

नाशिक : मखमलाबाद येथील शांतिनगर परिसरातील सोसायटीत रात्रीच्या वेळी बंद दरवाजासमोर अंधश्रद्धायुक्त प्रकार करून रहिवाशांमध्ये भीती पसरविण्याच्या हेतूने स्मशानभूमीतून अस्थी व राख आणून टाकल्याचा प्रकार घडला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रबोधन केल्यामुळे घरमालक महिलेने स्वत: ती राख व अस्थी गोळा करत पोलिसांच्या स्वाधीन केली.
मखमलाबाद रोडवरील शांतिनगर परिसरात वैजयंती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या दरवाजाबाहेर रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने भानामती वा करणीचा बनाव करून भीती पसरविण्याचा खोडसाळपणा केला होता. स्मशानभूमीतून राख व अस्थी आणून रात्रीच्या वेळी बंद दरवाजापुढे पसरविल्याचा प्रकार सकाळी घरमालक महिलेला आढळला. त्यांनी तत्काळ महाराष्ट्र 'अंनिस'चे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांना माहिती दिली. त्यांनी शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे यांच्यामार्फत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अंकुश चिंतामणी व पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हवालदार संतोष सुपेकर, विनायक तांदळे यांनी 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी पाहणी केली. डॉ. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा बुवाबाजीविरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे आदींनी स्थानिक रहिवाशांचे प्रबोधन केले. हा प्रकार अंधश्रद्धेचा भाग असल्याचे सांगितले. त्यामुळे घरमालक महिलेने ती राख, अस्थी आदी साहित्य उचलून घेत पिशवीत भरले.
या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला रात्री कुलूप लावलेले असतानाही हा प्रकार घडला. त्यामुळे हा प्रकार इमारतीत राहणाऱ्या कोणीतरी व्यक्तीनेच केला असावा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. यापूर्वीही दोन ते तीन वेळा बंद दरवाजासमोर लिंबू व हळदी-कुंकू फेकलेले आढळले असल्याचे काही रहिवाशांनी 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांना सांगितले.
कोणी व्यक्ती जर जादूटोणा करण्याच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत, भीती आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते सात वर्षांची कारावासाची शिक्षा व पाच हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद कायद्यात आहे. अशा प्रकाराने घाबरून न जाता रहिवाशांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी.
डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सचिव, अंनिस