

how to protect plants from drying heat wave using gardening expert cheap trick home remed
पुढारी ऑनलाईन : मे-जूनच्या कडक उन्हाचा आणि तीव्र उष्णतेचा परिणाम फक्त माणसांवरच नाही, तर बिचाऱ्या झाडांवरही मोठ्या प्रमाणात होतो. गरम वारे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे या काळात हिरवीगार झाडेसुद्धा कोमेजून सुकू लागतात. अनेकदा लोकांना या हंगामात झाडांची काळजी कशी घ्यावी हे समजत नाही आणि नकळत अशा चुका होतात की झाड पूर्णपणे मरून जाते.
गार्डनिंग एक्सपर्ट्सनी या प्रचंड उष्णतेपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना पुन्हा ताजेतवाने व हिरवेगार बनवण्यासाठी ६ अतिशय सोपे आणि मोफत देशी उपाय सांगितले आहेत. हे उपाय वापरून तुम्ही कोणताही खर्च न करता तुमचा होम गार्डन वाळण्यापासून वाचवू शकता. चला तर मग, हे उपाय योग्य पद्धतीने कसे वापरायचे ते जाणून घेऊया.
ग्रीन नेट किंवा कापडाचा वापर
तीव्र उन्हापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सावलीच्या ठिकाणी हलवा. जर झाडे हलवणे शक्य नसेल, तर गार्डनवर ‘ग्रीन नेट’ लावा. पैसे खर्च करायचे नसतील तर घरातील जुनी सूती साडी, धोतर किंवा पातळ चादर वापरून झाडांवर सावली तयार करा. हा मोफत उपाय झाडांना थेट उन्हापासून वाचवेल.
वेस्ट कार्डबोर्डने करा मल्चिंग
मल्चिंग ही अशी पद्धत आहे ज्यामुळे कुंडीतील मातीतील ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि पाणी लगेच वाफ होऊन उडून जात नाही. यासाठी बाजारातून काही विकत आणण्याची गरज नाही. घरात येणाऱ्या सामानाच्या रिकाम्या कार्डबोर्डचे छोटे तुकडे करा.
हे तुकडे कुंडीतील मातीवर सर्व बाजूंनी पसरवा आणि त्यावर हलके पाणी शिंपडा. त्यामुळे सूर्याची उष्णता थेट मातीपर्यंत पोहोचणार नाही आणि माती थंड राहील.
संध्याकाळी करा मिस्टिंग
दररोज सूर्यास्तानंतर झाडांच्या पानांवर आणि खोडांवर पाण्याचा हलका फवारा मारा. यासाठी स्प्रे बाटली किंवा पाईपचा वापर करू शकता. संध्याकाळी मिस्टिंग केल्याने झाडांच्या आसपासचे तापमान कमी होते, त्यांना आवश्यक ओलावा मिळतो आणि ती रात्रीभरात पुन्हा ताजी होतात.
जड खतांचा वापर टाळा
अनेकांना वाटते की झाड सुकत असेल तर त्यात जास्त खत घालावे, पण ही मोठी चूक आहे. प्रचंड उष्णतेत झाडांना कोणतेही जड खत देऊ नका. उष्णतेमुळे झाडे आधीच तणावाखाली असतात, त्यामुळे जास्त खत दिल्यास मुळे जळू शकतात. या काळात फक्त थंड स्वरूपातील खत, जसे शेणखत पाण्यात भिजवून त्याचे द्रवरूप अगदी कमी प्रमाणात वापरू शकता.
रिपॉटिंग आणि छाटणी करू नका
उन्हाळ्यात झाडांमध्ये कोणताही मोठा बदल करणे टाळा. या काळात झाडांची रिपॉटिंग करू नका, कारण त्यामुळे मुळे हवेत उघडी पडून पटकन सुकतात. तसेच झाडांची छाटणी किंवा कटिंगही बंद ठेवा. झाडांना त्यांची उरलेली ऊर्जा जपून ठेवू द्या, कारण नवीन कटिंगमुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण येतो.
सुकलेल्या झाडाला लगेच फेकू नका
जर प्रचंड उष्णतेमुळे एखाद्या झाडाची सर्व पाने गळून पडली असतील किंवा ते वरून पूर्ण कोरडे दिसत असेल, तरी ते लगेच मेले आहे असे समजू नका. अनेक झाडे तीव्र उष्णतेत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ‘डॉर्मन्सी’ म्हणजेच सुप्तावस्थेत जातात. अशा झाडांची सुकलेली पाने काढून टाका, त्यांना सावलीत ठेवा आणि हलके पाणी देत राहा. पावसाळ्यात ते पुन्हा हिरवेगार होऊ शकते.