

स्वप्निल पाटील, सांगली
पूर्वी आरोग्यपंढरी म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख देश-परदेशातही होती, पण गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही ओळख ‘ड्रग्ज डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांचा ड्रग्ज तस्करीत थेट समावेश आढळून आला आहे. आता तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांनाच अटक केल्यामुळे सांगलीतील एमडी ड्रग्ज तस्करी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असल्याचे स्पष्ट झाले आहे...
सांगली जिल्ह्यातील कुपवाड (ता. मिरज), इरळी (ता. कवठेमहांकाळ) आणि कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्जवर गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईमुळे सांगली हे एमडी ड्रग्ज निर्मितीचे केंद्र बनले आहे का, अशी शंका उपस्थित होते. जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी, कार्वे एमआयडीसी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे सुरू असणार्या एमडी ड्रग्ज तस्करीच्या गोरखधंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गेल्यावर्षी पुण्यातील एमआयडीसीमध्ये निर्माण केल्या जाणार्या एमडी ड्रग्ज कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. परंतु त्या ठिकाणी निर्माण केलेले एमडी ड्रग्ज सांगलीतील कुपवाडमध्ये साठा करून ठेवले होते.
कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणार्या गजबजलेल्या ठिकाणी अडगळीची खोली भाड्याने घेऊन, त्या ठिकाणी सुमारे 100 किलो एमडी ड्रग्जचा साठा करून ठेवला होता. ही माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यावेळी सांगली जिल्हा हादरला होता. त्यामुळे सांगली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
या घटनेनंतर काहीच महिन्यांत मुंबईतील मीरा रोड येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या काही हस्तकांना मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. सखोल चौकशी केली असता, मुंबईत विक्रीसाठी आलेल्या एमडी ड्रग्जची सांगली जिल्ह्यातील इरळी या गावात निर्मिती केल्याची माहिती समोर आली. या ठिकाणी निर्माण केलेले एमडी ड्रग्ज आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होत असल्याची धक्कादायक बाब देखील याचवेळी समोर आली होती.
मुंबई गुन्हे शाखेने कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावात छापा टाकला आणि एमडी ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. इरळी येथे एमडी ड्रग्ज निर्माण करणार्या तस्करांना बेड्या ठोकत मुंबई गुन्हे शाखेने 252 कोटी रुपयांचे 123 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. कारखान्यातील मशिनरीसह सर्व बोर्याबिस्तरा गोळा करून मुंबई गुन्हे शाखेने मुंबईतून तपास सुरू केला. यावेळी दुबईतून ताहेर सलीम डोला आणि कुब्बावाला मुस्तफा हे दोघे हे रॅकेट चालवीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
इरळी या छोट्याशा गावातून एमडी ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय गोरखधंदा सुरू असल्याने तपास यंत्रणा देखील चक्रावल्या. मुंबई गुन्हे शाखा आणि सीबीआयने याचा तपास केला. ताहेर सलीम डोला आणि कुब्बावाला मुस्तफा हे दोघे कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहीम याचे साथीदार निघाल्याने त्यांना भारतात आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हालचाली सुरू झाल्या. दोघांनाही भारतात आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली. जूनमध्ये ताहेर सलीम डोला याला भारतात आणण्यात यश आले होते, तर आता कुब्बावाला मुस्तफा यालाही भारतात आणले आहे.
या दोघांनी दुबईत बसून मुंबईतील हस्तकामार्फत इरळीमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना थाटला होता. वासू जाधव हा या निर्मिती कारखान्यातील म्होरक्या होता. इरळी गावात शेजारीच असणार्या ढालेवाडीमधील तो रहिवासी. त्याने ड्रग्ज निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी असणारी जमीन घेतली होती. याच जमिनीत असणार्या पत्र्याच्या शेडमध्ये कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज निर्माण केले होते.
दोन महिन्यांपूर्वी विटा शहराजवळ असणार्या कार्वे एमआयडीसीतही एमडी ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आले होते. या ठिकाणी देखील 30 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. विटा येथे निर्माण केल्या जाणार्या एमडी ड्रग्ज कंपनीचा प्लॅनही मुंबईतील आर्थररोड कारागृहातच ठरला होता. मुंबईमध्ये एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणी अटकेत असणार्या तस्करांनी हा प्लॅन आखला होता. अवघ्या काही दिवसांत त्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते.
ज्या गावात पंचक्रोशीतील लोक देखील जाणार नाहीत, त्या गावात दुबईत बसणार्या तस्करांची नजर पडली होती. यंत्रणेला चकवा देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार या दुबईतील तस्करांनी मांडला होता. एमडी ड्रग्जमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. यालाच खत-पाणी घालण्यासाठी वासू जाधवसारखे ग्रामीण भागातील तस्कर देखील बळी पडत आहेत.
सांगलीसारख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा मिळून आला. तीन मोठ्या कारवायांमुळे सांगली जिल्हा पूर्णतः हादरून गेला आहे. दुबईत बसणार्या तस्करांची नजर सांगलीवर पडते, तर याचा काळाबाजार मुंबईमध्ये किती मोठ्या प्रमाणात सुरू असेल, याचा अंदाज लावलेलाच बरा. 90 च्या दशकात ज्या गुन्हेगारांनी पोलिसांच्या भीतीने परदेशात पळ काढला, तो धाक आता पुन्हा निर्माण करण्याचे आव्हान पोलिस पेलणार कार, हा खरा सवाल आहे.
90 च्या दशकात मुंबईत ड्रग्ज तस्करांनी थैमान घातले होते. याच तस्करीतून एकमेकांचे मुडदे पडत होते. तत्कालीन मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. कारवायांना ऊत आला होता. थेट एन्काऊंटर केले जात होते. त्यामुळे ड्रग्ज तस्करांनी मुंबईबाहेर तसेच परदेशात पळ काढला होता. मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते खरे, पण त्यांचा बीमोड मात्र झालेला नाही. भारतातून पलायन केलेल्या आंतरराष्ट्रीय तस्करांनी दुबईत बसून हा गोरखधंदा सुरूच ठेवला आहे. मुंबईमधील काही ड्रग्ज तस्कर कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांच्या संपर्कात आहेत. याच हस्तकांमार्फत दुबईत बसून देखील इरळीसारख्या अत्यंत दुर्गम आणि दुष्काळी पट्ट्यातील गावात एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना थाटला होता.