

अशोक मोराळे, पुणे
बबिता आणि राकेशकुमार हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशातील फतेहपूरश्रीकीचे. दोघांचा प्रेमविवाह. कामाच्या निमित्ताने पुण्यातील धायरी परिसरात आपल्या आठ वर्षांच्या मुलासह दोघे वास्तव्यास होते. राकेशकुमार मजुरी करायचा, तर बबिता गृहिणी होती. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडत होती.
त्या दिवशी रात्री दोघांत परत वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, राकेशकुमार याने बबिताचा गळा दाबला. तो जेव्हा भानावर आला तेव्हा बबिता निपाचित पडली होती. यावेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा घरातच होता. त्यानंतर राकेशकुमार याने मुलाला सोबत घेतले. दुकानातून त्याला खाऊ आणून दिला. मुलाला पुन्हा घरी आणले आणि झोपवले. मुलगा झोपला आहे, याची खात्री झाल्यानंतर तो पुन्हा उठला. त्याच्या मनात आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव होता.
मध्यरात्री त्याने एक मोपेड आणली. घरात पडलेला पत्नीचा मृतदेह पोते आणि बेडशीटमध्ये गुंडाळला. ते दुचाकीवर पुढे ठेवलेले मोठे गाठोडे पाहून पोलिसांना संशय आला. दोघांना लक्षात आलं होतं की, काहीतरी गडबड आहे. त्यांच्या नजरेनं अचूक हेरलं होतं. शेवटी पोलिसांची नजर ती त्यांनी राकेशकुमारला थांबण्याचा इशारा केला.
रात्री सुमारे १.३० वाजता राकेशकुमार भुमकर ब्रिजकडून स्वामिनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाला होता. याचवेळी सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्त घालणारे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर आखाडे आणि नील लोंढे यांच्या नजरेस तो पडला. रात्रीच्या वेळी पोलिसांची नजर आपल्यावर पडल्याचे लक्षात येताच राकेशकुमारने क्षणाचाही विलंब केला नाही.
त्याने दुचाकी तिथेच सोडली आणि पळायला सुरुवात केली. मात्र, पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याला पकडण्यात आले. त्याला पोलिस गाडीजवळ आणल्यानंतर आखाडे आणि लोंढे यांनी दुचाकीवर ठेवलेल्या गाठोड्याबाबत विचारणा केली. मात्र, राकेशकुमार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्यांनी गाठोडे उघडण्यास सांगितले. पोते आणि बेडशीट बाजूला करताच गाठोड्यातून महिलेचे पाय दिसले. क्षणातच पोलिसांच्या लक्षात आले की, हे साधेसुधे गाठोडे नव्हते. त्यात एका महिलेचा मृतदेह होता.
यानंतर पोलिसांनी राकेशकुमारची कसून चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या राकेशकुमारने अखेर सत्य सांगितले. काही तासांपूर्वीच घरी पत्नी बबिताचा गळा दाबून खून केल्याची कबुली त्याने दिली. मृतदेह कात्रज बोगद्याजवळील डोंगरात नेऊन टाकण्यासाठी आपण निघालो होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी राकेशकुमार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.