

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे. यात पुलावरुन पडून एका दुचाकीस्वाराचा तर दोन धरणात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
गंगापूर येथील गंमत जंमत हॉटेलजवळील पुलावरून दुचाकीस्वार खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) उघडकीस आली. या अपघातात दुचाकीवरील दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयराम आर. सहानी (४२, रा. आसारामबापू आश्रमजवळ, गंगापूररोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात पहाटे झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सहानी व त्यांचा जोडीदार गिरणारेकडून नाशिकला येत असताना भितींवर दुचाकी आदळून दोघे पुलावरून खाली पडले. त्यात सहाणी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही असे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना सोमवारी (दि.२८) घडल्या. याप्रकरणी वाडिवऱ्हे व नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दारणा धरणात उमाशंकर किसन खोटे (४२, रा. आर्टिलरी सेंटर रोड) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत गंगापूर धरण येथे मित्रांसाेबत पोहण्यासाठी गेलेले महादेव प्रल्हाद काळेबाग (३०, रा. हिंगोली) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.