

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
मुंबईला लागून असलेला रायगड जिल्हा ड्रग्ज तस्करीचा अडडा बनू पहात आहे. जिल्ह्यात मागील तीन वर्षात झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे 400 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. परदेशातून येणारया ड्रग्जसाठी समुद्र मार्गाचा वापर केला जात असतानाच जिल्हयात वेगवेगळ्या उद्योगांचे कारखाने सुरू असल्याचे कारवायांमधून उघड झाले आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या उद्योगाने जिल्हा बदनाम होत आहे.
मागील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्जतमध्ये एका बनावट सिगारेट फॅक्टरीवर कारवाई केली होती, त्यानंतर लहानमोठ्या कारवाया सुरुच आहेत. मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे जवळच असल्याने या शहरांमध्ये पुरवठा करण्यासाठी रायगडमधील अंमली पदार्थांचे अड्डे तयार करण्यात आले. विशेषत: कर्जत, खालापूर, पेण येथील दुर्गम भागात हे अड्डे कार्यरत होते. या ठिकाणावरुन अंमली पदार्थांबरोबच बंदी घातलेल्या तंबाखुजन्य वस्तुंचा साठा केला जात होते, असे आतापर्यंत झालेल्या पोलीस कारवायांमध्ये दिसून आले आहे. मात्र, या प्रकरणांमधील मुख्य आरोपींचा शोध रायगड पोलिसांना कधीच घेता आला नाही. यावर पूर्ण निर्बंधही घालता आलेले नाहीत. अंमली पदार्थाचे नववर्षांच्या स्वागतासाठी होणार्या विशेष पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांची छुप्या मार्गाने तस्करी होत असते असे प्रकार रोखण्यासाठी रायगड पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थांची खरेदी व विक्री यावर विशेष लक्ष ठेवावे लागते.
कर्जत, खालापूर, अलिबाग, दिवेआगर येथे मुंबई-पुण्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथील हॉटेल, फार्महाऊसमध्ये त्यांच्या रात्रभर रेव्ह पार्ट्या चालतात. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या या अमली पदार्थामध्ये मेफेड्रॉन, गांजा, आणि चरस या अंमली पदार्थांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातून परदेशातही अंमली पदार्थांची तस्करी सुरू झाल्याची धक्कादायक बाब खालापूर तालुक्यात अमली पदार्थ तयार बेकायदा कारखानाच समोर आल्याने उघडकीस आले होते. दोन वर्षापुर्वी पावसाळ्यात रायगडच्या समुद्र किनार्यावर अफगाणी चरसची पाकीटे वाहून आली होती. या घटनेवरुन रायगड जिल्ह्यात सागरी मार्गाने ड्रग्जची तस्करी सुरु असल्याचे उजेडात आले होते.
अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील किनार्यावर ही पाकिटे सापडली होती. यामध्ये 1 किलो 100 ग्रॅम वजनाची 185 पाकीटांचा यात समावेश होता. ज्याची किंमत 8 कोटी 25 लाख 11 हजार रुपये होती. या प्रकरणी अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. पोलीस यंत्रणेसह, केंद्रीय तपास यंत्रणांनी या चरस प्रकरणांचा तपास सुरू केला होता. पण तरिही ही पाकीटे कुठून आली याचा शोध अजूनही लागू शकलेला नाही. तदनंतर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील ढेकू येथे एका इलेक्ट्रीक पोल बनविण्याच्या कारखान्यात बेकायदेशीरपणे मेफेड्रॉन अर्थात एमडी हा प्रतिबंधीत अंमलीपदार्थ तयार केला जात असल्याचे समोर आले. पोलीसांनी सुरवातीला धाड टाकून 85 किलो वजनाचे 107 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते.
तरुणाईमध्ये अंमली पदार्थांचा वापर वाढलेला आहे. ज्या वयात करीयर करायचे असते, त्या वयात ते व्यसनाधीन होत असतात. तरुण पिढीला व्यसनाधीन होण्यापासून वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. रायगड जिल्ह्यात शाळा - महाविद्यालयांमध्ये या निमित्ताने विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
अभिजीत शिवतरे, अपर पोलीस अधीक्षक- रायगड
लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरुक करण्यासाठी तरुण मंडळी, किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच ड्रग तस्करी रोखण्यासाठीही या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. तरुणाईही या पदार्थांचे दिवसेंदिवस मोठ्या प्रणात सेवन करु लागली आहे. किशोरवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे. तसेच या पदार्थांची अवैध तस्करीही सुरू आहे. या कारणास्तव 7 सप्टेंबर 1987 रोजी ‘संयुक्त राष्ट्र संघा’कडून समाजाला अमली पदार्थमुक्त करण्याचा अहवाल सादर केला गेला. 26 जूनला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थंविरुद्ध दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. जे सर्व देशांकडून ते स्वीकारण्यात आले. तेव्हापासून ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ दरवर्षी 26 जून रोजी साजरा केला जातो.