Self-Study : स्वअध्ययनातून गुणवत्ता वाढवा

Self-Study : स्वअध्ययनातून गुणवत्ता वाढवा

– प्रा. शुभांगी कुलकर्णी

एखादा खासगी क्लास किंवा शिकवणीत बराच काळ घालवूनही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास किंवा अभ्यास वाढलेला आपल्याला बरेचदा दिसून येत नाही. असा अनुभव अनेकांना आला असेल. वास्तविक, विद्यार्थ्यांनी स्वत: ठरवून अभ्यास केला तर आत्मविश्वासाला बळ मिळते.

घरातच चिंतन आणि मनन करून एकचित्ताने अभ्यास केला तर विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत फरक जाणवतो. कोणी शिकवण्यापेक्षा तोच धडा किंवा अभ्यास स्वत:च केला तर समजून घ्यायला आणि समजायला अधिक सोपे जाऊ शकते. दुसर्‍या संकल्पनेतून समजून घेतलेली गोष्ट आणि स्वत:च्या संकल्पनेतूनच समजून केलेला अभ्यास यात बरेच अंतर आहे. शाळेत शिकवलेल्या धड्यांचे किंवा कवितांचे पुन्हा वाचन करून त्यात स्वअध्ययन केल्यास त्याचा निश्चित सकारात्मक परिणाम जाणवतो. अभ्यासाची उजळणी एखाद्या शिकवणीत किंवा खासगी क्लासमध्ये करण्यापेक्षा स्वत:च करण्यावर भर देणे गरजेचे आहे. स्वअध्ययनाच्या काही पद्धती आपण येथे जाणून घेऊ या.

चर्चा : एखादा धडा किंवा नोटस्ची उजळणी केल्यानंतर त्यावर घरात आपल्या मित्रांशी, भाऊ-बहिणीशी किंवा पालकाशी चर्चा करावी. जेणेकरून आपण वाचलेल्या गोष्टी किती लक्षात राहतात, याची पडताळणी होते. तसेच चर्चेतून आपल्याला नवीन मुद्दे मिळू शकतात. तेही मुद्दे आपल्या अभ्यासाला पूरक ठरू शकतात. चर्चेतून अभ्यासाविषयी बर्‍याच अडचणी सुटू शकतात.

सराव पेपर सोडवणे : विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीचे पेपर सोडवणे कधीही हितकारक ठरू शकते. कारण, पेपर पॅटर्न आणि प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्याला समजू शकते. एकच प्रश्न प्रत्येकवेळी कशा पद्धतीने विचारला गेला आहे, याची चाचपणी करता येते. काही प्रश्न आलटून पालटून विचारले जातात. त्याचीही माहिती आपल्याला कळते. संपूर्ण विषयावर प्रश्नपत्रिका असल्याने एकप्रकारे संपूर्ण अभ्यासाची उजळणी होते.

शैक्षणिक कार्यक्रम पाहणे : टीव्हीवर विशेषत: खासगी वाहिन्यांवर शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण होते. कधी कधी हे कार्यक्रम आपल्या अभ्यासाला पूरक असतात. अशा कार्यक्रमाची माहिती घेऊन ते नियमित पाहणे आपल्याला उपयुक्त ठरू शकते. केवळ काही संकल्पना वाचून समजल्या नाही तर द़ृश्य स्वरुपात चटकन समजू शकतात. त्यावेळी शैक्षणिक कार्यक्रम आपल्याला हातभार लावतात.

समजलेल्या गोष्टी लिहणे : स्वअध्ययनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समजलेल्या गोष्टी लिहून काढणे आहे. एखादा धडा किंवा संकल्पना वाचली असेल तर ती आपल्या शब्दांत लिहून काढणे उपयुक्त ठरू शकते. यामुळे लिखाणाचा वेगही वाढण्यास मदत होते.

नोटस्ची पडताळणी : स्वअध्ययनातून काढलेल्या नोटस् आणि शाळेत सरांनी दिलेल्या नोटस् याची पडताळणी करावी आणि त्यानुसार आपल्या अभ्यासात त्याचा अंतर्भाव करावा. स्वअध्ययनातील ही आदर्श पद्धती मानली जाते. शाळेतून नव्या काही गोष्टींची माहिती मिळते, तर स्वत:च्या नोटस्मधून काही प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न आपण सरांना विचारून त्यांचे निरसन करू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news