांपैकी १० टक्के केस हे येथून गोळा होतात.
लांबी आणि रंग: लिलावात २७ इंच आणि त्याहून अधिक लांब, तसेच १९ ते २६ इंच लांबीच्या काळ्या केसांना सर्वाधिक दर मिळतो. पांढऱ्या किंवा रंगवलेल्या केसांना कमी किंमत मिळते. लहान केसांचा वापर: ५ इंचांपेक्षा लहान केसांचा वापर प्रामुख्याने खत (Fertilizer) निर्मितीसाठी केला जातो.
भारतात केसांच्या सरासरी किमती (दोन वर्षांपुर्वी)
फेरीवाल्यांनी गोळा केलेले केस : 2,000 ते 4,000 रुपये प्रतिकिलो.
पार्लर्समधून जमा केलेले (फक्त महिलांचे लांब केस) : 4,000 ते 8,000 रुपये प्रतिकिलो.
मंदिरातील दानांमधून मिळवलेले केस : 8,000 ते 20,000 रुपये प्रतिकिलो
कच्चा माल आपला, नफा चीनचा
चीन भारतीय केस खरेदी करून किंवा तस्करीद्वारे मिळवून त्यावर प्रक्रिया करतो आणि तयार विग व एक्स्टेंशन अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेत चढ्या दराने विकतो. कच्चा माल भारत पुरवतो, चीन त्यावर प्रक्रिया करतो आणि पाश्चात्त्य देश त्यासाठी मोठी किंमत मोजतात.