

परभणी : शहरातील नटराज रंगमंदिरच्या पाठीमागे सोमवारी (दि. १५) रात्री तीन जणांमध्ये झालेल्या झटापटीत २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी नानलपेठ पोलिसांनी तिघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, मृत युवकावरही याच घटनेत दुसऱ्या गुन्ह्यात हल्ल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे ही हत्या आत्मरक्षणात झाली की उद्देशपूर्वक याचा तपास पोलिस करीत आहेत.
गौस खान अकबर खान (वय २३, रा. सेवक नगर, परभणी) असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत मयताचा मेहुणा सय्यद खाजा सय्यद अहमद यांनी तक्रार दाखल केली आहे. यात सोमवारी (दि.१५) रात्री ९ वाजेच्या सुमारास नटराज रंगमंदिरच्या पाठीमागे प्रफुल्ल खिल्लारे, गणेश ऊर्फ गंगाधर पाचंगे, प्रमोद घाडगे या तिघांनी संगनमत करून गौस खान याच्याशी वाद घालून त्याच्यावर काचेच्या बाटल्या व विटांनी हल्ला केला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सपोनि सय्यद हे करत आहेत. तर दुसरीकडे, याच घटनेप्रसंगी तेथे उपस्थित गणेश ऊर्फ गंगाधर पाचंगे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, घटना घडण्याच्या आधी ते मित्रांसह तिथे दारू पित बसले होते. त्यावेळी गौस खान तेथे येऊन प्रमोद घाडगेच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर झटापटीत प्रफुल्ल खिल्लारेच्या छातीवर देखील मार लागला. मग संतप्त होऊन त्यांनी गौस खानला प्रतिउत्तर दिले, असा दावा या फिर्यादीत करण्यात आला आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि कारवार हे करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात विशेष बाब म्हणजे एकाच घटनेवर आधारित दोन परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. एकीकडे गौस खानचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद झाला, तर दुसरीकडे त्याच्यावरच हल्ल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या प्रकरणाचा नेमका संदर्भ शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट यांच्या आधारे सत्यता उघड करण्याचे काम हाती घेतले आहे. या गुन्ह्यातील दोन्ही बाजूंच्या फिर्यादी आणि मयताची परिस्थिती पाहता ही घटना स्वतःचा बचाव करताना घडली की उद्देशपूर्वक हत्या झाली, हे तपासातून पुढे येणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी सेलू, तसेच नानलपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास कार्यवाही केली असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे