

सुरेश साळवे
ठाणे: आयुष्यभराच्या कष्टातून कोट्यवधींची संपत्ती जमविणाऱ्या एका अविवाहित शिक्षिकेच्या मालमत्तेवर डोळा ठेवून तिच्या हत्येचा कट रचण्यात आला. वारसदार नसल्याचा फायदा घेत संपत्ती हडपण्याचा डाव आखत आधी या महिलेला ठाण्यातून नाशिकला नेण्यात आले.
तेथे संपत्तीच्या वारसाहक्काशी संबंधित कागदपत्रांवर तिच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि त्यानंतर नाक-तोंड दाबून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला.
सीसीटीव्ही चित्रण, मोबाईल तंत्रज्ञान आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कल्याण गुन्हे शाखेने या खुनाचा छडा लावत दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
कल्याणच्या कोळशेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या ‘सुषमा’ (५३, नावात बदल) या १४ जुलै रोजी कामानिमित्त ठाण्याला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या.
मात्र, दिवस उलटला, रात्र झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही. अखेर कोळशेवाडी पोलिस ठाण्यात सुषमा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
सुषमा या शिक्षिका असण्याबरोबरच एलआयसी एजंट म्हणूनही काम करीत होत्या. अविवाहित असलेल्या सुषमा यांनी आपल्या कष्टातून मोठी संपत्ती उभी केली होती. मात्र, त्यांना थेट वारसदार नव्हता.
याच गोष्टीची माहिती आरोपींना होती. वारसदार नसल्याने त्यांच्या संपत्तीवर सहज कब्जा करता येईल, असा समज करून आरोपींनी संपत्ती हडपण्याचा कट रचल्याचा तपासात उलगडा झाला.
दरम्यान, सुषमा बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच १६ जुलै रोजी नाशिक ग्रामीण भागातील वाडीवन्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिन्नर-घोटी मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
त्यावेळी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. तपासाची सूत्रे जोडली गेली आणि नाशिकमध्ये आढळलेला मृतदेह सुषमा यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह सापडल्यानंतर या घटनेमागील कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्या घरातून बाहेर पडल्यानंतर कुठे गेल्या, कोणाच्या संपर्कात आल्या, त्यांना कोण भेटले आणि ठाण्यातून त्या नाशिकपर्यंत कशा पोहोचल्या, याचा तपास सुरू करण्यात आला.
परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. त्याचबरोबर मोबाईलच्या हालचाली आणि तांत्रिक माहितीचा अभ्यास करण्यात आला. तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसेतसे संशयाचे धागे ‘संतोष’ आणि ‘सुहास’ (नावे बदललेली) यांच्यापर्यंत पोहोचले.
आरोपींनी सुषमा यांना बोलावून घेतले आणि ठाण्यातून नाशिकला नेले. तेथे त्यांच्या संपत्तीच्या वारसाहक्काशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
संपत्ती मिळविण्याच्या या डावातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर सुषमा यांची नाक-तोंड दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यालगत टाकून देण्यात आला.
दुसऱ्याने आयुष्यभर कष्ट करून कमावलेली संपत्ती बळकावण्याच्या हव्यासातून दोन जण कायद्याच्या कचाट्यात सापडले. संपत्तीच्या कागदावर सही मिळविण्याचा डाव यशस्वी झाला असे वाटत असतानाच पोलिसांच्या तपासाने संपूर्ण कटाचा मुखवटा फाडला गेला.