ऑर्गनायझर : एक खुणावते करिअर | पुढारी

ऑर्गनायझर : एक खुणावते करिअर

विधिषा देशपांडे

तुम्हाला लोकांबरोबर काम करायला आवडते का? तुमच्यामध्ये उद्योजकतेचे मूळ आहे का? मग व्यावसायिक व्यवस्थापक म्हणजेच ऑर्गनायझर म्हणून करिअरचा उत्तम पर्याय आपल्यापुढे आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य असेल तर तुमच्यासाठी एक चांगला करिअरचा पर्याय आहे ऑर्गनायझर.

* रिक्रुटर : कंपनीचा रिक्रुटर म्हणून काम करताना नोकरीसाठी हुशार कर्मचार्‍यांची निवड करावी लागेल. कंपनीत काम करण्यायोग्य, हुशार मनुष्यबळाची पारख करण्याचे काम रिक्रुटर करतो. यासाठी आपल्यामध्ये व्यावसायिक नातेसंबंध जपणे, विश्लेषण करणे, मोठे लक्ष्य मांडणे यासारखे कौशल्यही हवे.

* व्यवस्थापक : कोणतेही काम, प्रकल्प व्यवस्थित अडचण विरहीत सुरू राहण्यासाठी व्यवस्थापक महत्त्वाचा असतो. व्यवस्थापक म्हणून काम करताना आपल्याला प्रकल्पाच्या मोठ्या आणि छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागते. अतिशय व्यावसायिकता बाळगून ठरलेल्या आर्थिक नियोजनांतर्गत योग्य प्रकारे वेळेत प्रकल्प पूर्ण करून देणे हे एक आव्हान असते.

* ट्रॅव्हल एजंट : कोरोनानंतर पुन्हा एकदा टुरिझमला बहर येणार आहे. अनेकांना पर्यटनस्थळी जायचे असते; पण कसे जायचे, कुठे राहायचे हे काहीच माहीत नसते. त्यामुळे अशा लोकांना त्यांची ट्रिप आखून देण्याचे काम आपण करू शकतो. अर्थात, यामध्ये वेगळेपणाला खूप महत्त्व आहे. प्रवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणची वैशिष्ट्ये शोधावी लागतात.

तिथल्या नेहमीच्या लोकप्रिय स्थळांपासून जरा हटके जागा शोधाव्या लागतात. तिथली इत्यंभूत माहिती मिळवावी लागते. थोडक्यात, चौकस बुद्धीचा आणि कौशल्याचा वापर करून उत्तम ट्रॅव्हल एजंट बनता येते. ट्रॅव्हल एजंट होण्यासाठी काही प्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत. ते करून यशस्वी ट्रॅव्हल एजंट होऊ शकतो.

* इव्हेंट मॅनेजर : आजच्या काळात घरगुती छोट्या समारंभांसाठीही अनेकजण इव्हेंट मॅनेजरची मदत घेतात. हे समारंभ आकर्षकपणाने अ‍ॅरेंज करणे, येणार्‍या पाहुण्यांचे मनोरंजन होईल यासाठीच्या विविध योजना राबवणे, आसनव्यवस्था, भोजनव्यवस्था यासह छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन समारंभ संस्मरणीय करण्याचे काम इव्हेंट मॅनेजर करीत असतो. खर्चाचा योग्य ताळेबंद, पाहुण्यांची यादी, निवासव्यवस्था आदी गोष्टींचे व्यवस्थापन या व्यक्तीला करावे लागते.

हल्ली समारंभांमध्ये सर्वांनाच वैविध्य हवे असते. हे वैविध्य आणताना त्यामध्ये नवेपणा कसा आणता येईल याचा प्रयत्न इव्हेंट मॅनेजरने करणे अपेक्षित असते.

Back to top button