

EPFO new rules in 2025
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांनी २०२५ मध्ये सदस्यांसाठी पाच महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. हे बदल डिजिटल सुविधा वाढवण्यावर, प्रक्रिया सुलभ करण्यावर आणि पारदर्शकता निर्माण करण्यावर केंद्रित आहेत. या नव्या सुधारणा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि बचतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. जाणून घ्या हे पाच मुख्य बदल...
आता EPFO प्रोफाइल अपडेट करण्याची प्रक्रिया अधिक जलद व कागदपत्रमुक्त झाली आहे. जर तुमचा UAN आधारशी लिंक असेल, तर तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचे नाव आणि नोकरी सुरू होण्याची तारीख ऑनलाइन सुधारू शकता.
टीप: ज्यांचे आधार (UAN) १ ऑक्टोबर २०१७ पूर्वी तयार झाले आहेत, त्यांना काही बदलांसाठी कंपनीकडून मंजुरी घ्यावी लागू शकते.
नोकरी बदलताना PF ट्रान्सफर ही पूर्वी वेळखाऊ व गुंतागुंतीची प्रक्रिया होती. मात्र १५ जानेवारी २०२५ पासून ही प्रक्रिया EPFO ने अधिक सुलभ केली आहे. आता बहुतेक प्रकरणांमध्ये कंपन्यांची मंजुरी आवश्यक नाही, फक्त तुमचा UAN आधारशी लिंक आणि तपशील बरोबर असणे आवश्यक आहे. यामुळे PF ट्रान्सफर वेळेत पूर्ण होईल व बचतीचा सातत्याने लाभ मिळू शकेल.
१ जानेवारी २०२५ पासून EPFO ने Centralized Pension Payment System (CPPS) लागू केली आहे. या प्रणालीमुळे आता पेन्शन थेट NPCI प्लॅटफॉर्मद्वारे कोणत्याही बँक खात्यात जमा केली जाईल. पूर्वीच्या PPO हस्तांतरण प्रक्रियेचा त्रास संपला असून, सर्व PPO आता आधारशी (UAN) लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पेन्शनधारक डिजिटल जीवन प्रमाणपत्र सहज सादर करू शकतील.
EPFO ने जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन घेण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. जर एखाद्याचा पगार ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तो जास्त योगदान करत असेल, तर त्याला त्या पगारावर पेन्शन मिळू शकते. खाजगी ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांनाही आता EPFO च्या नियमांचे पालन करावे लागेल, त्यामुळे नियम सर्वांसाठी समान होतील.
१६ जानेवारी २०२५ रोजी EPFO ने संयुक्त घोषणापत्र (Joint Declaration) सुधारण्याचे नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले. यामुळे चुकीची किंवा अपूर्ण माहिती दुरुस्त करणे आता अधिक सोपे झाले आहे. यामुळे दावे अधिक जलद आणि पारदर्शक पद्धतीने निकाली काढले जातील, आणि EPFO च्या सेवांचा अनुभव अधिक चांगला होईल.