

आजची तरुण पिढी बाहेरून कितीही आत्मविश्वासू दिसली, तरी त्यांच्या मनावर तणाव, अपेक्षा, अपमान आणि एकाकीपणाचे ओझे वाढताना दिसत आहे. मनावरील ताण व्यक्त करण्यासाठी हक्काची व्यक्ती नसणे किंबहुना आई, वडिलांशी विसंवाद वाढणे, कुटुंबातील आणि शाळेतील संवाद तुटत जाणे यामुळे अनेक मुले विशेषतः किशोरवयीन मुले मनातून ढासळत आहेत. या मानसिक अस्थिरतेचे सर्वात वेदनादायक रूप म्हणजे आत्महत्या. नुकत्याच घडलेल्या अर्णव खैरेच्या मृत्यूने ही समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे जाणवते...
कल्याण येथील अर्णव खैरे हा मुलुंड येथील ज्ञानसरिता ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी होता. रोजच्या प्रमाणेच तो अंबरनाथहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्या लोकलने कॉलेजला निघाला होता; परंतु कल्याण ते दिवा यादरम्यान हिंदी संभाषणावरून उपद्रवी टोळक्याने भाषा-विवादाचा मुद्दा पुढे करत त्याला विनाकारण मारहाण केली. गर्दीच्या लोकलमध्ये झालेला अपमान, भीती आणि मानसिक धक्का अर्णवच्या मनात खोलवर इजा करून गेला. त्यानंतर तो कॉलेजला न जाता थेट घरी परतला. धक्क्याने गोंधळलेल्या अवस्थेत, कोणाशी संवाद न साधता, कोणताही आधार न घेता क्षणिक आवेगात त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेने रेल्वेत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर उपस्थित केलाच, शिवाय त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा समाजातील तरुणांच्या बदललेल्या मानसिक आरोग्याचा आहे. घरातील विसंवाद, सामाजिक दडपण, शिक्षकांच्या अपेक्षा, स्पर्धेचा ताण आणि मित्रमंडळीतील अपमान हे सर्व मुद्दे मुलांना आतून पोखरत आहेत. दिल्लीतील एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. विरारमध्ये शिक्षकाने दिलेल्या 100 उठाबशांच्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. अशा घटना देशभर पसरत असलेल्या एकाच संदेशाकडे इशारा करतात, मुलांच्या मनातली भीती आणि वेदना ते व्यक्त करत नाहीत आणि हीच शांतता विनाशकारी ठरते.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे सांगतात की, आजची मुलं आधीपेक्षा अधिक संवेदनशील आहेत; परंतु त्यांना संवाद साधण्यासाठी, भावनांना वाट मोकळी करू देणारा आधार मात्र अत्यंत कमी मिळतो आहे. शाळेतील अभ्यासाचे दडपण, घरातील वाद, मित्रांत झालेला अपमान या सगळ्यामुळे ते अबोला धरतात, एकटं राहतात आणि परिस्थितीतून सुटका होण्यासाठीच्या मार्गांऐवजी चुकीच्या दिशेकडे वळतात. भावनिक क्षणांमध्ये मुलं तत्काळ निर्णय घेतात, हे सर्वाधिक धोकादायक असल्याचे ते सांगतात. आत्महत्या त्यांना समस्या संपवण्याचा सोपा मार्ग वाटू लागतो; पण या मागे असते ती खोलवर रुजलेली वेदना, जी त्यांनी कुणाशीच शेअर केलेली नसते.
डॉ. शैलेश उमाटे यांच्या मते, पालक, शिक्षक आणि समाजाने मुलांच्या मानसिक आरोग्याला तितकीच प्राधान्याने दखल देणे अत्यावश्यक आहे. मुलांना मन मोकळं करण्यासाठी सुरक्षित वातावरण, त्यांचा अपमान व भीती गांभीर्याने ऐकून घेण्याची वृत्ती, तसेच जीवनातील संकटांना सामोरं जाण्याचं प्रशिक्षण हे सर्व त्यांच्या मानसिक बळासाठी आवश्यक आहे. आत्महत्येचे परिणाम, कुटुंबावर येणारे भावनिक व मानसिक नुकसान, तसेच समस्यांना तोंड देण्यासाठीचे उपाय स्पष्टपणे समजावून सांगितल्यास मुलांना आधार मिळू शकतो. अर्णवसह अनेक तरुण त्यांच्या मनातल्या संघर्षाशी एकटे झुंज देत आहेत. या मुलांभोवती विश्वासाचा, संवादाचा आणि समजुतीचा मजबूत पाया तयार करणे समाजाची आणि कुटुंबाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. जीवनातले संकट कितीही मोठे असले, तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग असतो ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजवणे हे आजचे अत्यावश्यक कार्य आहे.
मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी सातत्याने त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत आवश्यक आहे. घर आणि शाळेत मानसिक आरोग्याबद्दल खुली चर्चा होणे मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची सुरक्षित जागा उपलब्ध करून देते. अपयश, अपमान किंवा तणावपूर्ण प्रसंगांवर योग्य समुपदेशन मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो. भावनिक क्षणांत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे ही महत्त्वाची बाब आहे. तसेच आत्महत्येचे गांभीर्य आणि त्याचे होणारे परिणाम मुलांना समजावून सांगितल्यास अशा टोकाच्या भूमिका घेण्यापासून त्यांना रोखण्यात मदत होते.
सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे राहणार्या प्रदीप पाटील यांचा दिल्लीत राजीवनगर या भागात सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा शौर्य पाटील हा तिथे सेंट कोलंबस शाळेत दहावी इयत्तेत शिकत होता. तेथील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून शौर्यने 18 नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आत्महत्यापूर्व पत्रात शाळेच्या शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे दीड पानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालया त दाखल केले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दिल्लीच्या राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी संबंधित शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.