

सोळावं वरीस धोक्याचं गं... असं एक जुनं गीत आहे... परंतु, हे सोळावं वरीस नेमकं कोणाला धोक्याचं... असा विचार करण्याची वेळ आज आली आहे. कारण सोशल मीडिया, पालकांचे दुर्लक्ष आणि दिमतीला सर्व काही मिळत असल्याने बिघडणार्या तरुणाईचं प्रमाणही तितकंच वाढत चालल्याचे दिसून येते.
सोळा वर्षाची अनघा (नाव बदलले आहे) नववीत शिकत होती. तिलाही आपला बॉयफ्रेंड असावा, असे वाटत असतानाच अकरावीत शिकणारा एक गोरागोमटा तरुण तिच्या आयुष्यात आला. दोघांमध्ये आकर्षण निर्माण झाले अन् त्यांची मजल थेट शारीरिक संबंधांपर्यंत गेली. आश्चर्याची बाब म्हणजे अनघा आता जरी 16 वर्षाची असली तरी तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती दीड वर्षापासून या अल्पवयीन युवकाच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. यावरून त्यांचे संबंध दीड वर्षापासून सुरू असल्याचे स्पष्ट होते. दोघेही चोरून वेळ मिळेल तेव्हा भेटायचे, एकत्र यायचे, असे सुरू होते. विशेष म्हणजे त्यांना एका रिसॉर्ट चालकाने अल्पवयीन असतानाही खोली उपलब्ध करून दिली होती. याचवेळी अनघाने आपल्या बॉयफ्रेंडसमोर एक प्रस्ताव ठेवला. आपण दोघेच कितीवेळा फिरायचे, तुझ्या मित्रांनाही बोलावून घे, आपण फिरायला जाऊ. तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने अन्य दोघा आपल्या समवयस्क मित्रांना बोलावून घेतले. खरे तर तिघेही सतरा वर्षाचे अन् अल्पवयीन. यामध्ये एकजण पोलिस अधिकार्याचा मुलगा. हे चौघेही त्याच रिसॉर्टवर गेले. जाताना ते बीअरही घेऊन गेले होते. बीअर पिऊन एन्जॉय केले आणि नेहमीसारखेच घरी परतले.
हे सर्वजण दुसर्या दिवसापासून आपल्या नियमित कामाला लागले देखील. परंतु एन्जॉय करण्याच्या नादात आणि बहुदा नशेत या युवतीची दीड तोळ्यांची सोनसाखळी कुठे तरी तुटून पडली. तिच्या गळ्यात सोनसाखळी दिसली नाही तेव्हा आईने विचारले. तिने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पालकांनी जेव्हा तिला चांगलेच धारेवर धरले तेव्हा तिने घाबरून सर्व काही सांगितले. आपल्या मुलीचा प्रताप ऐकून पालकांना तर घामच फुटला. परंतु, त्यामध्ये त्यांनी वेळ न दवडता थेट पोलिस ठाणे गाठले. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तेव्हा पोलिसांनी हे प्रकरण बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) येत असल्याचे सांगत तसा गुन्हा दाखल करून घेतला. ही तीन मुले तर यामध्ये सापडलीच; परंतु, रिसॉर्ट देणार्या दोघांसह कारमधून सोडणारा आणखी एकजण अशा सहाजणांवर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. हे सर्वजण सध्या कारागृहात शिक्षा उपभोगत आहेत.
हे सर्व प्रकरण जरी युवतीच्या मर्जीने झाले असले तरी ती अल्पवयीन असल्याचे कायदा सांगतो. त्यामुळे या तिन्ही अल्पवयीन युवकांचा गुन्हा कमी होत नाही. सध्या पोक्सो अंतर्गत 20 ते 30 वर्षे शिक्षा होत आहे. या प्रकरणात शिक्षा होऊन जर हे युवक आत गेले तर त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होणार आहे, हे मात्र निश्चित.
एचआयव्ही टेस्ट करायची आहे! : काही दिवसांपूर्वी एका 55 वर्षीय प्रसूतितज्ज्ञ महिला डॉक्टरने सांगितलेला किस्सा. त्यांच्याकडे एका 17 वर्षाच्या मुलीला घेऊन आई गेली. तिला लघवीच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचे आईचे म्हणणे होते. आईला बाहेर थांबायला सांगून डॉक्टरांनी युवतीची तपासणी सुरू केली. आई बाहेर जाताच ती युवती ताड्कन उठून बसली अन् डॉक्टरांना म्हणाली, मॅडम मला एचआयव्ही टेस्ट करायची आहे. हे ऐकून धक्का बसलेल्या डॉक्टरांनी का, असा प्रश्न केला, तेव्हा ती म्हणाली, माझा काही युवकांशी संबंध आला आहे. त्यापैकी एकासोबत सुरक्षित साधनांचा वापर केला नव्हता. हे सर्व सांगताना त्या युवतीच्या चेहर्यावर पश्चात्तापाचा साधा लवलेशही नव्हता. तिचे हे बोलणे ऐकून महिला डॉक्टर लाजत होती. परंतु, ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती, असे डॉक्टर सांगत होत्या. त्यामुळे आजकाल पालकांनी आपल्या पाल्यांना नेमके कसे संस्कार द्यायला हवेत, याबद्दल डॉक्टर बरेच काही सांगून गेल्या.
दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर बालअत्याचार प्रतिबंधक कायदा तथा पोक्सो अस्तित्वात आला. अल्पवयीन युवतीच्या इच्छेनुसार असो अथवा अनिच्छेने, तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले अथवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यास या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो. अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन युवक, कॉलेज तरुण असोत अथवा वयस्कर व्यक्ती, पोक्सो म्हणजे काय हे माहिती नसल्याने गुन्हा करतात. त्यानंतर 20 ते 30 वर्षांचा कारावास झाला की पश्चात्ताप करतात. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला नको त्या वयातील आकर्षण टाळणे याबरोबरच कायदा, पोक्सो व या गुन्ह्यांमध्ये मिळणारी गंभीर शिक्षा याबाबत माहिती द्यायला हवी.