

पुणे : गुंड नीलेश घायवळ जरी विदेशात फरार झाला असला तरी राज्यातील काही राजकीय मंडळींची मात्र त्याने झोप उडवली हे नक्की. कोथरूडमध्ये त्याच्या पंटरनी गोळीबार केला अन् तो पोलिसांच्या रडारवर आला. चौकशीत तो विदेशात असल्याचे पुढे आले. मग प्रश्न निर्माण झाला, एवढा मोठ्या गुंडाला पासपोर्ट मिळालाच कसा? पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने खोटी माहिती देऊन आडनावात बदल केला. एवढेच नव्हे तर त्याचा मोठा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची बाब उजेडात आली. मग राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडाला. तो धाराशिव, बीड आणि अहिल्यानगरचाही डॉन बनल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीलेश मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा. त्याचे कुटुंब कामाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झाले. वडील कमिन्स कंपनीत, तर नीलेश हा वनाज कंपनीत कामाला होता. उच्चशिक्षित गुंड अशीदेखील नीलेशची ओळख आहे. नीलेश याची गजानन मारणे, रुपेश मारणे, संदीप शेलार यांच्याशी मैत्री होती. मात्र वर्चस्ववादातून गजा मारणे टोळीतून नीलेश बाहेर पडला आणि स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार केली. त्याला आपल्या गुन्हेगारी वर्चस्वाचा अंदाज आला असावा. पोलिस रेकॉर्डनुसार त्याच्या टोळीत 48 जण होते. काही कालावधीनंतर नीलेश आणि गजा या दोघांतील संघर्ष विकोपाला गेला.
नीलेश घायवळ याने हे काही एका दिवसात साध्य केले नाही. त्याला साथ मिळाली ती पांढरपेशी पुढाऱ्यांची. घायवळचे नेत्यांसोबतचे फोटो मध्यंतरी समोर आले होते. यावरूनच नेते - गुंड यांचं साटेलोटं अधोरेखित झाले होते.
पुणे पोलिसांनी शहरातील गुंडाविरूद्ध कारवाईचा धडाका लावताच नीलेश घायवळसह अनेक गुंडानी शहराबाहेरचा रस्ता धरला. त्यातच घायवळ याने आपल्या मूळ गावी जाऊन, जामखेड, खर्डा, कर्जत आणि शेजारी लागून असलेल्या धाराशिव व बीड जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण केले. त्यातच त्याला काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळाले.