

नाशिक : गौरव अहिरे
गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांकडून झाेपडपट्टी किंवा इतर ठिकाणी कोबिंग ऑपरेशन मोहिम राबवत असतात. त्याचप्रमाणे आता शहर पोलिस दलात बेशिस्त वर्तन करणारे, गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून शहर पोलिसांनी खात्यांतर्गत शिस्त लावण्यास हालचाली सुरु केल्या आहेत.
महिन्याभरापूर्वी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या आवारात दोन पोलिस अंमलदारांनी झुंज करीत गोंधळ घातला होता. तर एका पाेलिस कर्मचाऱ्याचा एमडी तस्करांसोबत शेकडो वेळा संवाद झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याचप्रकारे काही पोलिसांबाबत गैरवर्तन, शिवराळ भाषेत बोलणे किंवा इतर तक्रारी येत असतात. या तक्रारींची गंभीर दखल घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. पोलिस मुख्यालयाने सर्व पोलिस ठाण्यांसह विभागांना त्यांच्याकडे कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीसंदर्भातील सविस्तर अहवाल मागवला आहे. यात मद्यपी, व्यसनाधीन, बेशिस्त वर्तन करणारे, महिलांबाबत वर्तवणूक चांगली नसणारे, गुन्हेगारांसोबत संपर्कात असणारे, आक्षेपार्ह भाषेत बोलणाऱ्या पोलिसांची नावे कळविण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे अनेक अंमलदारांवर वचक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयुक्तालयाने मागविलेल्या अहवालानुसार संबंधित पोलिस कर्मचाऱ्यास पहिल्यांदा समज देत वर्तवणूकीत सुधारणा करण्याचे आदेश दिले जातील. त्यानंतरही वर्तवणूक न सुधारल्यास संबंधिताविरोधात खातेअंतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच व्यसनाधीन असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्यसनमुक्तीसाठी पोलिस आयुक्तालय प्रयत्न करणार आहे. तणावग्रस्त पोलिसांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठीही प्रयत्न होत आहे.
दारु व इतर व्यसन करणारे पोलिस अधिकारी-कर्मचारी
बेशिस्त वर्तन किंवा गुन्हेगारांसोबत संबंध असलेले पोलिस
सतत तणावात असणारे अधिकारी-कर्मचारी
स्वत:ला किंवा इतरांच्या जीविताला धोका निर्माण करु शकतात असे अधिकारी-कर्मचारी
महिलांबाबात दृष्टीकोन, वर्तवणूक चांगली नसलेले अधिकारी-कर्मचारी
पोलिसांविरुद्धच प्रक्षोभक संभाषण करणारे अधिकारी-कर्मचारी
पाेलिस दलात बेशिस्त, गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात हाणामारी करणाऱ्या दोघा पोलिसांची दंगल नियंत्रण पथकात बदली करण्यात आली. मात्र दाेघेही सरकारवाडा पोलिस ठाण्यातच सेवा बजावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कारवाई कागदावर न ठेवता त्यांची अंमलबजावणीही कठोरपणे झाली पाहिजे, अशी अपेक्षा पोलिसांकडूनच व्यक्त होत आहे.