

अनेकवेळा अंधश्रद्धेतून गुन्हेगारीचा उदय पहायला मिळतो. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आपले गुन्हेगारी साम्राज्य उभा करणारे अनेक भोंदूबाबा आज कारागृहात खितपत पडलेले आहेत. पण यातून बोध घेऊन असले प्रकार मात्र थांबलेले दिसत नाहीत. अशाच काही भोंदूबुवांच्या गुन्हेगारी जगतांचा वेध घेणारे ‘अंधश्रद्धेतून गुन्हेगारीकडे’ हे नवीन सदर...
रखमाजी हा एक पाथरवट होता... रत्नागिरी जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात तो लहानाचा मोठा झाला. रखमाजीच्या घरात अठराविश्वे दारिद्य्र जणू काही नांदायलाच आलं होतं. दगडी पाटे-वरवंटे घडविणे हा रखमाजीच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय. त्यातून जे काही चार पैसे मिळतील त्यातून पोटाची खळगी भरायची आणि काहीच नाही मिळालं तर दाताचं पाणी गिळत दिवस काढायचं अशी सगळी हालत! रखमाजी दहा-बारा वर्षांचा असतानाच दहा बाय दहाचं घर कसलं एक खुराडं त्याच्यासाठी मागं ठेवून एका पाठोपाठ एक एक करीत त्याचे आई-वडील निवर्तले, जवळचं असं कुणी उरलं नव्हतंच. त्यामुळे अगदी लहान असल्यापासून रखमाजीवर पोटापाण्यासाठी छन्नी-हातोडे घेऊन पाटं-वरवंटं घडवीत दिवस काढण्याची वेळ आली. रखमाजी लोकांचे पाटं-वरवंटं तर घडवत होता, पण त्यातून त्याचं नशीब काही घडत नव्हतं, पोटा-पाण्याची आबाळ तर काही विचारूच नका, छन्नी-हातोड्याच्या प्रत्येक घावाबरोबर आतड्याला पीळ पडत होता.
दहा-पंधरा वर्षे दगडांशी झटाझोंबी करून करून रखमाजी आता जवान झाला होता, पण परिस्थितीत काही फरक पडला नव्हता. इतक्या अपार कष्टानंतरही रखमाजीच्या हाता-तोंडाची गाठ जरा मुश्किलीनंच पडायची. जिथं रखमाजीच्या अन्ना-पाण्याचा पत्ता नाही, रहायचा धड ठिकाणा नाही, तिथं रखमाजीचे ‘दोनाचे चार होण्याची बात’ तर फार लांबची! शेवटी या सगळ्याला वैतागून, आपल्या नशिबाला दोष देत रखमाजीनं गाव सोडायचा निर्णय घेतला. पण जायचं कुठं, करायचं काय याचा नेमका बेतच नव्हता. बघू... वाट फुटंल तिकडं जावू... काय मिळंल ते खाऊ... आसरा मिळंल तिथं राहू... असा विचार करून एकेदिवशी ऐन उन्हाळ्यात रखमाजीनं छन्नी-हातोडा एका पिशवीत घेऊन ती पिशवी खांद्यावर टाकून, घराला टाळं ठोकून गाव सोडलं. पण, हा उन्हाळा त्याच्या आयुष्याला दुर्दैवाच्या रखरखीत खाईत लोटणार आहे, ही वाट आपणाला ‘एका भलत्याच वाटेवर’ घेऊन जाणार आहे, असे त्याच्या ध्यानीमनीही नव्हते.
रत्नागिरी सोडून रखमाजीने थेट पूर्वबाजूच्या दिशेने चालायला सुरुवात केली. खिशात गिन्नीसुद्धा नसल्यामुळे चालत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता, मजल दरमजल करीत रखमाजीची वरात सुरू झाली. आज या गावातील एखाद्या देवळात मुक्काम कर, उद्या त्या गावातील एखाद्या ओसाड जागी झोपून जायचे, भीक मागून मिळाले तर खायचे, नाहीतर आजूबाजूच्या शेतवाडीत शिरून जे काय मिळेल ते ओरबाडून खायचे, ओढ्या-नाल्यांचे पाणी प्यायचे आणि पुढे चालत रहायचे अशी रखमाजीची वाटचाल सुरू होती. गाव सोडून रखमाजीला पंधरा-वीस दिवस झाले होते, ना आंघोळ ना पाणी, त्यामुळे अंगाला पार दुर्गंधी सुटली होती. दोन-चार ठिकाणी कुणी वेडा समजून तर कुणी चोर समजून रखमाजीला चोपही दिला होता. त्यामुळे अंगातील विजार-शर्टाची तर पार लक्तरं झाली होती. तीच लक्तरं अंगावर बाळगत रडत खडत रखमाजीची वाटचाल सुरू होती. किमान लाज झाकण्यापुरते तरी कपडे मिळावेत, अशी रखमाजीची इच्छा होती, पण मिळणार कुठून हाच तर खरा सवाल होता.
वीस-पंचवीस दिवस उपाशीपोटी चालून चालून पार भेंडाळून गेलेला रखमाजी एके दिवशी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वारणा नदीकाठी पोहोचला. दुपारचा भर मध्यानीचा वेळ असल्यामुळं सूर्य आग ओकत होता, अंगाची नुसती लाही लाही होत होती. त्यामुळं रखमाजीनं आपल्या अंगावरील चिंध्या उतरवून ठेवल्या आणि नदीत डुबक्या मारायला सुरुवात केली. त्याच नदी किनार्यावरून एक बैराग्यांचा जथ्था निघाला होता. त्यांच्याही अंगाची तलखली सुरू होती. त्यामुळं बैराग्यांनी आपापल्या ‘कफन्या’ नदीकाठावर उतरवून नदीत पोहायला सुरुवात केली. नेमक्या त्या क्षणी रखमाजीच्या मनात काय आले कुणास ठाऊक, तो लगबगीने नदीतून बाहेर आला आणि बैराग्यांचं लक्ष नाही असं बघून बैराग्यांच्या दोन बर्यापैकी कफन्या, एक झोळी आणि एक त्रिशूल घेऊन रखमाजीनं तिथून धूम ठोकली. कालांतरानं बैरागीही नदीतून बाहेर आले, आपल्या दोन कफन्या, एक झोळी आणि एक त्रिशूल गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं, पण फारशी शोधाशोध न करता बराग्यांचा जथ्था पुढे मार्गस्थ झाला आणि नदीकाठच्या उसाच्या फडात लपून बसलेल्या रखमाजीनं बाहेर येऊन एकच गजर केला...‘अल्लख निरंजन’! (क्रमश:)