

सकाळी सातची वेळ. संदीप ऑफिसची तयारी करत होता. तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. कोणाचा असेल असे म्हणत त्याने फोन उचलताच यांत्रिक आवाज कानावर आला.
तुमचं बँक अकाऊंट सस्पेंड झाले आहे. अधिक माहितीसाठी एक दाबा. संदीपने नकळतच बटण दाबले. पुढच्या क्षणी कॉल एका अधिकृत वाटणार्या व्यक्तीकडे वळला गेला. आवाजात इतका दबाव होता की, संदीप घाबरला. तुमच्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाला आहे. लगेच कार्ड नंबर आणि ओटीपी द्या, नाही तर खाते बंद होईल, असे समोरून सांगताच संदीपने माहिती देऊन टाकली. माहिती देताच काही मिनिटांतच त्याच्या खात्यातून तीस हजार रुपये गायब झाले.
हा संपूर्ण खेळ रोबोकॉल सॉफ्टवेअरद्वारे सायबर चोरट्यांकडून सध्या रचला जात आहे. संगणकातून हजारो नंबरवर एकाच वेळी ध्वनिमुद्रित कॉल्स फिरवले जातात. काही लोक चुकून बटण दाबतात आणि थेट फसवणूक करणार्या सायबर चोरट्याकडे जोडले जातात. मग भीती दाखवून किंवा आकर्षक ऑफर देऊन त्यांच्याकडून तपशील उकळले जातात. सध्या देशभरासह राज्यात अशा प्रकारे अनेकांना गंडा घालण्यात आला आहे.
रोबोकॉल करणारी सायबर चोरटी फक्त भीती दाखवत नाहीत, तर कधी कधी लालचही दाखवतात. अभिनंदन! तुम्हाला 50 लाखांची लॉटरी लागली आहे. कर भरण्यासाठी फक्त पाच हजार रुपये पाठवा, काही तरुणांना जॉब इंटरव्ह्यू कन्फर्मेशन किंवा विदेशी व्हिसा मंजुरी असे कॉल्स येतात. आवाज इतका विश्वासार्ह वाटतो की क्षणभरासाठी तो खरा वाटतो.
कॉलवर सुरुवातीला थोडा विलंब जाणवला, आवाज नेहमीसारखा न वाटता रेकॉर्डिंगसारखा वाटला किंवा वारंवार वेगवेगळ्या नंबरवरून एकच मेसेज आला तर समजून घ्या हा रोबो कॉल आहे.
बँक, सरकारी कार्यालय किंवा पोलिस कधीच फोनवर ओटीपी, कार्ड नंबर किंवा आधार विचारत नाहीत हे लक्षात ठेवा. कधीही ‘बटण दाबा’ असा पर्याय स्वीकारू नका. असे फोन आल्यास नंबर ब्लॉक करा आणि 1930 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा.