

सध्या उदारीकरणामुळे प्रत्येक कंपनी आपली उत्पादने व त्यांची लोकप्रियता यांचा आढावा घेण्यासाठी मार्केटिंग रिसर्च ची मदत घेते. यामुळे कंपनीला आपले उत्पादन चांगले आहे की नाही याबद्दल प्रतिक्रिया मिळते. या प्रतिक्रियांच्या आधारे कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये बदल किंवा सुधारणा करते.
कॉर्पोरेट जगतासह आता अन्य क्षेत्रांमध्येही मार्केटिंग रिसर्चचा वापर वाढला आहे. निवडणुकांदरम्यान नेते जनमानसातील आपली प्रतिमा समजून घेण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करतात.
याशिवाय टीव्हीवरील मालिकांचे निर्माते, वृत्तवाहिन्यांचे व वृत्तपत्रांचे मालक, सरकारी नियोजन आयोग इत्यादी क्षेत्रे आपापल्या उत्पादनांची जनमानसातील लोकप्रियता व प्रतिक्रिया यांचा अंदाज घेण्यासाठी मार्केटिंग रिसर्चचा वापर करतात.
एकेकाळी मार्केटिंग रिसर्च हे क्षेत्र फक्त परदेशातील कंपन्यांपुरते मर्यादित होते. पण जागतिकीकरणामुळे आता भारतातही याचे महत्त्व वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षित तरुणांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. मार्केटिंग रिसर्चमधील संधी काय आहेत ते जाणून घेण्यापूर्वी मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय व त्याचे कामकाज कसे चालते ते समजून घेऊ.
मार्केटिंग रिसर्चशी संबंधित कंपन्या एखाद्या उत्पादनासंबंधी लोकांची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी ई-मेल, फोन किंवा इतर माध्यमांची मदत घेतात. माहिती गोळा करण्यासाठी एखादी कंपनी घरोघरी जाऊन सर्व्हेही करू शकते.
या सर्व्हेमध्ये प्रत्येक अधिकारी लोकांच्या घरोघरी जाऊन जवळजवळ दहा प्रश्न विचारतो. या प्रश्नांवरील प्रतिक्रिया लक्षात घेऊन कंपन्या त्यानुसार आपल्या उत्पादनांमध्ये काय काय सुधारणा करता येईल हे पाहतात.
भारतात अनेक व्यवस्थापन महाविद्यालयांत मार्केटिंग रिसर्चचे शिक्षण दिले जाते. यातील काही महाविद्यालयांची नावे पुढीलप्रमाणे :
* आयआयएम – अहमदाबाद, बेंगलोर, कोलकाता, लखनौ
* जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, इंदोर
* एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई
* ए.पी.जे. स्कूल ऑफ मार्केटिंग, मुंबई.
* सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे.
यात करिअरची सुरुवात फिल्ड वर्कर, इंटरव्ह्युअर किंवा रिसर्च असिस्टंट या पदावरील कामाने होते. सुरुवातीला या क्षेत्रात 15 हजारापासून उत्पन्न मिळायला सुरुवात होते. आपल्या अनुभवानुसार हे उत्पन्न वाढत जाते.
शरयू वर्तक