

hotel safety rules one minute finger test do enter room protect your privacy
पुढारी ऑनलाईन : प्रवासाची आवड आहे आणि कोणत्याही हॉटेलमध्ये चेक-इन केल्यानंतर आरामात झोपायला जाता? मग थांबा. तुमची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी एक छोटीशी मिरर टेस्ट नक्की करा. यामुळे तुमच्या खोलीतून कोणी लपून डोकावत तर नाही ना, याची प्राथमिक कल्पना येऊ शकते.
शहराबाहेर जायचे असेल तर राहण्यासाठी हॉटेल हा सर्वात आरामदायी पर्याय असतो. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच मऊ गादी पाहून दिवसभराचा थकवा दूर होतो आणि तुम्हाला कोणी त्रासही देत नाही. मात्र, एक छोटीशी चूक तुमच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. खोलीची स्वच्छता, वाय-फाय आणि आवश्यक वस्तू तपासल्यानंतर एक मिनिटाची मिरर टेस्ट जरूर करा. प्रवासादरम्यान घेतलेली ही खबरदारी तुमची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.
काय आहे 1 मिनिटाची मिरर टेस्ट?
वन मिनिट मिरर टेस्टबद्दल इंटरनेटवर सहज माहिती मिळते. या पद्धतीचा वापर दोन बाजूंनी दिसणाऱ्या आरशाची शक्यता तपासण्यासाठी केला जातो. काही ठिकाणी हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा बाथरूममध्ये असे आरसे बसवलेले असू शकतात, ज्यांच्या पलीकडील बाजूने खोलीतील व्यक्ती दिसू शकते.
अशा आरशांमध्ये अतिशय पातळ रिफ्लेक्टिव्ह कोटिंग असू शकते. त्यामुळे एका बाजूने आरसा सामान्य दिसतो, तर दुसऱ्या बाजूने त्यामागील भाग दिसण्याची शक्यता असते. हॉटेलच्या खोल्या आणि बाथरूममध्ये अशा प्रकारे कोणीतरी डोकावणे ही गंभीर प्रायव्हसीची समस्या ठरू शकते.
कशी कराल 1 फिंगर मिरर टेस्ट?
वन फिंगर मिरर टेस्ट करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या बोटाचे टोक आरशाच्या पृष्ठभागावर हलकेच ठेवा.
बोटाच्या टोकामध्ये आणि आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबामध्ये थोडी जागा दिसत असेल, तर तो सामान्य आरसा असण्याची शक्यता असते. कारण त्याचे रिफ्लेक्टिव्ह कोटिंग साधारणपणे काचेच्या मागील बाजूस असते.
जर तुमचे बोट आणि त्याचे प्रतिबिंब कोणत्याही अंतराशिवाय एकमेकांना स्पर्श करत असल्यासारखे दिसत असेल, तर तो फ्रंट-सर्फेस मिरर असू शकतो. मात्र, अशा आरशाला थेट टू-वे मिरर समजणे योग्य नाही.
फक्त फिंगर मिरर टेस्ट पुरेशी नाही
तज्ज्ञांच्या मते, केवळ बोटाच्या मदतीने केलेली टेस्ट करून आरसा टू-वे किंवा सर्व्हिलन्स मिरर आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. ही पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या विश्वासार्ह चाचणी मानली जात नाही. आधुनिक काळातील आरसे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जात असल्यामुळे सामान्य आरशांमध्येही सर्व्हिलन्स मिररसारखे प्रतिबिंब दिसू शकते.
आवाजाच्या प्रतिबिंबातून तपासा
फिंगर टेस्ट पुरेशी नसल्यामुळे आरशामागे काही संशयास्पद आहे का, हे तपासण्यासाठी इतर गोष्टींकडेही लक्ष द्या. उदाहरणार्थ, आरशावर हलक्या हाताने ठोका.
जर आरशामागून पोकळ जागेसारखा आवाज किंवा प्रतिध्वनी ऐकू आला, तर त्या भागाच्या पलीकडे दुसरी खोली किंवा मेंटेनन्स एरिया आहे का, हे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून तपासून घ्या. काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित हॉटेल मॅनेजमेंटकडे तक्रार करा.
लाइट टेस्ट करून पाहा
आरशाबद्दल संशय असल्यास आणखी एक प्राथमिक चाचणी करता येते. खोलीतील दिवे बंद करून मोबाईलची फ्लॅशलाइट किंवा टॉर्च आरशावर टाका.
बारकाईने पाहिल्यास आरशाच्या पलीकडील भाग दिसतो का, हे तपासता येऊ शकते. काहीतरी विचित्र किंवा संशयास्पद जाणवल्यास स्वतःहून आरसा काढण्याचा किंवा त्याला नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी तातडीने हॉटेल मॅनेजमेंटला कळवा आणि आवश्यक असल्यास दुसरी खोली मागा.