

डी. एच. पाटील, म्हाकवे
हातात कुर्हाड घेऊन सोनबा एका पालवी फुटलेल्या धावड्याच्या झाडावरती चढला. झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या तोडून तो खाली शेळ्यांजवळ टाकू लागला. धावड्याचा पाला तोडता तोडता त्याचे लक्ष शेजारच्या एका जांभळाच्या झाडाकडे गेले. जांभळाच्या झाडाजवळ अनेक माशा कशावर तरी घोंघावताना त्याला दिसल्या. खाली उतरून माशा कसल्या, हे पाहण्यासाठी तो पुढे गेला आणि तो दचकला...
उन्हाच्या झळा अंगाला झोंबत होत्या. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत होत्या. चिंचेच्या झाडाखाली सावलीत बांधलेली जनावरे उन्हाच्या तडाख्यामुळे धापा टाकत होती. आसपास परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात होते. या जंगलात अनेक गुराखी जनावरे चारण्यासाठी जात. वन विभागाचे कर्मचारीही अधूनमधून या पट्ट्यात गस्त घालत.
याच जंगलात सोनबा गुराखी आपल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन चारण्यासाठी दररोज जात होता, तसा आजही तो गडबडीने शेळ्या चारण्यासाठी गेला होता. दुपारपर्यंत शेळ्या चारून त्याला आपल्या लेकीच्या गावाकडे जायचे होते. हातातील कुर्हाडीने झाडाचा पाला काढून तो आपल्या शेळ्यांना तोडून घालत होता. हिरव्या चार्यावर शेळ्या तुटून पडल्या होत्या.
हातात कुर्हाड घेऊन सोनबा एका पालवी फुटलेल्या धावड्याच्या झाडाजवळ आला. त्याने आपल्या डोक्याला सोबत आणलेला टॉवेल बांधला आणि तो झाडावर चढला. झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या तोडून तो खाली शेळ्यांजवळ टाकू लागला. कवळ्या लुसलुशीत पाल्यावर शेळ्या तुटून पडल्या होत्या.
धावड्याचा पाला तोडता तोडता त्याचे लक्ष शेजारच्या एका जांभळाच्या झाडाकडे गेले. जांभळाच्या झाडाजवळ अनेक माशा कशावर तरी घोंघावताना त्याला दिसल्या. तो धावड्याच्या झाडावरून खाली उतरला आणि कशाचा वास येतो, माशा कसल्या, हे पाहण्यासाठी तो पुढे गेला आणि तो दचकला...
एका महिलेचा मृतदेह समोर पडलेला होता. तो घाबरला. त्याला काही सुचेना. तशातच आपल्या शेळ्यांना हाकत तो गावाकडे आला. त्याने ही बातमी पहिल्यांदा पोलिसपाटलांना जाऊन सांगितली.
पोलिसपाटलांनी शहानिशा करत ही गोष्ट जवळच्या पोलिस स्टेशनला कळवली. घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्या महिलेच्या कानामध्ये, पायामध्ये असणार्या विविध वस्तू, पायाच्या अंगठ्यामध्ये असणारी धातूची रिंग, हातामध्ये असणारा पिवळा नारंगी धागा पुरावा म्हणून पोलिसांनी जप्त केले. मृत महिलेच्या डोक्यामध्ये कशाने तरी वार केल्याचे स्पष्ट दिसत होते. कपाळावरही जखमा होत्या. महिलेचा चेहरा प्लास्टिकच्या पोत्याने झाकला होता.
पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. प्रथम महिलेची ओळख पटणे गरजेचे होते. आसपासच्या गावांमध्ये चौकशी करण्यात आली. संबंधित जळगाव शहर व धुळे शहरात अशा वर्णनाची कुणी महिला बेपत्ता आहे का, अशी कुणाची मिसिंग नोंद आहे का, याची चौकशी करण्यात आली. मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद सापडली नाही.
पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी समाजमाध्यमांचीही मदत घेतली. मृत महिलेच्या हातातील हिरव्या बांगड्या, नारंगी पिवळा धागा बघता घटनेपूर्वी ती महिला एखाद्या मंदिरात गेली असावी, असा कायास बांधून पोलिसांनी मंदिर परिसरात नारंगी पिवळा धागा कुठे मिळतो, याबाबत चौकशी सुरू केली. परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तरीही महिलेची ओळख पटत नव्हती.
पोलिसांनी विविध मंदिर परिसरांत नारंगी पिवळ्या धाग्याबाबत चौकशी सुरू केली. अनेक मंदिरांत चौकशी करत असताना एका मंदिराच्या शेजारी याबाबत चौकशी केली. त्यावेळी ‘येथे एक महिला व पुरुष मंदिरात आले होते. त्यांनी नारंगी पिवळा धागा घेतला होता, अशी माहिती मिळाली. तो धागा दाखवताच तो आपल्याकडीलच असल्याचे त्या दुकानदाराने सांगितले. त्या दुकानदाराला फोटो दाखवताच त्याने त्या मृत महिलेस ओळखले. ओळख पटविणे चालू असतानाच खबर्यांनी बातमी आणली की, नजीकच्या एका खेड्यातील 48 वर्षांची मंजुळा नावाची एक महिला काही दिवसांपासून बेपत्ता आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस मंजुळाच्या घरी पोहोचले. पण त्या घरी कोणी नव्हते. त्यांचा एक मुलगा गुजरातमध्ये तर दुसरा मुलगा बाहेरगावी नोकरी करत असल्याचे समजले. तिचा नवरा व ते दोघेच त्या गावी राहात होते. त्यांच्या मुलाला गुजरातहून बोलावून घेण्यात आले. त्याने हे वर्णन व आपल्या आईचा मृतदेह ओळखला.
मृत महिलेची ओळख पटल्यामुळे पोलिसांनी तपासाला वेग दिला. मृत मंजुळा हिच्याबरोबर कुणाचा वाद होता का, तिच्या बरोबर कोणाचे भांडण झाले होते का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला. मात्र अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिस खुनाचे कारण आता शोधत होते.
तिच्याकडे असणार्या मोबाईलचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले असताना त्यातून गावातीलच एका तरुणाचे नाव समोर आले. अशोक वानखेडे नावाच्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याच्या घरी गेले. परंतु तो काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी पथक तयार केले. या पथकाला यश आले. त्यांनी अशोकला पकडून पोलिस स्टेशनला आणले.
त्याला पोलिस स्टेशनला आणून चांगलाच पाहुणचार दिला. त्यावेळी त्याने आपणच खून केल्याचे कबूल केले. आपले व मंजुळाचे गेल्या कित्येक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. तिच्याकडे पैसा होता. तो मला हवा होता. त्यासाठी आपण खून केल्याचे त्याने कबूल केले. त्या दिवशीही आम्ही दोघे जंगलामध्ये फिरायला गेलो होतो. ती मला भेटायला येताना नेहमी दागिने घालून येत होती. त्यामुळे माझी नजर तिच्या दागिन्यावर होती. माझी आर्थिक चणचण होती. त्या दिवशी त्या दागिन्यावरूनच आमचा वाद झाला. मी तिच्याकडे दागिने मागताच तिने माझ्या गालावर थप्पड मारली. याचा मला राग आला. मी रागाने जवळच असलेला दगड उचलून तिच्या डोक्यात मारला. त्यात ती निपचित पडली. आसपास कोणीही नव्हते. मी घाबरलो. मग शांत डोक्याने तिच्या चेहर्यावर दगडाने घाव घातले. ओळख पटू नये म्हणून सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत तिचा चेहरा झाकला व मृतदेह तिथेच टाकून मी गावी आलो. दागिन्याच्या मोहापायी मी मंजुळाचा जीव घेतला, असे म्हणून तो रडू लागला.
पोलिसांना मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. परंतु पिवळ्या नारंगी धाग्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून पोलिस तपास पूर्ण केला. सध्या आरोपी तुरुंगात आहे.