बर्याचजणांना दहावी, बारावीनंतर गुण चांगले असतात, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा, हा प्रश्न असतो. तो प्रश्न सोडवायचा तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल जाणून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला कुठल्या विषयात करिअर करायचे आहे, हे समजून घेणे तसेच कुठल्या विषयातली अभिरुची, योग्यता व क्षमता आहे हे पाहणेही महत्त्वाचे आहे. क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता कुणी एखाद्या शाखेकडे विद्यार्थी-विद्यार्थिनीला ढकलणे साफ चुकीचे आहे. पालकांनी आपल्या आवडींचा व अपेक्षांचा त्यांच्यावर दबाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनीच डॉक्टर, इंजिनिअरिंगचा अट्टाहास ठेवू नये. चांगले मार्क्स मिळवणारी मुलेही आर्टस्कडे वळत आहेत हेही लक्षात घ्यायला हवे. पुढील टिप्स त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर ठरू शकतील.
आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे तपासून बघा : आपला स्वभाव कसा आहे, आपण एखाद्या मोठ्या ग्रुपबरोबर एकटे काम करू शकतो का, आपल्याला ऑर्डर घेऊन काम करता येईल की आपण ऑर्डर देऊन दुसर्यांकडून काम करवून घेता येईल, स्वतःच्या नवीन आयडिया आपण वापरू शकतो की दुसर्याने आखून दिलेल्या रस्त्यावरून चालणे आपल्याला सोपे जाईल याचा अंदाज घ्या.
आपली आवड कशात आहे हे तपासा : आवड असलेल्या गोष्टी माणूस हातासरशी पूर्ण करू शकतो. उदाहरणच घ्यायचे तर, जर तुम्ही पाककलेत निपुण असाल तर हॉटेल मॅनेजमेंट हा उत्तम पर्याय आहे, पण तुम्ही त्याऐवजी वेगळेच क्षेत्र निवडले तर तुम्हाला त्यात रस वाटणार नाही. ज्यात आवड नसते त्या गोष्टी करणे प्रत्येकाच्या जीवावर येते.
आपली पैशाविषयीची कल्पना काय आहे- समुपदेशक असे सांगतात की, पैसा हा खरे तर करिअर नक्की करण्याचा विषय असू नये. तुमच्याकडे योग्य त्या स्किल्स असतील तर पैसा हा आपोआपच तुमच्याकडे येणार आहे. आपण कोणते करिअर निवडतो त्यावर आपल्याला कोणती नोकरी मिळते हे अवलंबून आहे.
आपण कशात प्रवीण आहोत, हे तपासा : आवड कशात आहे हे कळल्यावर त्यात कोणकोणत्या विभागात आपली हातोटी आहे ते उमजून घ्या. हार्ड स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स यापैकी कशात आपण पारंगत आहोत ते तपासा.
आपली बलस्थाने कोणती आहेत हे जाणा : आपले आपण निरीक्षण करा. स्वतःचा कल ओळखा. आपण लहानपणापासून कशात पारंगत आहोत, कोणत्या गोष्टी आपण सहजसाध्य करतो हे बघा. त्याच प्रकारचे क्षेत्र निवडले गेल्यास तुम्ही जास्त जोमाने काम करू शकाल आणि यशही मिळवू शकाल.
आपल्याला कशा प्रकारचे शिक्षण घेणे गरजेचे आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करा : तुमच्याकडे वेळ कमी असल्यास किंवा जबाबदार्या जास्त असल्यास लवकरात लवकर पूर्ण होणारे अभ्यासक्रम निवडणे योग्य.
– सुचित्रा दिवाकर