टेक्सटाईल डिझायनिंगमध्ये कारकीर्द करण्यास मोठा वाव | पुढारी

टेक्सटाईल डिझायनिंगमध्ये कारकीर्द करण्यास मोठा वाव

टेक्सटाईल डिझाईन करताना विणकामापासून ते विविध प्रकारच्या धाग्यांचे आणि धाग्यांचे एकत्रीकरण यांचे ज्ञान असले पाहिजे. टेक्स्टाईनल डिझायनिंगमध्ये कारकीर्द करण्यास मोठा वाव मिळू शकतो.

टेक्सटाईल डिझायनर हा फॅशन डिझायनरसारखाच काम करतो. त्यामध्ये आपल्या कल्पनेनुसार, कलाकुसरीनुसार विविध नक्षी कापडावर साकारता येते. त्यासाठी कापड कसे विणले जाते, याचे ज्ञान मिळवून कोणते धागे एकत्र विणले जाऊ शकतात, याचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. टेक्सटाईल डिझाईनमध्ये कारकीर्द करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

फॅशन, स्टाईल आणि मुख्य कापडाची जाण आहे आणि काही तरी वेगळे करून पाहायचे असेल, तर टेक्सटाईल डिझाईनचे करिअर हा उत्तम पर्याय आहे. टेक्सटाईल डिझाईनच्या क्षेत्रात परदेशातही काम करू शकता. या क्षेत्रात पैसेही भरपूर मिळतात.

टेक्सटाईल डिझायनर असलेली व्यक्ती ही बहुतांशवेळा फॅशन डिझायनरप्रमाणेच काम करते. कापडावर विविध प्रकारची नक्षी करताना आपली सर्जनशीलता पेश करावी लागते; पण कापडाच्या विणण्यापासून विविध धाग्यांचे एकत्रीकरण करण्याचेही ज्ञान पाहिजे.

डिझायनिंग म्हणजे काय : टेक्सटाईल डिझायनरला कापड, त्यावरील छपाई, रंगकाम, कशीदाकारी आणि डिझाईन प्रक्रिया सर्वांचे योग्य, चांगले ज्ञान असले पाहिजे. कापडाचे धागे, सूत यांची माहिती, त्यांचा इतिहास, ते कधीपासून वापरात आले आदी सर्व गोष्टींची माहिती असली पाहिजे.

त्याव्यतिरिक्त कापड विणकामाविषयीचे तांत्रिक ज्ञानही असले पाहिजे. सूतकताईसाठी चरखा चालवता आला पाहिजे, विविध धाग्यांचे मिश्रण करता आले पाहिजे. एक टेक्सटाईल डिझायनर आपली क्रिएटिव्हिटी वापरून विविध प्रकारची नक्षी कपड्यावर प्रत्यक्षात उतरवतो. डिझायनर म्हणून जितक्या वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता तेवढीच आपली डिझाईन्स यशस्वी होतात, पर्यायाने आपण यशस्वी होतो.

डिझाईन करण्यासाठी डिझायनिंगमधील संशोधनाचा अनुभव असणेही महत्त्वाचे आहे, कोणत्या प्रकारच्या डिझाईनला महत्त्व आहे, हे डिझायनरला माहीत असले पाहिजे. या सर्व गोष्टी जमून आल्यास तो टेक्सटाईल डिझायनर म्हणून उत्तम व्यवसाय करू शकेल. त्यात फॅशन ट्रेंड, रंग आणि धागा यांच्यासह अनेक गोष्टींचा समावेश होतो.

डिझायनिंगचे स्वरूप : टेक्सटाईल डिझायनर कापडाचे रंग, विणकाम अशा अनेक गोष्टींवर काम करतात. डिझाईन स्टुडिओमध्ये डिझायनरला दीर्घकाळ नक्षीचे नमुने आणि डिझाईन्स तयार करावे लागतात. कोणतेही नवीन डिझाईन करण्यासाठी कपड्याच्या रंगाची पार्श्वभूमी आणि डिझाईनची संकल्पना समजून घ्यावे लागते.

कारण, एखादे उत्पादन बाजारात लोकप्रिय होईल की नाही हे सर्व त्या कापडाच्या डिझायनिंगवर अवलंबून असते. डिझायनरला विविध प्रकारच्या कलाकुसरीमध्ये रस असला पाहिजे किंवा त्याचे ड्रॉईंग चांगले असले पाहिजे. त्याला चलतीत असलेल्या फॅशनची जाण असली पाहिजे. या सर्व गोष्टीं डिझायनरकडे असतील, तर त्याची कारकीर्द नक्कीच यशस्वी होऊ शकते.

अनिल विद्याधर

Back to top button