

दुसर्या दिवशी भल्या सकाळी रखमाजी नदीवर गेला. आंघोळ केली आणि मंदिरात येऊन काहीबाही पुटपुटत देवाची पूजा सुरू केली. इकडे गावात कानोकानी वार्ता पसरली की, गावाबाहेरच्या मंदिरात कुणीतरी एक मोठा साधू-सिद्धपुरुष आला आहे.
वारणा नदीत आंघोळ करायला थांबलेल्या एका बैराग्याची कफनी, झोळी आणि त्रिशूल चोरून रखमाजीने नवाच अवतार धारण केला. हळूहळू रखमाजीच्या डोक्यात पुढं काय करायचं त्याची चक्र फिरू लागली. आता साधू-बैरागी बनूनच राहायचं, असं त्याच्या मनानं ठरवूनच टाकलं. चालत चालत सायंकाळच्या वेळी रखमाजी वारणा नदीकाठावरील वाळवा तालुक्यातील एका संपन्न गावात दाखल झाला. चारी बाजूला उसाची शेती, केळीच्या बागा, रानारानात सुरू असलेल्या पाण्याच्या मोटारी, धुरळा उडवीत चाललेल्या मोटारी आणि मोटारसायकली बघून रखमाजीच्या लक्षात आलं की, गाव तसं तोलामोलाचं आहे. बघू इथंच काय बसकतान बसतंय का, म्हणून रखमाजी चालत चालत गावात शिरला तर सुरुवातीलाच त्याला एक मंदिर दिसलं. चालून चालून दमलेल्या रखमाजीनं देवळाच्या पायरीवरच बसकन मारली.
सायंकाळी दूर अंतरावरून एक म्हातारा मंदिराकडं येताना रखमाजीला दिसला, तसं त्यानं मांडी घालून हातात त्रिशूल धरून ‘ओम नम:शिवाय’चा जप सुरू केला. म्हातारा आला, देवळात गेला आणि देवाच्या पायाबिया पडून झाल्यावर त्याचं लक्ष रखमाजीकडं गेलं. ह्यो कोण महाराज, म्हणून म्हातारा चौकशीसाठी रखमाजीकडं गेला..!
काय म्हाराज, कंच्या गावचं? म्हणून म्हातार्यानं विचारताच सगळं प्लॅनिंग केल्यानुसार रखमाजी बोलला, ‘आमा साधू-संन्याशाला कुठलं आलंय गाव आणि शिव, खाली धरणीमाता आणि वर आभाळ हेच आमचं घर आणि गाव! तसं माझं गाव पार तिकडं कोकणात हाय; पण मला लहानपणीच महादेवाचा द़ृष्टांत झाल्यामुळं मी लहान असतानाच तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात गेलो होतो. तिथं चोवीस वर्षे तपश्चर्या केल्यानंतर आता भारतभ्रमण करण्याची गुरूआज्ञा झाली आहे. आता चाललोय भारतभर फिरायला’.
रखमाजीनं एवढं सांगताच हा कुणी तरी थोर साधुपुरूष असावा, असे वाटून म्हातार्यानं रखमाजीच्या पायावर लोळणच घेतली. रखमाजीला पण तेवढंच पाहिजे होतं. रात्री त्या म्हातार्यानं घरातून चांगलं-चुंगलं जेवण आणून रखमाजीच्या पोटापाण्याची सोय केली. कधी नव्हे ते कित्येक दिवसांत पोटभर खायला मिळाल्यामुळं रखमाजी तिथंच देवळात आडवा झाला. आता हेच नाटक आपण आयुष्यभर वटवायचं हे रखमाजीनं ठरवूनच टाकलं.
दुसर्या दिवशी भल्या सकाळी रखमाजी नदीवर गेला. आंघोळ केली आणि मंदिरात येऊन काहीबाही पुटपुटत देवाची पूजा सुरू केली. इकडे गावात कानोकानी वार्ता पसरली की, गावाबाहेरच्या मंदिरात कुणीतरी एक मोठा साधू-सिद्धपुरूष आला आहे. झालं...गावातील आया-बाया, बाया-बापडी, पोरं-पोरी मंदिराकडं सुटली. येईल तो आधी रखमाजीला दंडवत घालू लागला, मग देवाला! रखमाजीपण तोंडातल्या तोंडातच काहीबाही पुटपुटत पाया पडणार्या प्रत्येकाला आशीर्वाद देऊ लागला. तो काय पुटपुटत होता आणि काय आशीर्वाद देत होता, ते रखमाजीलाच माहीत. तेवढ्यात कुणीतरी महाराजांना त्यांचं नाव विचारलं आणि रखमाजीनं पण ठरवल्याप्रमाणे स्वत:चं बारसं स्वत:च घालून टाकलं. ‘स्वामी शिवानंद, या देहाला स्वामी शिवानंद म्हणतात’!
झालं... शिवानंदाचं एकदाचं बारसं पार पडलं आणि जवळपास अख्ख्या गावाला या स्वामी शिवानंदानं भूरळ पाडून टाकली. सकाळ-संध्याकाळ भक्तांच्या रांगा लागू लागल्या. गावातूनच नव्हे तर आजूबाजूच्या चार-दोन गावांतूनही लोक शिवानंदाच्या दर्शनासाठी लोक येऊ लागले. कोण भक्त शिवानंदाला फळे देऊ लागला, कोण खारीक-खोबरं देऊ लागला, कोण तूप-रोटी चारू लागला, कोण वस्त्रदान करू लागला. शिवानंदानं आज हे खाण्याची इच्छा व्यक्त केली, तर गावातील बाया-बापड्या धा-धावून त्याला मागेल ते खायला घालू लागल्या. पूर्वी खायला न मिळाल्यामुळं हाड-कातडी एक झालेल्या शिवानंदानं आठ-पंधरा दिवसांतच चांगलं बाळसं धरलं...गडी चांगलाच गुटगुटीत दिसायला लागला.
हळूहळू बाया-बापड्या आपापली गार्हाणी शिवानंदापुढं मांडू लागल्या, तोही या बाबतीतील चांगला जाणकार असल्याचा आव आणून मनात येतील ते उपाय करायला सांगू लागला. त्याचा शब्द प्रमाण मानून लोकही न चुकता तो सुचवील ते उपाय करू लागले. कर्मधर्म संयोगाने एखाद्याची इच्छा पूर्ण झाली तर लगेच शिवानंदाचा उदोउदो होऊ लागला. शिवानंदानं सांगितलेला उपाय करूनही काही काम झालं नाही, तर लोक शिवानंदाला बोल न लावता आपल्याच नशिबाला दोष देत शांत राहू लागले. अशा प्रकारे त्या गावात आणि आजूबाजूच्या दोन-चार गावांत शिवानंदाचं स्तोम चांगलंच माजलं. पहिल्यांदा भारत भ्रमणाला निघालो असल्याचं सांगणार्या शिवानंदानं त्या गावात जवळपास तीन-चार महिने मुक्कामच ठोकला.
त्याच गावात एक प्रेमी युगुल होतं. पोरगी पाटलाची आणि पोरगं इतर मागासवर्गीय समाजातील असल्यानं घरच्या लोकांकडून त्यांच्या लग्नाला मंजुरी मिळण्याची सुतराम शक्यता नव्हतीच. पण, रोजच्या रोज गावातील त्या देवळामागं या जोडप्याच्या भेटीगाठी ठरल्याप्रमाणं होत होत्या. हळूहळू शिवानंदाच्याही सगळा प्रकार लक्षात आला होता. तरणाबांड असलेल्या शिवानंदाचाही जीव ‘त्याच पोरीत’ अडकला आणि शिवानंदाच्या डोक्यात एक भयंकर कारस्थान शिजायला सुरुवात झाली.
(क्रमश:)