

अशोक मोराळे, पुणे
यवत जवळील भुलेश्वर मंदिराच्या घाट परिसरात त्या दिवशी भल्या सकाळी झाडीत एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळू आला होता. एकाने ही माहिती यवत पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एव्हाना पोलिसी नजरेने हा खुनाचा प्रकार असल्याचे जाणले होते. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतून तो मृतदेह पेटवून देण्यात आला होता; पण अखेर पोलिसांनी सत्य चव्हाट्यावर आणलेच...
लखन धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावचा. अजून त्याचे हात पिवळे झाले नव्हते. नात्याने तो राजश्रीचा चुलत मामा लागायचा. राजश्री पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आपल्या नवर्यासोबत योगेशसोबत संसार करत होती. त्यातच लखन आणि राजश्री या दोघांच्या अनैतिक नात्याला पालवी फुटली. नातेवाईक असल्याने लखन नेहमी तिच्या घरी येत असे, त्यामुळे कोणाला दोघांबाबत वेगळे वाटण्याचे कारण नव्हते. राजश्रीचा नवरा कामावर गेल्यानंतर दोघे भेटत असत. लखनच्या डोक्यात वेगळाच खेळ सुरू होता. प्रत्येकवेळी तो दोघांच्या खासगी क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ काढून ठेवत असे.
एकेदिवशी योगेशला पत्नी राजश्री आणि लखनच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. वाद विकोपाला केला. त्यातूनच दोघांनी पै-पाहुण्यांना एकत्र करून संमतीने स्टॅम्प पेपरवर लिखापड करून फारकत घेतली. राजश्री मुलांना घेऊन आपल्या माहेरी ढोकीला आली. तिने लखनसाठी तिच्या नवर्याला सोडले होते. राजश्री आता लखनकडे आपल्यासोबत लग्न कर म्हणून तगादा लावला. त्याला काही तो तयार होत नव्हता. अनेकदा त्याने राजश्रीपासून पळ सुद्धा काढला. त्यामुळे राजश्रीच्या घरचे देखील त्याच्यावर संतापून होते. योगेशला मुलांची आठवण येत होती. त्यातूनच त्याने राजश्रीला आपण मुलांसाठी परत मागे काय झाले गेले ते सर्व काही विसरून परत एकत्र येऊ, असे सांगितले. एकीकडे नवर्याने सोडले, तर दुसरीकडे लखन तिचा स्वीकार करत नव्हता म्हणून तिने देखील योगेश सोबत जाण्याचा निर्णय घेतला. ती परत योगेश सोबत नांदू लागली होती.
लखन सैतानी डोक्याचा. त्याला काही दोघांचे एकत्र येणे रुचल नाही. त्यातूनच त्याने राजश्रीचे आयुष्य परत उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला. त्याने यापूर्वी दोघांच्या खासगी भेटीचे फोटो आणि व्हिडीओ काढून ठेवले होते. एकदा त्याने ते राजश्रीच्या नवर्याच्या मोबाईलवर पाठवून दिले. योगेशने सुरुवातीला लखनला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाठीमागील सर्व काही विसरून पुढे आलो आहोत, असे त्याला सांगितले. परंतु लखनने काही केल्याने ऐकलेच नाही. शेवटी योगेशने काही करून लखनला आपल्या वाटेतून दूर करायचे, तेही कायमचे अशी योजना आखली.
त्याने राजश्री समोर अट मांडली तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर, लखनचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. लखनला आपल्या सापळ्यात अडकवून पुण्यात घेऊन येण्याची योजना आखण्यात आली. त्यामध्ये भूमिका बजावली ती पत्नी राजश्री, मेव्हणा विकास आणि विकासचे साथीदार शुभम व काकासाहेब यांनी. लखनला त्याच्या ढोकी या गावातून बाहेर काढण्यासाठी राजश्रीने डाव टकला. पुण्याला जाऊ, असे सांगून लखनला घेऊन बसने रात्रीचा प्रवास करत ती पुण्याकडे निघाली. यावेळी शुभम त्याच बसमध्ये लखन याच्यावर पाळत ठेवण्यासाठी होता. विकास आणि काकासाहेब हे दोघं बसच्या पाठीमागे मोटारीतून बसचा पाठलाग करत होते. लखन याने त्या दिवसी मद्यप्राशन केले होते. राजश्री आणि त्याचा बसमध्ये वाद झाला. इतर प्रवाशांनी पती-पत्नी म्हणून दोघांना बसमध्ये वाद न करण्याचा सल्ला दिला. बस हडपसरपर्यंत आली तेव्हा पहाट झाली होती. ठरल्याप्रमाणे लखन आणि राजश्री बसमधून खाली उतरले. त्याचवेळी योगेश आणि त्याचा मेव्हणा विकास याने त्याला आपल्या ताब्यात घेतले. दारूच्या नशेत झिंग झालेल्या लखनला दोघांना फारसा प्रतिकार करता आला नाही. दोघांनी दुचाकीवर बसवून त्याला यवतच्या दिशेने घेऊन गेले. (पूर्वार्ध)