आजवर जेवण बनवण्यात किंवा तत्सम क्षेत्रात रस असणार्या लोकांनी हॉटेल मॅनेजमेंटच करण्याची परंपरा होती; पण गेल्या काही वर्षांत खाद्यक्षेत्रातही नवनवीन उपक्षेत्रे तयार झाली आहेत. यातीलच एक म्हणजे फूड स्टायलिस्ट!
आजच्या जमान्यात प्रेझेंटेशन अर्थात सादरीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतीतही सादरीकरणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. बर्याचदा एखाद्या मासिकाच्या मुखपृष्ठावरील वा एखाद्या जाहिरातीमधील अत्यंत आकर्षक दिसणारा खाद्यपदार्थ पाहून आपल्याला तो खाण्याची इच्छा होते. हे सादरीकरणाचे यश असते. यालाच फूड स्टाईलिंग असे म्हणतात. ही एक कला आहे.
यामध्ये फूड स्टायलिस्ट आणि फोटोग्राफर हे दोघे एकत्र मिळून एखाद्या खाद्यपदार्थाची निर्मिती करून त्याची आकर्षक सजावट करून त्याची छायाचित्रेही तितक्याच आकर्षक पद्धतीने काढून त्याविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करतात. तुम्हाला फोटोग्राफी आणि खाद्यपदार्थ सजवणे या दोन्ही गोष्टींची आवड असेल, तर फूड स्टायलिस्टच्या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच करिअर करू शकता.
अर्थात त्यासाठी फूड स्टायलिस्टचे काम नेमके काय असते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखादा खाद्यपदार्थ टेबलवर इतक्या सौंदर्यदृष्टीने मांडणे की, तो पाहता क्षणीच लोकांच्या तोंडाला पाणी सुटले पाहिजे. म्हणजेच तो पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे. यासाठी फूड स्टायलिस्टला खूप मेहनत करावी लागते. फूड स्टायलिंगसाठी डेकोरेटिव्ह साहित्य खरेदी करण्यापासून ते पाककृती करून खाद्यपदार्थ तयार करणे, तो सजवणे आणि त्याचा फोटो काढणे इत्यादी कामे फूड स्टायलिस्टला करावी लागतात.
फोटो काढण्यापूर्वी थीम ठरवणे, आवश्यक ग्लासवेअर, क्रॉकरी, मेणबत्त्या, रिबिन इत्यादींची मांडणी करणे ही कामेही फूड स्टायलिस्टला करावी लागतात. थोडक्यात खाद्यपदार्थ दिसतानाच अतिशय आकर्षक आणि चविष्ट दिसेल, अशी त्याची रचना करण्याचे काम फूड स्टायलिस्टना करावे लागते.
फूड स्टायलिस्ट बनण्यासाठी आपली कल्पनाशक्ती चांगली असणे खूप गरजेचे आहे. यासाठी कोणत्याही खास शैक्षणिक पात्रतेपेक्षाही भन्नाट कल्पनाशक्तीची गरज अधिक असते. तसेच सौंदर्यदृष्टीचे ज्ञान, नवनवीन कल्पना, तांत्रिक ज्ञान, नेटवर्किंगचे कौशल्य इत्यादी गोष्टींचीही आवश्यकता असते.
काही वर्षांपूर्वी फूड स्टायलिंग हे जाहिरात क्षेत्रापुरतेच मर्यादित होते; पण आज खाद्य आणि करमणूक क्षेत्राने हातमिळवणी केल्यामुळे यामध्ये अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पाककलाधारित पुस्तके, मासिके, चित्रपट निर्मितीसंस्था, प्रकाशनसंस्था, हॉटेल-रेस्टॉरंटस्, डिझाईन हाऊसेस अशा अनेक ठिकाणी फूड स्टायलिस्टची गरज असते.
फूड स्टायलिस्टच्या कामात अनेक आव्हाने आहेत. खाद्यपदार्थ तयार केल्यानंतर ते काही काळाने खराब होऊ लागतात. त्यामुळे तो ताजा असेपर्यंत त्याचा ताजेपणा कॅमेर्यात टिपणे महत्त्वाचे आहे. तसेच खाद्यपदार्थांना आकर्षकपणा देण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ वापरतानाही बरीच व्यवधाने पाळावी लागतात. या सर्व गोष्टी बारकाव्यांनिशी समजून घेण्यासाठी याबाबतचे प्रशिक्षण घेणे आणि त्यानंतर कार्यानुभव घेणे आवश्यक ठरते. या क्षेत्रातील शिक्षण देणारी महाविद्यालयेही आहेत. एखाद्या व्यावसायिक फूड स्टायलिस्टकडे काम केल्यास प्रत्येक कामाचे हजार-दोन हजार रुपये मिळतात; पण एकदा तुमच्या गाठीशी अनुभव आला की या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करता येते.
– राकेश माने