

विवेक गोगटे, सिंधुदुर्ग
Newlywed Woman Scam
मे महिन्याबरोबरच लग्नसराईही संपली. सगळीकडची धामधूम हळू थंडावली. आकाशात फुटकळ ढग जमा होऊ लागले. शेतीविषयक कामांची जमवाजमव सुरू झाली. त्याबरोबरच सणांची ओढ महिलांना लागली. सुषमाच्या अंगाची लागलेली हळद अजून आपले अस्तित्व दाखवत होती. नुकतेच लग्न होऊन शिरसाटांच्या घरात प्रवेश केलेली नववधू ती, नव्याची नवलाई कौतुक सगळे काही सुरू होते. मे महिन्याबरोबरच लग्नसराईही संपली. सगळीकडची धामधूम हळू थंडावली. आकाशात फुटकळ ढग जमा होऊ लागले. शेतीविषयक कामांची जमवाजमव सुरू झाली. त्याबरोबरच सणांची ओढ महिलांना लागली. सुषमाच्या अंगाची लागलेली हळद अजून आपले अस्तित्व दाखवत होती. नुकतेच लग्न होऊन शिरसाटांच्या घरात प्रवेश केलेली नववधू ती, नव्याची नवलाई कौतुक सगळे काही सुरू होते.
तो ज्येष्ठ महिना होता. वटसावित्रीच्या व्रतासाठी नटून सजून पारावारच्या वडाच्या झाडापाशी गावातील सुवासिनींची गर्दी झालेली, सुषमाही त्यात होती. सासू सासर्यांनी हौसेने केलेले दागिने व नवीन वस्रे परिधान करून पहिलीच पूजा करायला आली होती.
सुषमाच्या सासूबाईंनी मोठ्या हौसेने नव्या सुनेला पूजेची तयारी करून दिली. दागदागिने काढून दिले. सुषमाही हट्टाने सर्वच्या सर्व दागिने मागून घेतले व घातलेही. बायकांना तशी सणासुदीला मिरवायची भारीच हौस. सासूबाईंना त्यांचे तरुणपण आठवे. त्यांनी हौस मौज केली म्हणून सुषमालाही यांनी सोन्यानं सजवलं, मढवलं होतं. ह्या हौसेला कारणही तसेच होते. सुधाकरचं वय वाढले होते. पण कुणी मुलगी त्याच्या गळ्यात हार काही घालत नव्हती. घरची परिस्थितीही उत्तम; पण गावात राहाणार्या तरुणांची जी व्यथा तीच त्याचीही. सधन शेतकरी असूनही फक्त खेडेगावात राहून शेती-वाडी करतो, ह्या एकमेव कारणांमुळे त्याचे लग्न ठरत नव्हते.
अशा परिस्थितीत सुधाकरच्या कुटुंबीयांनी एका परप्रांतीय मुलीबरोबर त्याचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. नाईलाजास्तव हल्ली बरीच लग्नाळू मुले हा पर्याय स्वीकारताना दिसत होती आणि कारवारी-कानडी मुली मराठी घरात प्रवेश करत होत्या. सुधाकरच्या वडिलांनीही अशाच एका मध्यस्थामार्फत व्यवहार पक्का केला. त्याची गलेगठ्ठ फी देऊन त्यांनी सुषमा नावाची सून घरात आणली. भाषेची अडचण होती पण कालांतराने ती दूर होईल आणि सुधाकरचा संसार सुखाचा होईल, ही आई वडिलांची माफक इच्छा! त्यासाठी त्यांनी आपल्याकडील साठवलेल्या पुंंजीतील बराचसा भाग मध्यस्थांच्या हवाली केला होता.
दुपारच्या जेवणाची तयारी सासूबाईंनी केली. सुनेच्या उपवासासाठी फराळही केला. मात्र बराच वेळ होवूनही सुषमा वडाची पूजा करून परत न आल्याने सासू-सासर्यांना सुषमाची काळजी वाटू लागली. कारण वाडीतील सर्व सुवासिनी आपापल्या घरी परतताना दिसत होत्या; मात्र सुधाकरबरोबर गेलेली सुषमा अजूनही घरी परतली नसल्याने सुधाकरच्या वडिलांनी सुधाकरला सुषमाबद्दल विचारले. सुधाकरने सांगितले की वडाची पूजा केल्यावर इतर सुवासिनींना वट पौर्णिमेचे वाण देण्यासाठी सुषमा मागे राहिली होती.
जेवण्याची वेळ टळून जात असल्याने घरच्या लोकांनी सुधाकरला सुषमाला पहायला पाराकडे पिटाळले होते. सुधाकर वडाच्या पाराकडे आला, पण तिथे तर कुणीच नव्हते. वडाच्या झाडाला गुंडाळलेला दोरा, मुळाशी वाहिलेली फुले आणि इतर पूजा साहित्य आणि पारंब्याना लोंबकळणारी चुकार गुराखी पोरे! सुधाकरने त्यातल्या एका पोराला विचारले तर तो म्हणाला, बायका पूजा उरकून कधीच गेल्या. सुधाकर चक्रावला, मग तो शेजार्या-पाजार्यांकडे चौकशी करू लागला; पण तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता. सुधाकरबरोबर गेलेली सुषमा अजूनही घरी परतली नसल्याने सुधाकरने पूर्ण वाडी पालथी घालूनही तिचा शोध काही लागला नाही. त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
घरी येऊन त्याने आई-वडिलांना सगळे वृत्त सांगितले. आपल्या काही मित्रांना बरोबर घेत त्याने आजूबाजूच्या परिसरात तपास सुरू केला. लग्नातील फोटो घेऊन काहीजण शेजारच्या गावातही गेले. अखेर निराश झालेल्या सुधाकरने कुडाळ पोलिस ठाणे गाठत रीतसर तक्रार दाखल केली. नवविवाहित सुषमाचा फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच ह्याच मुलीबरोबर लग्न केलेले, फसगत झालेले अनेक नवरदेव कणकवली, मालवण, वेंगुर्ला तालुक्यातून पुढे आले आणि कारवारी नववधूंच्या पलायनामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे उघड झाले. गरजवंत लग्नाळू युवकांना फसवून लग्न करणे आणि दागदागिने घेऊन पोबारा करणे असे प्रकार बेळगाव, नंदगड येथील विधवा सुषमाने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होऊन तिला व मध्यस्थी महिला अनिता हिला पकडण्यात कुडाळ पोलिस यशस्वी झाले. सुषमा व अनिता या महिलांनी सिंधुदुर्गात अनेकांना फसविल्याचे उघड झाले. सन 2015 मध्ये वेंगुर्ले येथील एका युवकाशी सुषमा विवाह करून पळून जाण्यात यशस्वी झालेली होती. मालवण व कणकवलीतही असेच प्रकार घडले होते.