नोकरीसाठी अर्ज करताय? ‘ही’ माहिती ठरेल उपयुक्‍त

नोकरीसाठी अर्ज करताय? ‘ही’ माहिती ठरेल उपयुक्‍त

[author title="राधिका बिवलकर" image="http://"][/author]

नोकरीसाठी अर्ज करताना तो कसा असावा, याबाबत आपल्याला अनेकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. बोटावर मोजण्याइतक्या जागेसाठी शेकडो अर्ज येतात. अशा अर्जांतून आपला अर्ज निवडला जाईल, याची खात्री किंवा शाश्वती देता येत नाही. जेव्हा एखाद्या पोस्टसाठी आपण अर्ज करतो, तेव्हा सर्व अर्जधारकांची/उमेदवारांची पात्रता सारखीच असते. किंबहुना, काही जण उच्चविद्याविभूषित असतात. अशावेळी आपला अर्ज अन्य अर्जदारांच्या तुलनेत उठावदार कसा दिसेल, यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. नोकरीची सर्वांनाच गरज असते, सर्वच हुषार असतात आणि अशावेळी येणारेही अर्जही तितकेच आकर्षक, सुटसुटीत, सूत्रबद्ध पद्धतीचे असतात. त्यातही आपले कौशल्य सिद्ध करण्याची गरज असते. अर्ज करताना पारंपरिक मांडणी, शब्दरचना, शब्दांची द्विरुक्ती टाळल्यास अर्जाच्या मूल्याला वजन येते. यासंदर्भात आपण काही गोष्टी लक्षात घेऊ…

प्रभाव : अर्जात आपण मेहनती, कष्टाळू किंवा प्रामाणिक अशा शब्दांचा उल्लेख करतो. हा उल्लेख सर्वार्थाने सर्वच अर्जदार आपल्या बायोडेटामध्ये करत असतात. त्यामळे कंपनीला तेच तेच शब्द वाचून कंटाळा येतो आणि अर्जदारात असणारा 'स्पार्क' दिसत नाही. कोणाचा अर्ज निवडावा, कोणाचा नाकारावा, या गोंधळात पडतात. अशावेळी लायक, पात्र अर्जदाराचा अर्जही पारंपरिक ठेवणीमुळे बाद ठरवला जाऊ शकतो. याउलट 'प्रभावी' हा शब्द अधिक जोरकस आणि ठोस वाटतो. अशाप्रकारच्या शब्दांचा उल्लेख केला, तर अर्जदाराच्या शब्दसंग्रहाची झलक पाहावयास मिळते. कंपनीला किंवा संस्थेला असा अर्ज निवडताना कोणताही किंतु मनात राहत नाही.

कल्पकता : प्रत्येक जण आपल्या अर्जात कुशाग्र, कल्पक अशा शब्दांचा उल्लेख करताना दिसून येतात. नवीन कंपनीत कोणकोणत्या कल्पना अंमलात आणू शकतो, याची पुसटशी कल्पना आपण बायोडेटातून देत असतो. क्रिएटिव्हिटीचा स्किल म्हणून वापर करण्याची गरज आहे. उदा., 'क्रिएटेड द फस्ट एव्हर वेबसाईट फॉर द कंपनी' असा उल्लेख करता येऊ शकतो. आपण कसे क्रिएटेड आहोत, हे कंपनीच्या निदर्शनास येणे आवश्यक आहे.

लाँचड् : बायोडेटा किंवा उमेदवारी अर्जातून आपली मते किंवा भावना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आणि शब्द उपलब्ध आहेत. वाचकाला कंटाळवाणे वाटणार नाही, असे क्रियापद वापरू नका. हे शब्द निवडकर्त्यांनी हजारवेळेस पाहिलेले आणि ऐकलेले असतात. नोकरीत काम करताना निवडला जाणारा संभाव्य उमेदवार कशा पद्धतीने छाप पाडू शकतो, याची माहिती कंपनीला हवी असते. ती माहिती आपण बायोडेटामधून अचूक आणि योग्य शब्दांतून द्यायला हवी.

इंप्रूव्हड् : नोकरीच्या अर्जात अमुक दिवसांत प्रगती किंवा बदल करून दाखवतो, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. कंपनीत नवनवीन प्रयोग करून आपण काही दिवसांत कंपनीच्या कामकाजात बदल झालेला दिसेल, असे आपण ठासून सांगतो. अशावेळी शब्दरचना करताना डेव्हलपड किंवा इनक्रिजडऐवजी इंप्रूव्हड् या शब्दाचा वापर अधिक चपखल बसतो. हा शब्द आपली योग्यता, दर्जा सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

रिझॉलव्हड् : आपल्या उमेदवारी अर्जात कंपनीत येणार्‍या संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे म्हणतो किंवा जुन्या कंपनीत अमुक प्रश्न निकाली काढले किंवा सोडवले, असे सांगतो. नव्या कंपनीत प्रवेश करताना वास्तविकपणे आपण प्रश्नांची उकल किंवा सोडवणूक केली असेल तरी तुम्हाला अडचणींचे किंवा प्रश्नांचे सखोल ज्ञान आहे आणि त्याची तुम्ही उकल सहजगत्या करू शकता, असा त्यातून अर्थ काढला जातो. तेव्हा सकारात्मक बाबींचा उल्लेख करून प्रश्नाची उकल केली जात असल्याचे सांगून आपली बाजू मजबूत ठेवावी.

मॅनेजड् : 'मॅनेजड्' या शब्दाचा वापर करून आपण मॅनेजरचे पद मिळवू शकत नाही. परंतु, छोट्या छोट्या प्रयत्नांतून मोठे ध्येय साध्य करण्याची तयारी असणारी व्यक्ती मोठ्या पदांपर्यंत पोहोचू शकते, हे ध्यानात घेतले पाहिजे. कंपनीत दररोज येणार्‍या असंख्य ग्राहकांचे मन कसे वळवू शकतो, हे जर आपण अर्जात पटवून दिले तर आपला नोकरीचा अर्ज अधिक वास्तवतेकडे जाणारा ठरू शकतो. तणावाच्या वातावरणातही आपण 'कूल' राहून एखादे काम कसे यशस्वीरीत्या पार पाडू शकतो, याबाबतची माहिती आपण बायोडेटात द्यायला हवी. नोकरीचा चांगला अर्ज हा आपल्याला रोजगाराची चांगली संधी उपलब्ध करून देऊ शकतो. तेथेच आपण टाळाटाळ किंवा कंटाळा केला, तर आपली संधी चुकण्याचीच शक्यता अधिक असते. याचाच अर्थ असा की, नोकरीच्या ठिकाणी अर्ज करताना तो वाचनीय आणि आकर्षक कसा ठरेल, याची खबरदारी घ्यायला हवी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news