डर्मेटॉलॉजी वेगळी वाट | पुढारी

डर्मेटॉलॉजी वेगळी वाट

त्वचाविज्ञान शाखा (डर्मेटॉलॉजी) ही साचेबद्ध अभ्यासक्रमापेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक अशी समजली जाते. दीर्घकाळ काम करण्याची तयारी बाळगणारा विद्यार्थी या शाखेत पदवी मिळवू शकतो.

वैद्यकीय शाखेत आज असंख्य शाखा अध्ययनासाठी उपलब्ध आहेत. आपल्याला कोणत्या शाखेची आवड किंवा उत्सुकता आहे, हे पाहून विद्यार्थ्यांनी संबंधित शाखेत मास्टर डिग्री मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. एखादा विद्यार्थी हृदयरोगतज्ज्ञ होतो किंवा दुसरा नेत्र तज्ज्ञ होतो. या साचेबद्ध अभ्यासक्रमापेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक अशी त्वचाविज्ञान शाखा (डर्मेटॉलॉजी) समजली जाते. त्वचा विकारावर निदान करणार्‍या डर्मेटॉलॉजी या शाखेतील पदवी मिळवताना विद्यार्थ्यांना मेहनतीबरोबर खूप संयम बाळगण्याची तयारी ठेवायला हवी. या शाखेचा विद्यार्थी हा हुशार आणि निष्णात असावा, असे गृहीत धरलेले आहे. या आजारातील बारकाव्यांचे अध्ययन करताना बुद्धीची अक्षरश: कसोटी लागते. दीर्घकाळ काम करण्याची तयारी बाळगणारा विद्यार्थी या शाखेत पदवी मिळवू शकतो.

त्वचाविज्ञान ही वैद्यकीय शास्त्राची शाखा असून त्यात केस, नख आणि त्वचा यासंदर्भातील रोगांचे अध्ययन आणि निदान केले जाते. ही शाखा औषधी आणि शस्त्रक्रिया दोन्ही कक्षेत येते. केस गळती, नख आणि त्वचेबरोबरच सौंदर्यसंबंधीही समस्येचे निराकरण करण्याचे काम त्वचाविज्ञान शाखा करते. या शाखेचे अध्ययन करण्यासाठी केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, पॅथॉलॉजी, अ‍ॅनाटॉमी आणि मायक्रोबायोलॉजी या विषयांसह मास्टर पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय बायोपिस, क्रायओर्थोथेरपी आणि त्वचाविकारसंदर्भातील विषयाची माहिती असणे महत्त्वाचे ठरते. त्वचाविज्ञान शाखेत प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टराला त्वचाविज्ञानतज्ज्ञ (डर्मेटॉलॉजिस्ट) म्हणून ओळखले जाते. या शाखेत पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र खूप व्यापक आहे.

एखाद्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात त्वचारोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत राहू शकतो किंवा स्वत: क्लिनिकही सुरू करू शकतो. त्याचबरोबर शहरातील अनेक दवाखान्यांत तो व्हिजीटर म्हणूनही करिअर करू शकतो. सुरुवातीच्या काळात डर्मेटॉलॉजिस्टला वार्षिक दीड लाख ते अडीच लाखांपर्यंत सरासरी उत्पन्न मिळू शकते. कालांतराने अनुभवाच्या जोरावर हेच उत्पन्न वार्षिक 20 लाख ते 35 लाखांपर्यंत पोहोचू शकते. त्वचाविज्ञान तज्ज्ञ हा त्याहीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवू शकतो.

अमेरिकेत त्वचाविज्ञानतज्ज्ञाला चांगली मागणी आहे. याठिकाणी डर्मेटॉलॉजीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी एमडी किंवा एमबीबीएससारखी तत्सम पदवीशिवाय चार वर्षांचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. या प्रशिक्षण काळात प्रारंभिक उपचार आणि माध्यमिक व शल्य चिकित्साचे ज्ञान वर्षभर देण्यात येते. प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असताना त्वचारोग चिकित्सामध्ये तीन वर्षांपर्यंत स्थानिक रुग्णालयात प्रॅक्टिस करावी लागते. या प्रशिक्षणानंतर फेलोशिप घेण्याचाही पर्याय विद्यार्थ्यांना असतो. गेल्या काही वर्षांत अमेरिकेत त्वचा विज्ञान शाखेत निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून स्थान मिळवणे कठीण होत चालले आहे.

पात्रता : त्वचाविज्ञान शाखेत तज्ञ होण्यासाठी एमबीबीएस असणे आवश्यक आहे. वैद्यकीय शाखेत पदवी मिळवल्यानंतर स्पेशलायजेशनसाठी त्वचाविज्ञान शाखेची निवड करता येते. त्यानंतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे शक्य होते. त्यानुसार एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला पात्र असतात.

जगदीश काळे

Back to top button