Vocational Courses : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना…

Vocational Courses
Vocational Courses

बहुतेक विद्यार्थ्यांच्यासमोर सध्या प्रश्न हाच असतो की, पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे, इंजिनिअरिंग, मेडिकल, सी.ए., सीएस् इत्यादीसाठी प्रवेश मिळू शकला नाही; तर त्यानंतर व्यावसायिक आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांपैकी आणखी काय उत्तम असू शकते?
कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यापूर्वी स्वतः काही प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत आणि त्याद्वारे स्वतःच्या क्षमता जाणून घ्याव्यात.

आपली परिस्थिती आणि कौटुंबिक समस्यांमुळे आपल्याला नोकरीची खरोखरच आवश्यकता आहे का? आपल्या व्यावसायिक शिक्षणाचा खर्च करण्याइतकी कुटुंबाची आर्थिक क्षमता आहे का? बहुतेक विद्यार्थी कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करतात, जेणेकरून काही वर्षांनंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीचे उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतील. परंतु, काही अभ्यासक्रमांचे शुल्क खूपच जास्त असते. म्हणूनच कुठल्याही अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी त्याची फी, कॅम्पस प्लेसमेंट आणि आपली आर्थिक परिस्थिती अतिशय विचारपूर्वक पद्धतीने जाणून घ्यावी. मगच अभ्यासक्रमाची निवड करावी.

कुठलाही अभ्यासक्रम वाईट नसतो. कारण सर्व क्षेत्रात सर्व प्रकारच्या लोकांची मागणी नेहमीच असते. म्हणून सर्वप्रथम आपल्याला नेमका कोणता कोर्स करायचा आहे, हे निश्चित करावे.

योग्य कोर्स निवडण्यापूर्वी आपण स्वतःची आवड, आर्थिक स्थिती आणि आगामी काळात त्याची मागणी किती आहे, याचा अवश्य विचार करावा. आता करिअर क्षेत्रामध्ये मिळणार्‍या संधींचे वर्गीकरण अशा प्रकारे झाले आहे की ज्यामुळे प्रत्येकालाच आपल्या क्षमता, आवडीनुसार अनेक प्रकारचे करिअर पर्याय उपलब्ध होताहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल, कॉम्प्युटर यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये तीन ते पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तम वेतन असणारी सरकारी किंवा खासगी नोकरी मिळवता येऊ शकते.

एखाद्या संस्थेत जर विशिष्ट प्रकारचा कोर्स करायची इच्छा असेल, तर सर्वप्रथम त्या संस्थेबाबत संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. काही विद्यार्थी संस्थेच्या माहितीपत्रकावर आधारित असणार्‍या कॅम्पस प्लेसमेंटला खरे मानतात. परंतु, मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि नोकरी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या बघून कुठलाही निर्णय घ्यावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news