medical field : वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संधी | पुढारी

medical field : वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संधी

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्या आधारे वैद्यकीय क्षेत्रात आपल्याला करिअर घडवता येते. यामध्ये मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, रेडिओग्राफी, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, ऑप्थॉलॉजी किंवा ऑप्टोमेट्री, नर्सिंग आणि पॅरामेडिकल अशी अनेक क्षेत्रे आहेत. हे कोर्स डॉक्टर होण्यासाठी नाहीत, तर तांत्रिक बाबतीत तज्ज्ञ होण्यासाठी मदत करतात.

एमबीबीएस सारखा कोर्स करण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी लागतो, त्यानंतर अनुभव घेणे इत्यादी मिळून सहा-सात वर्षे तरी लागतात. पण वैद्यकशास्त्राशीच संबंधित उर्वरीत कोर्स करण्यासाठी दोन ते चार वर्षे इतकाच कालावधी लागतो. म्हणजेच 12 वी नंतर तीन-चार वर्षांत आपली कारकीर्द सुरू होते. हे कोर्स कोणते आहेत ते पाहू.

नर्सिंग : नर्सिंगमध्ये डिप्लोमा व डिग्री या दोन्ही प्रकारात कोर्सेस उपलब्ध आहेत. यासाठी बी. एस. सी. नर्सिंग (ऑनर्स) व बी. एस. सी. नर्सिंग (पोस्ट सर्टिफिकेट) असे अनेक कोर्सेस आहेत. हॉस्पिटल व नर्सिंग होम इत्यादी ठिकाणी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतासह परदेशातही या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

फिजिओथेरपिस्ट :

हे क्षेत्र शारीरिक व्यायाम करवून देणारे आहे. यामध्ये व्यायाम करून, आंगिक हालचाली करून शारीरिक व्याधी किंवा आजार दूर केला जातो. याचेच एक स्वरूप म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी. जेव्हा रुग्णावर कुठलाही उपचार कामी येत नाही तेव्हा ऑक्युपेशनल थेरपी वापरतात. हा कोर्स साडे चार वर्षांचा असून यात प्रवेश घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. खासगी शिक्षण संस्थांमध्येही याच्याशी संबंधित कोर्स उपलब्ध आहेत. या कोर्सनंतर सरकारी किंवा खासगी इस्पितळे, खासगी हेल्थ सेंटर्स इत्यादी ठिकाणी काम करता येते.

ऑप्थेल्मिक टेक्नॉलॉजी :

डोळे तपासण्यासाठी आता जास्तकरून संगणक किंवा इतर उपकरणाच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. या उपकरणांचा वापर करणार्‍या व्यक्तीला ऑप्थेल्मिक तंत्रज्ञ असे म्हणतात. या क्षेत्रात 12वी नंतर डिप्लोमा करता येतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर डोळ्यांच्या अनेक दवाखान्यात किंवा स्वतंत्र काम करण्याची संधी मिळते.

फार्मसी :

डी. फार्मसी डिप्लोमा कोर्स किंवा बी. फार्मसी हा डिग्री कोर्स करून या क्षेत्रात कारकीर्द सुरू करता येते. यासाठीही एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. फार्मसी पूर्ण केल्यावर इस्पितळे, नर्सिंग होम किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांंमध्ये काम करण्याची संधी मिळते. बी. फार्मसी पूर्ण केल्यावर मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर इत्यादी स्वरूपात काम करता येते. डी. फार्मसी नंतर रिटेल केमिस्ट, फार्मासिस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह अशी कामे करता येतात.

स्पीच थेरपी :

मूकबधिर यांच्यासाठी स्पीच थेरपी हे एक वरदान आहे. या थेरपीद्वारे ऐकण्याच्या पद्धतीतही बदल करता येतो. यामध्ये अभ्यास व यंत्राचे ज्ञान याच वापर होतो. अनेक महाविद्यालयांत बी. एस. सी. इन स्पीच थेरपी असा कोर्स सुरू करण्यात आला आहे. हा कोर्स तीन वर्षांचा आहे.

डायटेक्टिस अँड न्यूट्रिशन :

देशातील अनेक विद्यापीठे आणि शिक्षण संस्था डायटेक्टिस अँड न्यूट्रिशन या क्षेत्रात डिप्लोमा व डिग्री कोर्सेस सुरू करत आहेत. यालाच मराठीत आहारतज्ज्ञ असे म्हणतात. इस्पितळे व स्वास्थ्य केंद्रे हॉटेल, फिटनेस सेंटर इत्यादी ठिकाणीही आहारतज्ज्ञांची मागणी वाढली आहे.

पॅरामेडिकल :

रेडिओग्राफी, लॅब टेक्नॉलॉजी इत्यादी क्षेत्रे ही पॅरामेडिकल या क्षेत्रात मोडतात. सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री अशा सर्व स्तरात हा कोर्स उपलब्ध आहे. पॅरामेडिकलमधील कोर्स केल्यानंतर अनेक इस्पितळात डॉक्टरांचा सहायक म्हणून काम करता येते. याशिवाय पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन, रीसर्च इन्स्टिट्यूट इत्यादी ठिकाणीही काम करता येते.

हॉस्पिटल मॅनेजमेंट :

हॉस्पिटलमधील व्यवस्थापन व कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्याचे काम हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये शिकवले जाते. अनेक खासगी इस्पितळांंमध्ये कामकाज व देखरेखीसाठी मॅनेजर नियुक्त केले जातात.

अनिकेत प्रभुणे

Back to top button