नाशिक : दोघांचा वाद मिटवताना एकाला मारहाण केल्याने वाद करणाऱ्या दोघा युवकांसह त्यांच्या नातलगांनी मिळून मध्यस्थी करणाऱ्या युवकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना पंचवटीतील अमृतधाममधील बीडी कामगार नगर परिसरात रविवारी (दि. २४) रात्री दहाच्या सुमारास घडली. यानंतर मृताच्या नातलग व मित्रपरिवाराने संतप्त होत मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली, तसेच परिसरातील वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मारेकऱ्यांची धरपकड केली असून त्यात एका अल्पवयीन संशयिताचा समावेश आहे.
विशांत उर्फ काळू राजाराम भोये (२४, रा. बीडी कामगार नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विशांतचा भाऊ प्रशांत भोये याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित नितीन पंजाबराव पवार उर्फ विक्की, मच्छिंद्र उत्तम जाधव, मंदा मच्छिंद्र जाधव, रवींद्र साहेबराव मोहिते, रेखा रवींद्र मोहिते, गोरख उत्तम जाधव, सूरज रवींद्र मोहिते व एक अल्पवयीन (सर्व रा. बीडी कामगार नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तपास करीत अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले असून नितीन पवार यास अटक केली आहे. शनिवारी (दि. २२) सायंकाळी साडेसात वाजता विशांत मित्रांसह मनपा शाळेच्या मैदानात गप्पा मारत असताना, संशयित नितीन पवार याचे अल्पवयीन मुलासोबत वाद सुरू होते. त्यामुळे या वादात विशांतने मध्यस्थी केली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने विशांतला शिवीगाळ केली. विशांतने अल्पवयीन मुलास मारहाण केली. त्यानंतर संशयित नितीन व अल्पवयीन मुलासह इतर संशयित मंदा जाधव, मच्छिंद्र जाधव, सूरज मोहिते, रवि मोहिते, रेखा मोहिते यांनी विशांतला मारहाणीचा जाब विचारला. तसेच मच्छिंद्र पवार यांनी 'तुला पाहून घेतो' अशी धमकी दिली होती. दरम्यान, विशांत हा रविवारी (दि. २४) रात्री दहाच्या सुमाराम त्याचे मित्र तन्मय शिरसाठ, प्रथमेश शिरसाठ, आकाश लोखंडे, विजय खैरनार यांच्यासोबत स्वामी समर्थ केंद्राजवळ गप्पा मारत होता. त्यावेळी संशयित मच्छिंद्र यांनी 'आज तुझी खुमखुमीच काढतो' असे धमकावून विशांतला बोलावले. विशांत तेथे गेल्यानंतर संशयित रेखा मोहिते व मंदा जाधव यांनी डोळ्यात मिरची पूड फेकल्याने विशांत डोळे चोळू लागला. त्याक्षणी नितीन पवार विशांतला पकडले तर इतर संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयित मच्छिंद्र जाधव याने धारदार शस्त्र विशांतच्या छातीत खुपसल्याने त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत विशांतला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माेहिते, जाधव व पवार कुटुंबातील संशयितांनी संगनमताने विशांतवर हल्ला करीत खून केल्याचे समजताच विशांतच्या नातलगांसह मित्रपरिवार संतप्त झाला. त्यांनी मारेकऱ्यांना अटक करीत कारवाईची मागणी केली. तसेच जमावाने संतप्त होत संशयितांच्या वाहनांसह इतरांच्या वाहनांची तोडफोड करीत आग लावण्याचा प्रयत्न केला. यात रिक्षासह तीन ते चार पिकअप व एका आयशर वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आडगाव पोलिसांसह दंगा नियंत्रण पथकाने परिसरात बंदोबस्त करीत जमावास शांत केले, तसेच खूनप्रकरणी दोघांना पकडले.
मारेकऱ्यांना त्वरित अटक करा, कठाेर कारवाई करा, या मागणीसाठी विशांतच्या कुटूंबियांसह मित्रपरिवाराने अमृतधाम- छत्रपती संभाजीनगर लिंक राेडवर सोमवारी (दि.२५) सकाळी रास्ता राेकाे आंदाेलन केले. त्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला तसेच वाहतूक खाेळंबली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त फाैजफाटा तैनात केला. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त पद्मजा बढे, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पथकांनी भोये कुटुंबासह मित्र परिवाराची समजूत काढून कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर परिसरातील तणाव निवळला.
विशांतचा खून करण्याआधी काही तास अगोदर अल्पवयीन संशयिताने 'एका एकाला घेणार काय! १०० टक्के' अशा मजकुराचे स्टेट्स ठेवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संशयितांनी संगनमत करून विशांतला मारल्याचे सुत्रांनी सांगितले. या गुन्ह्यातील फरार संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांनी तीन पथके मागावर पाठवली आहेत.