दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जावे, याबद्दल पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये शंका असतात. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, पालकांची आर्थिक स्थिती, दहावीनंतर तीन वर्षांच्या अभ्यासानंतर आपल्याच परिसरात मिळणारी नोकरीची संधी, अपडेटेड अभ्यासक्रम या सर्व बाबींचा विचार करता डिप्लोमा इंजिनिअरिंग ही दहावीनंतरच्या करिअरसाठीची चांगली संधी ठरू शकते.
याबाबत खालील मुद्दे महत्त्वाचे आहेत.
उद्योग क्षेत्राची गरज ओळखून तयार केलेला अभ्यासक्रम :
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ म्हणजेच एमएसबीटीई, मुंबईच्या माध्यमातून डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी अभ्यासक्रम तयार केला जातो. बदलते तंत्रज्ञान, इंडस्ट्रीची गरज या सर्व गोष्टी लक्षात घेऊन डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगी चांगली कौशल्ये यावीत, याद़ृष्टीने हा अभ्यासक्रम तयार केला जातो. यामध्ये त्या-त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षक, इंडस्ट्रीमधील एक्स्पर्टस् तसेच अभ्यासक्रम पूर्ण केलेले माजी विद्यार्थी या सर्व घटकांकडून सूचना घेऊन हा अभ्यासक्रम केला जातो. त्यामुळे डिप्लोमा करणार्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण अभियांत्रिकी ज्ञान या निमित्ताने मिळते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंडस्ट्री
व्हिजिटस् आणि ट्रेनिंग : विद्यार्थी हा डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थ्याला इंडस्ट्रीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी घडत आहेत. कोणते नवे तंत्रज्ञान वापरले जाते याची माहिती मिळावी म्हणून द्वितीय वर्ष पूर्ण केल्यानंतर सहा आठवड्यांचे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग पूर्ण करणे हे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर इंडस्ट्रीमधील एक्स्पर्टस् यांचे मार्गदर्शनपर लेक्चरर्स हे त्या-त्या पॉलिटेक्निकमध्ये आयोजित केले जाते. तसेच विषयांच्या गरजेनुसार प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट आयोजित केल्या जातात.
अभ्यासक्रमाची फी आणि मिळणार्या स्कॉलरशिप :
या सर्व अभ्यासक्रमांची फी शासनाच्या समितीकडून निर्धारित केली जाते. साधारणपणे 45 हजार ते 65 हजार एवढी फी या अभ्यासक्रमांसाठी असल्याचे आढळून येते. प्रत्येक पॉलिटेक्निकसाठी फीची ही रक्कम बदलते; पण शिष्यवृत्तीचा विचार करता शासनाकडून अगदी 100 टक्के ते 50 टक्क्यांपर्यंतची फी सवलत विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. त्यामुळे सर्वसाधारण तसेच ओबीसी अशा प्रवर्गांसाठी वार्षिक आठ लाखांपर्यंत उत्पन्न असेल, तर प्रत्यक्षात प्रत्येक वर्षी भरावी लागणारी फी ही 25 ते 35 हजार या दरम्यान होते. याचा विचार करता सर्वसाधारण तसेच ओबीसी या प्रवर्गांसाठी साधारपणे एक लाख फी मध्ये डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. तर एस.सी., एस.बी.सी., व्ही.जे.एन.टी. आदी प्रवर्गांसाठी पूर्ण फी माफ होण्याबरोबरच मेंटेनन्स भत्ता आणि परीक्षा फीसाठी सुद्धा शासनाकडून रक्कम उपलब्ध होते. तसेच काही पॉलिटेक्निकमध्ये बुक बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके सुद्धा उपलब्ध करून दिली जातात.
विविध योजनेतून मिळणारा वसतिगृह भत्ता : शासनाच्या माध्यमातून विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी भत्तासुद्धा दिला जातो. सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतून उत्पन्नाच्या आधारावर तसेच अल्पभूधारक, नोंदणीकृत मजूर अशा काही अटींचा समावेश करून आठ हजार ते वीस हजार एवढा भत्ता दिला जातो. एस.सी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक लाखाची उत्पन्न मर्यादा आणि मागील परीक्षेत 50 टक्के गुण या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून वर्षाला 48 हजार 500 रुपये इतका भत्ता मिळतो. तसेच स्वयंम योजनेतून धनगर समाजासाठी अडीच लाख उत्पन्न मागील परीक्षेत 60 टक्के गुण याचा विचार करून वर्षाला 48 हजार 500 रुपये इतका भत्ता दिला जातो.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन करिअर करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे.
प्राचार्य डॉ. महादेव नरके