

नाशिक : कामटवाडे येथे अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शरणपूर रोडवरील एका सराईत गुन्हेगाराने सांगितल्यानंतर खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
मोहन ज्ञानेश्वर वायचळे (१८, रा. कामगारनगर), राहुल राजू गडदे (२०) व साहिल पिंटू जाधव (२१, रा. दोघे रा. आनंदवली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कामटवाडे स्मशानभूमीजवळ सोमवारी (दि. २८) दुपारच्या सुमारास टोळक्याने करण चौरे (१७) या मुलास मारहाण करीत दगड, फरशीच्या तुकड्याने ठेचून जीवे मारले. घटनेनंतर मारेकरी परिसरातून फरार झाले. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस हवालदार विशाल काठे व प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित मारेकरी हे गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळ असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, मरकड, काठे, नाझीमखान पठाण आदींच्या पथकाने सापळा रचून पाचही संशयितांना पकडले. सखोल तपासात शरणपूर रोडवरील सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून करणचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. संशयितांचा ताबा अंबड पोलिसांना दिला आहे.
गंगापूर रोडवरील संत कबीरनगर परिसरात मार्च महिन्यात अरुण बंडी याचा खून झाला होता. त्यात संशयित आरोपी म्हणून करणचे नाव होते. करण नुकताच बालसुधारगृहातून बाहेर आला होता. त्यामुळे अरुण बंडीच्या समर्थकांनी करणवर पाळत ठेवून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अरुणच्या खुनानंतर त्याच्या गटातील इतर मुलांनी संत कबीरनगर परिसरात वारंवार जात अरुणच्या खुनाचा बदला घेऊ, अशा धमक्या देत दहशत केल्याचे सूत्रांनी सांगितले.