सध्याच्या काळात संगणकाचा उपयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या काळात संगणक हा आपला अभिन्न अंग बनला आहे. बँक, रेल्वे, विमा आणि अन्य शासकीय,अशासकीय तसेच खासगी उपक्रमात संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. म्हणूनच कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
संगणक क्षेत्रातील क्रांतीमुळे जसे की इंटरनेट, मोबाईल फोन, एटीएम, कॉल सेंटर आदी कारणांमुळे कॉम्प्युटरच्या अनेक महत्त्वपूर्ण भागांची सुधारणा करण्यासाठी कौशल्यप्राप्त कॉम्प्युटर हॉर्डवेअर इंजिनिअरची गरज नेहमीच भासते. हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअरिंग क्षेत्रात रोजगारांच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात रोजगारासाठी इच्छुक विद्यार्थी कॉम्प्युटर हार्डवेअर रिपेअरिंग आणि नेटवर्किंग क्षेत्राची निवड करू शकतात.
कॉम्प्युटर मल्टिमीडियाः मल्टिमीडिया हे एक बहुआयमी तंत्रज्ञान आहे. या आधारावर दळणवळणाचे विविध माध्यम जसे की ऑडिओ, व्हिडीओ, टेक्स्ट, ग्राफिक्स, अॅनिमेशन, कलर्स आदींचा वापर कॉम्प्युटरच्या माध्यमातून एकाचवेळी केला जातो. आज अॅनिमेशन आधारित 'द जंगलबुक' सारख्या हिट चित्रपटांचा बोलबाला आहे. मोबाईल गेमिंगमध्ये मल्टिमीडियाने धुमाकूळ घातला आहे. या क्षेत्रातील रचनात्मक विचार बाळगणार्या विद्यार्थ्यांना रोजगाराची विपूल संधी आहे.
दहावीनंतर मल्टिमीडियाचा अभ्यासक्रम करता येऊ शकतो. याशिवाय कॉलसेंटर आणि आऊटसोर्सिंग, स्टॉक मार्केटमध्ये संगणकाचा वापर, देश-विदेशांतील भाषांचे अनुवादक, मेलिंग सर्व्हिस, टॅक्स रिटर्न सेवा, बुक इंडेक्सिंग, डेक्सटॉप पब्लिशिंग, प्रोग्रॅम/पॅकेजिंग डिस्ट्रिब्युटर, कॉम्प्युटरने सल्ला देणे, डेटा एंट्री सेवा, कॉम्प्युटर कौन्सिलिंग, इलेक्ट्रॉनिकशी निगडित बुककिपिंग सर्व्हिस, कॉम्प्युटरवर भविष्यवाणी, ब्रोशर्स तयार करणे, आदी सेवांसाठी संगणकाचा वापर केला जात आहे.
रोजगाराच्या संधी :
राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या देश-विदेशांतील संस्थेत कॉम्प्युटर तज्ज्ञांना नेहमीच मागणी राहिली आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये देखील अध्यापक म्हणूनही चांगली संधी उपलब्ध होत आहे. भारतीय लष्करातही अधिकारी होण्याची इच्छा असेल तरीही संधी विपूल आहेत.
– महेश कोळी