फाशी नेहमी सूर्योदयापूर्वीच का दिली जाते?

Death Penalty | अशी होते फाशीची अंमलबजावणी
Death Penalty
उच्च न्यायालयालाही जिल्हा न्यायालयाचा निर्णय आणि फाशीची सबळ कारणे योग्य वाटली तर फाशीची शिक्षा कायम होते.Pudhari File Photo
Published on
Updated on

खून, बालिकेवरील बलात्कार, सामूहिक बलात्कार, सामूहिक हत्याकांड, देशविरोधी कारवाया, देशविघातक दहशतवादी कारवाया, निर्घृण आणि नृसंश स्वरूपाचे गुन्हे आणि दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या आरोपींना फाशी (Death Penalty) देण्याची कायदेशीर तरतूद आहे. अशा स्वरूपाच्या खटल्यांचे कामकाज सुरुवातील त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयापुढे चालते. आरोपीला फाशी देण्याशिवाय अन्य पर्याय नाही, याची सबळ कारणे पुढे आल्यास जिल्हा न्यायालय अशा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावते; पण या शिक्षेवर उच्च न्यायालयाची अनुमती आवश्यक असते, त्यामुळे अशा खटल्याचे कामकाज पुन्हा उच्च न्यायालयात चालते. उच्च न्यायालयालाही जिल्हा न्यायालयाचा निर्णय आणि फाशीची सबळ कारणे योग्य वाटली तर फाशीची शिक्षा कायम होते.

त्यानंतर या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या खटल्याचे कामकाज चालून खालच्या न्यायालयांचा निर्णय आणि फाशीची सबळ कारणे योग्य वाटली, तर फाशीची शिक्षा कायम होते. त्यानंतरही आरोपीला देशाच्या राष्ट्रपतींकडे दयायाचना अर्ज करता येतो. एकूण प्रकरणाचे गांभीर्य आणि आरोपीची पार्श्वभूमी विचारात घेऊन राष्ट्रपती फाशीची शिक्षा रद्द करू शकतात किंवा कायम ठेवू शकतात. सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपतींची अंतिम मोहोर उमटली की, या शिक्षेच्या अंमलबजावणीला सुरुवात होते.

एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सर्वात पहिली तयारी म्हणजे आरोपीची मानसिक तयारी! फाशीच्या नियोजित तारखेआगोदर सुमारे चार-पाच दिवस त्याला त्या तुरुंगात हजर व्हावे लागते. तेथील निर्ढावलेल्या गुन्हेगारांना पाहून आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची वर्णने ऐकून तो मानसिकरित्या अधिक सक्षम बनतो.

पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष फाशीचा सराव! फाशी दिल्या जाणार्‍या कैद्याच्या वजनाच्या सुमारे दीडपट इतका पुतळा बनवला जातो व त्याला फाशी देण्याचा सराव केला जातो, जेणेकरून ऐनवेळी कोणतीही अडचण येऊ नये. त्यानंतर तितके वजन पेलू शकेल इतक्या वजनाची दोरी आणली जाते. या दोर्‍या देशात फक्त बिहारमधील बक्सर या शहरात असलेल्या तुरुंगात बनवल्या जातात. गळ्याभोवती आवळल्यानंतर फाशी जाणार्‍याला त्रास होऊ नये, यासाठी या दोर्‍यांना तूप-तेल व पिकलेल्या केळ्याचा लेप लावून मुलायम बनविले जाते.

फाशीच्या शिक्षेच्या अगोदर 15 दिवस कैद्याच्या नातेवाइकांना कळवले जाते, जेणेकरून ते कैद्याला शेवटच्या वेळी भेटू शकतात. फाशी देण्यापूर्वी जल्लाद गुन्हेगाराकडे जातो आणि त्याच्या कानात म्हणतो, मला माफ कर, मी सरकारी कर्मचारी आहे. मला केवळ कायद्याचे पालन करण्यासाठी हे करावे लागत आहे. यानंतर जर गुन्हेगार हिंदू असेल, तर जल्लाद त्याला राम राम म्हणतो आणि जर गुन्हेगार मुस्लिम असेल, तर त्याला शेवटचा सलाम करतो. त्यानंतर जल्लाद खटका ओढतो आणि गुन्हेगाराला त्याचा जीव जाईपर्यंत फाशी देतो. सुमारे पंधरा मिनिटांनंतर, डॉक्टर गुन्हेगाराची नाडी तपासतात. मृत्यूची खात्री झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जातो.

फाशीच्या दिवशी काय काय होते?

फाशीच्या दिवशी कैद्याला अंघोळ करून नवीन काळे कपडे दिले जातात. त्याला नेहमीचा चहा व नाश्ता दिला जातो. त्याची इच्छा असल्यास त्याला देवाची प्रार्थना करण्यास वा धार्मिक व्यक्तिद्वारा प्रार्थना ऐकण्याची मुभा दिली जाते. पहाटे कारागृह अधीक्षकांच्या देखरेखीखाली रक्षक कैद्याला फाशीच्या खोलीत आणतात. फाशीच्या वेळी जल्लादाव्यतिरिक्त कारागृह अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी उपस्थित असतात. फाशी देण्यापूर्वी त्याला काही दिसू नये म्हणून त्याच्या चेहर्‍यावर काळी टोपी चढविली जाते.

फाशी देण्यापूर्वी अधीक्षक दंडाधिकार्‍यांना कळवतात की, कैद्याची ओळख पटली आहे आणि त्याला मृत्यूचे वॉरंट वाचून दाखवले आहे. डेथ वॉरंटवर कैद्याच्या सह्या अगोदरच घेतलेल्या असतात. फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. कैद्याच्या त्याच इच्छा पूर्ण केल्या जातात, ज्या तुरुंगाच्या नियमावलीत लिहिलेल्या असतात. कैद्याला त्याच्या कोठडीतून बाहेर आणल्यापासून ते फाशी देईपर्यंत कोणीही काही बोलत नाहीत. आजमितीस देशात फाशी देणारे दोनच जल्लाद आहेत. त्यांना दरमहा ठरावीक मानधन दिले जाते व प्रत्येक फाशीच्या वेळी काही विशिष्ट भत्तादेखील दिला जातो.

फाशी ही नेहमी सूर्योदयापूर्वीच दिली जाते. याचे मुख्य कारण असे की, त्यामुळे तुरुंगाच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय त्या विशिष्ट काळात तुरुंगातील कोणत्याही कैद्याला आपली कोठडी सोडून कोठेही जाण्या-येण्याची परवानगी नसते.

Death Penalty
Pudhari Crime Diary : गुन्हेगारांची मानसिकता!, गुन्ह्यांची मालिका!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news